scorecardresearch

पसंतीची वरात… साडी घ्या साडी!

शहराच्या गजबजलेल्या बाजारातलं त्याचं ते दुकान, दुमजली वगैरे नाही पण अगदीच लहान सुद्धा नाही. बऱ्यापैकी जुनं असल्यानं आजूबाजूच्या परिसरात तसं लोकांना माहीत होतं. नेहमी येणारी गिऱ्हाईकं सुद्धा बऱ्यापैकी जोडली होती. पण कोविडमुळे सगळंच ठप्प झालं होतं. गेली दोन वर्षे त्यानं कसंबसं दुकानाला आणि स्वतःला सावरलं होतं.

पसंतीची वरात… साडी घ्या साडी!
महिलांची साडी खरेदी हा संयम जोखणारा प्रकार असतो…

काचेच्या पलीकडून निरखणाऱ्या उत्सुक डोळ्यांकडे त्याची नजर गेली आणि त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. हातातली साडी पटापट घडी करुन त्याने त्या उत्सुक डोळ्यांना आवाज दिला. “या ना ताई, आत येऊन पहा. नवीन डिझाईन्स आल्या आहेत यात, या आत. दाखवतो. सेल सुरु आहे.” “ही कशी ओ?” ताईंनी बाहेर डिस्प्लेला लावलेल्या साडीला ओझरता स्पर्श करत विचारलं. “ती हजारची आहे. प्युअर सिल्क.” किंमत ऐकून ताईंची डोळ्यांतली उत्सुकता त्यांच्या पळत्या पावलांसकट निघून गेली. त्याने मात्र हार मानली नाही. तो काउंटरवरुनच थोडंसं पुढे झाकत पाठमोऱ्या जाणाऱ्या ताईंकडे पाहत मोठ्याने म्हणाला, “अहो, आत येऊन तर पाहा ताई, अजून चांगल्या साड्या आहेत. वाजवी दरात देईन. ओ ताई..” ताई मात्र केव्हाच पुढच्या दुकानातल्या काचेत लावलेल्या साड्या पाहण्यात गर्क झाल्या होत्या.

आणखी वाचा : फॅशनच्या जगतात सौंदर्याची नवी व्याख्या तयार करणारी मसाबा गुप्ता

काही क्षण थांबून त्यानेही आपला मोर्चा मग साड्या घडी करण्याकडे वळवला. ‘आज रविवार आहे, नवरात्र सुरु आहे, सणाचे दिवस आहेत. गिऱ्हाईकं यायला हवीत.’ काम करता करता त्याचं मनाशी पुटपुटणं सुरु होतं. शहराच्या गजबजलेल्या बाजारातलं त्याचं ते बाकीच्या दुकानांसारखंच एक दुकान, दुमजली वगैरे नाही पण अगदीच लहान सुद्धा नाही. बऱ्यापैकी जुनं असल्यानं आजूबाजूच्या परिसरात तसं लोकांना माहीत होतं. नेहमी येणारी गिऱ्हाईकं सुद्धा बऱ्यापैकी जोडली होती. पण कोविडमुळे सगळंच ठप्प झालं होतं. गेली दोन वर्षे त्यानं कसंबसं दुकानाला आणि स्वतःला सावरलं होतं.

आणखी वाचा : Navratri 2022 : हीच खरी दुर्गालक्ष्मी !

“अंकल, लेहंगा मिलेगा क्या शादी का?” दारावरुन आलेल्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. “लेहंगा नहीं है, पर साडी है, फॅन्सीवाली नयी आयी है, वो दिखाऊ क्या.” त्याने विचारलं. समोरची मुलगी जरा गोंधळली. ‘बघूया की नको’ च्या विचारात अडकली. त्याला ते कळताच तो पटकन म्हणाला, “देख तो लो, पसंद आय़ा तोही लेके जाना, देखनेका पैसा थोडी लगता है, आव अंदर देखो, महेश, यांना त्या फॅन्सी साड्या दाखव रे, कालच नवीन माल आलाय. जाव दिदी उसके साथ. अब क्या है ना, लोग साडी को ही लेहंगा बना लेते है, वैसा भी पॅटर्न है अपने पास, जाव देखलो.” तिला अधिक विचार करायला न देता त्याने तिला महेशकडे सोपवलं सुद्धा.

आणखी वाचा : घर आणि करियर: वर्क और लाइफ, दोनो के साथ जिन्दगी बॅलन्स हो सकती है|

“या या ताई, काय दाखवू सांगा.” पाठोपाठ आलेल्या चार-पाच बायकांचा घोळका पाहून त्याने त्या सगळ्यांनाच विचारलं. “लग्नाच्या साड्या घ्यायच्या आहेत. मिळतील का?” “हो हो या ना, ब्रायडल कलेक्शन आहे ना आमचं. या चला दाखवतो. नरेंद्र, जरा गल्ला सांभाळ. य़ांना साड्या दाखवतो मी. वैभव, ते आपलं ब्रायडल कलेक्शन काढ रे. कशा पाहायच्या आहेत, ताई, बनारसी, पैठणी, कांजीवरम..” त्याने पटापट सगळ्या सूचना दिल्या आणि त्या बायकांना घेऊन तो आतल्या बाजूला चालायला लागला. “जरा चांगल्या दाखवा तुमच्या कलेक्शन मधल्या. आम्हांला देण्याघेण्याच्या सुद्धा घ्यायच्या आहेत हा, तर डिस्काउंट द्या घसघशीत.” त्या घोळक्यामधली एक बाई म्हणाली. “ताई, तुम्ही आधी साड्या तर पहा, किमतीचं काय आपण पाहू नंतर, तुम्ही पसंत करा, मग बघू काय ते.” तो आता त्यांच्या समोर उभा राहिला. त्याच्या लक्षात आले की त्या चार-पाच बायकांसोबत मागे घुटमळत एक पुरुषसुद्धा सोबत आहे. “दादा, या ना तुम्ही बसा इथे असं.” त्याने थोडंसं कोपऱ्यात त्या पुरुषाला बसायला सांगितलं. अर्थात सगळ्यात महत्त्वाच्या खुर्च्या बायकांना दिल्या गेल्या.

आणखी वाचा : सुंदर मी होणार! – त्वचेचे सौंदर्य

एखादा कलाकार आपली कला सादर करण्याच्या आधी जसं त्या कलेला प्रथम नमस्कार करतो, तसं त्याने साड्यांच्या त्या गठ्ठ्यांकडे आश्वासक नजर टाकली. दुस-या क्षणाला त्याच्या आतला पट्टीचा दुकानदार जागा झाला आणि साड्यांचे एकसोएक नमुने बायकांसमोर सादर झाले. सिल्क, कॉटन, ऑरगांझा, पैठणी, पेशवाई, पटोला, कोटा, बनारसी, मलमल असे प्रकार त्या टेबलवर विराजमान होत होते. पाच बायकांच्या पाच निवडी आणि पाच विचार टोलवत, तो त्यांना त्यांच्या पसंतीनुसार साड्या दाखवत होता, सोबत तोंडाची टकळी सुरुच. प्रत्येक साडीची खुबी तो सहज सांगत होता. समोर साड्यांचा खच पडला होता. बायकांचा गलका आणि त्या बापुड्या पुरुषाचा गोंधळलेला चेहरा त्यातही तितकाच उठून दिसत होता. दीड तास तोंडाची मशागत केल्यावर त्याने त्या पुरुषाला विचारले, “दादा, तुम्ही पण सांगा की तुमची पसंत.” दादांनी फक्त त्याच्याकडे पाहत हसत हातानेच ‘चालूद्या तुमचं’ केलं आणि म्हटलं, “कसं करता अहो तुम्ही हे. किती पेशन्स लागतो याला.” त्याने दिलखुलास हसत म्हटलं, “ओझी वाहण्यापेक्षा पण जड काम आहे हे, बायकांच्या पसंतीची साडी निवडून देणं. पण काय आता, कशासाठी-पोटासाठी.” दादांनी पण हसत त्याला दाद दिली.

आणखी वाचा : सुंदर मी होणार – काळजी तेलकट त्वचेची

दोन-तीन डझन साड्या निवडून झाल्यानंतर अजून अर्धा तास किंमतीची घासाघीस झाली आणि ती वरात मार्गी लागली. दाराशी काही क्षण थांबून तो समोर ठेवलेल्या बाटलीतले पाणी घटाघट प्यायला आणि पाठमोरा वळणारच इतक्यात दारातून आवाज आला, “पैठण्या आहेत को ओ चांगल्या?” घेतल्या घोटाचा आवंढा गिळत तो वळून म्हणाला, “आहेत ना, या आत, सेल सुरु आहे सध्या, दाखवतो या.” पसंतीच्या ओझ्याला मानगुटीवर वागवत आपली कला पेश करायला तो पुन्हा सज्ज झाला…

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या