ज्ञानदेव बाबाराव नजान
डिजिटल युगात मोबाइल हे केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. बँक व्यवहार, ऑनलाईन खरेदी, शासकीय सेवा… सर्व काही कामकाज मोबाइलवर येऊन थांबलं आहे. परंतु या सोयीसोबतच फसवणुकीचे नवे प्रकारही वाढत चालले आहेत. विशेषतः अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेज हे आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली. नाशिकमध्ये राहणारी कविता ही एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. अभ्यास, घर आणि ऑनलाईन कामांमध्ये ती व्यवस्थित मोबाईलचा वापर करत होती. एका दुपारी तिला एक मेसेज आला- “तुमच्या मोबाइल नंबरवरून सिमकार्ड दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करण्याची विनंती प्राप्त झाली आहे.

जर तुम्ही ही विनंती केली नसेल, तर तात्काळ खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.”कविताला क्षणभर धक्का बसला. “आपला नंबर बंद झाला तर?” या विचाराने तिने लगेच त्या नंबरवर कॉल करण्याचा विचार केला, पण तिला आठवलं की अशा प्रकारच्या मेसेजद्वारे अनेक वेळा लोकांना फसवलं जातं. त्यामुळे तिने तो नंबर डायल न करता थेट आपल्या मोबाईल ऑपरेटरच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरशी संपर्क साधला.

तेव्हा तिला समजलं की तिच्या नंबरबाबत अशी कोणतीही विनंती नोंदवलेली नाही. यातून तिचा संशय खात्रीत बदलला- हा स्पष्टपणे फसवणुकीचा प्रयत्न होता. पूर्वी असं काही घडलं असतं तर कदाचित ती फक्त मेसेज डिलीट करून पुढे गेली असती. पण यावेळी तिने वेगळा निर्णय घेतला. तिने आपल्या मोबाइलमध्ये Sanchar Saathi हे अधिकृत ॲप डाउनलोड केलं. ॲपमध्ये जाऊन तिने “Suspected Fraud Communication” हा पर्याय निवडला आणि त्या मेसेजची माहिती तसेच संबंधित नंबर रिपोर्ट केला.

काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की तिच्या सहकाऱ्यांपैकी दोन-तीन जणांनाही असाच मेसेज आला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तेव्हा कविताने त्यांना सांगितलं की अशा गोष्टी फक्त दुर्लक्षित करून चालत नाहीत, तर त्या रिपोर्ट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

या छोट्या कृतीमुळे एक मोठा फरक पडू शकतो. कारण प्रत्येक तक्रारीच्या आधारे अशा नंबरची तपासणी केली जाते आणि गरज पडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. या घटनेतून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात.अनोळखी मेसेज किंवा कॉल आल्यावर घाबरून किंवा घाईत निर्णय घेऊ नये. विशेषतः “तातडीचे”, “आत्ता लगेच करा” असे संदेश असतील, तर अधिक सावध राहणे आवश्यक आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्वतः सावध राहणे पुरेसे नाही, तर अशा फसवणुकीविरुद्ध आवाज उठवणेही आवश्यक आहे. अनेकजण अशा मेसेजकडे दुर्लक्ष करतात, पण तेच नंबर पुढे जाऊन दुसऱ्या कुणाला फसवू शकतात.डिजिटल सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने दिलेल्या सुविधांचा वापर करणे हीही आपली जबाबदारी आहे.

Sanchar Saathi सारख्या प्लॅटफॉर्ममुळे सामान्य नागरिकांनाही सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढण्यात सहभाग घेता येतो. आजच्या काळात सजग राहणं म्हणजे केवळ स्वतःला वाचवणं नाही, तर इतरांनाही सुरक्षित ठेवणं आहे. लक्षात ठेवा, फसवणूक टाळण्याचा पहिला टप्पा म्हणजे संशय घेणे… आणि दुसरा टप्पा म्हणजे त्या संशयास्पद गोष्टीची योग्य ठिकाणी नोंद करणे.

आजच्या डिजिटल युगात ‘Ignore’ करणं पुरेसं नाही. योग्य ठिकाणी ‘Report’ करणं हीच खरी सुरक्षा आहे. तुमची एक योग्य तक्रार गुन्हेगाराचा संपूर्ण खेळ उधळू शकते. फसवणूक करणारे आपलं काम करतच राहणार… प्रश्न एवढाच आहे की आपण फक्त दुर्लक्ष करणार, की सजग नागरिक म्हणून त्यांना थांबवण्याची जबाबदारी स्वीकारणार? (सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)

dnyandev.najan@yahoo.in