परमवीर चक्र पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे- जो सैनिकांना युद्धकाळातील अतुलनीय कामगिरीबद्दल दिला जातो. आजपर्यंत आपल्या देशात २१ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यापैकी १४ जणांना मरणोत्तर दिला गेला आहे. हे पदक पितळ या धातूपासून तयार केले जाते. तसेच ते ३४.९ गोलाकार व्यासाच्या आकाराचे असून, मध्यभागी राष्ट्रीय चिन्ह असून वज्राच्या चार चिन्हांनी वेढलेले आहे ज्याचा संबंध थेट भारतीय पौराणिक शास्त्राशी जोडला गेला आहे. या परमवीर चक्राचे मराठीशी खास नातं आहे.

हे परमवीर चक्र डिझाईन केले आहे मराठमोळ्या सावित्रीबाई खानोलकर यांनी. नाव ऐकलं की अस्सल मराठमोळ्या गृहिणीचा चेहरा आपल्या नजरेसमोर उभा राहतो, पण यांचं मूळ नाव ईव्हा ईव्हॉन लिंडा माडे-डी-मारोस (Eva Yvonne Linda Maday-de-Maros) आहे. त्यांचा जन्म २० जुलै १९१३ मध्ये स्वित्झर्लंड मध्ये झाला. त्यांचे वडील हंगेरियन तर आई रशियन होती. वडील जिनेव्हा येथे नोकरी करत होते. त्यामुळे त्यांचे बालपण, जडणघडणही जिनेव्हा येथेच झाली. पुढे शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना एका वसतीगृहात ठेवले. नंतर एक दिवस समुद्रकाठी फिरताना त्यांची नजर एका ब्रिटिश लष्करी तुकडीवर गेली. तिथेच त्यांची ओळख विक्रम खानोलकर यांच्याशी झाली. विक्रम खानोलकरांचा जन्म वेंगुर्ल्यातला. त्यांना परंपरागत देशसेवेचा कौटुंबिक वारसा होता. वडील आणि आजोबा दोघेही सैन्यात होते. तर विक्रम खानोलकर हे लष्करामध्ये एका वरिष्ठ पदावर कार्यरत होते. लष्करातील पुढील प्रशिक्षणासाठी ते ब्रिटनमध्ये सॅन्डहर्स्ट येथे रॉयल मिलिटरी ॲकॅडमीमध्ये सैनिकी प्रशिक्षणासाठी गेले होते. तिथून ते आपल्या लष्करी तुकडीसह स्वित्झर्लंडला फिरायला गेले होते. विक्रम खानोलकर यांच्या पहिल्या भेटीतच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. तेव्हाच त्यांनी खानोलकरांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण इव्हा यांच्या वडिलांना तो निर्णय मान्य नव्हता.

आणखी वाचा-असा नवरा हवा गं बाई! स्वयंपाक ते केरकचरा सगळं नवऱ्याने केलं, पण…; बाईच्या मनातला साथीदार नक्की कसा असतो?

पुढे वयाच्या १९ व्या वर्षी १९३२ साली त्या भारतात आल्या आणि विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारून त्या इव्हाच्या सावित्री झाल्या. पाश्चात्य लोकांना जसं भारतीय संस्कृती, जीवनशैली याबद्दल कुतुहल, आकर्षण असतं, तसंच इव्हा यांनादेखील होतं. खानोलकरांशी लग्न झाल्यावर इथल्यासंस्कृतीविषयी अधिक जिव्हाळा निर्माण झाला. भारतीय पंरपरा आणि संस्कृतीच्या प्रेमात असलेल्या इव्हाना यांना भारतीय संस्कृती, परंपरा आत्मसात करायला फारसा वेळ लागला नाही. त्या मराठी, हिंदी गुजराती, संस्कृत आदी भाषा शिकल्या व नृत्य, शास्त्रीय संगीत, चित्रकला, वेद – पुराण यांचा सखोल अभ्यास केला. महाराष्ट्रातील संत साहित्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘महाराष्ट्रातील संत’ (Saints of Maharashtra) हे पुस्तकदेखील लिहिले आहे.

जसा इंग्लंडमध्ये सैन्यांना त्यांच्या शौर्यासाठी व्हिक्टोरिया क्रॉस हा पुरस्कार दिला जातो, तसा १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशातही आपल्या सैनिकांसाठी असा पुरस्कार असावा याची जबाबदारी भारत सरकारने मेजर जनरल हीरालाल अटल यांच्यावर सोपवली. वेद-पुराण, संस्कृती, इतिहास यांचा गाढा अभ्यास असलेल्या सावित्रीबाईंची कीर्ती अटलजी ऐकून होते. त्यामुळे त्यांनी या पदक निर्मितीसाठी सावित्रीबाईंची मदत घेण्याचे ठरवले. सावित्रीबाईंनीदेखील अटलजींचा विश्वास सार्थ ठरवत उत्तमरीत्या आकर्षक असे परमवीर चक्र तयार केले. या पदकाचं डिझाइन इतकी सुबक आहे की आजतागायत त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आणखी वाचा-लिव्ह-इन नात्याची वैधता आणि वारसाहक्क…

१९४८ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात बडगाम येथे शत्रूशी लढताना मेजर सोमनाथ शर्मा शहीद झाले. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना पहिले मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित केले. विशेष म्हणजे मेजर सोमनाथ शर्मा हे सावित्रीबाईंच्या थोरल्या मुलीचे दीर होते. १९५२ मध्ये पतीच्या आकस्मित निधनांतर त्यांनी उर्वरित आयुष्य समाजसेवा, शहीदांच्या कुटुंबांची सेवा करण्यात झोकून दिले तसेच रामकृष्ण मिशन मठात आयुष्य घालविले.

सावित्रीबाई पाश्चात्य संस्कृतीत जरी वाढल्या असल्या तरी त्या भारतात आल्या आणि पतीसह भारतीय संस्कृती, चालीरीती आत्मसात केल्या आणि आपल्या कला कौशल्याने भारतीयांच्या मनावर स्वत:च्या नावाची मोहोर कायमची उठवून गेल्या. भारतीय पदकनिर्मितीत मोलाचा वाटा असलेल्या अन् जन्माने परदेशी, पण तनामनाने भारतीय असलेल्या सावित्रीबाईंची २० नोव्हेंबर १९९० ला प्राणज्योत मालवली.