सायाेनी घोष… अवघ्या ३३ वर्षांची अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार… आपल्या खणखणीत आवाजात कधी मिश्किल, पण अभ्यासपूर्ण भाषणांनी, सत्ताधाऱ्यांना थेट भिडत लोकसभा गाजवतातच. अनेकदा मोदी-शहांना थेट आव्हान देतात… पण सध्या त्या सर्वाधिक चर्चेत आल्या आहेत त्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमुळे.

या निवडणूक प्रचारात अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस अर्थात टीमसीच्या स्टार प्रचारक अशीच त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत… ममता बॅनर्जींनी प. बंगालचा केलेला विकास. गरीब जनतेच्या मसिहा म्हणजे ममता दीदी… पं. बंगालमधलं समतेचं, सलोख्याचं वातावरण राखतील त्या फक्त आणि फक्त ममता दीदीच… बंगाली अस्मिता म्हणजे  दीदी… त्या थेट मोदी, शहा, योगी यांना भिडतात… जिथे महाराष्ट्रातले नेते अनेकदा विरोधकही मोदी-शहांचे नाव घ्यायला कचरतात, तिथे पं. बंगालमध्ये या सायोनी घोष खुलेआम भाजपच्या या शीर्षस्थ नेत्यांना तगडं आव्हान देतात… त्यांच्या कर्माचा पाढा जनतेसमोर वाचतात.

भाजपला साम-दाम-दंड वापरून प. बंगाल ताब्यात घ्यायचं आहे याची पूर्ण कल्पना असलेल्या सायोनी घोष त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी पडत नाहीत हे त्यांच्या प्रसारसभेतील भाषणे ऐकून लक्षात येतं. त्याची काही उदाहरणे- ‘‘तुम्ही प्रचार करताना आमदाराच्या कामावर मत मागत नाहीत, तर ममता बॅनर्जी यांच्या नावावर मत मागत आहात…’’ पत्रकाराच्या या प्रश्नावर जराही विचलित न होता सायोनी घोष थेट उत्तरतात, ‘‘आपण ज्या रस्त्यावरून चाललो आहाेत, हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय जिथून आपली गाडी हळूवार चालली आहे ना तो रस्ता या आमदारानेच बनवला आहे, अमित शहा यांनी बनवला आहे का? विश्वासार्हता लोकांमधून कमावली जाते, ती  बीजेपीच्या पॉलिटीकल टुरिझममधून येत नाही.’’ हे सांगत असताना चेहऱ्यावर ना संताप, ना शहांसारखी अरेरावीची भाषा… अगदी संयतपणे त्या उत्तर देतात. मधेच लोकांना गोड हसून प्रतिसादही देतात.

अनेकदा त्या ममता बॅनर्जींसारखी पांढरी साडी, पायात साधी चप्पल असा पेहरावत करतात… जसं काही त्या भासवतात की मी ममता बॅनर्जी यांची वारसदारच आहे… आणि हे ठसविण्यात त्या पूर्णत: यशस्वीही झाल्या आहेत. बंगालच्या महिला त्यांच्यात ममता बॅनर्जींची छबी शोधतात. त्यांच्या भाषणांना इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय की ममता बॅनर्जींच्या प्रचाराचा बराचसा भार सायोनी घोष यांनी उचलला आहे असेच चित्र आहे.

या निवडणूक प्रचारात त्यांनी बीजेपीच्या एकाही स्टार प्रचारकाचा समाचार घेतला नाही असे झाले नाही.

‘‘या मंचावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की, ममतांची क्षमता २०२६ मध्ये प. बंगाल आपल्याला दाखवेलच. एक लक्षात ठेवा, ममता बॅनर्जी बंगाल की नारी, हवाई चप्पल, सफेद साडी, एक नारी सौं पे भारी, यावेळी त्या तुम्हाला रसगुल्ला खिलवूनच यमुना पार पाठवणार…’’’

‘‘चाय से शुरू हुयी थी सरकार, गाय पे अटक गये, और विकास के पापा मोदीजी रास्ते पें भटक गये.

मोदी हटाव, देश बचाव…’’

‘‘अमित शहा म्हणतात, ओ दीदी कान खोल के सुन लो… पण मी अमित शहांना सांगतेय की, तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा, चार तारखेनंतर आम्ही कसा हिरवा गुलाल खेळू ते तुम्ही बघाल. तुम्ही पंधरा दिवस इथे ठिय्या मारून बसण्याची भाषा करत आहात, पंधरा दिवसच काय ममता दीदींना सांगून तुमची ३६५ दिवस इथेच बसण्याची सोय करून देते.’’

अभिनेत्री म्हणून सुरुवात…

सायोनी घोष या बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील अभेनेत्री, गायिका आहेत. त्या अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस अर्थात टीएमसीकडून जादवपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी ‘इच्छे दाना’ या टेलिफिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘नटवर नोटआउट’ या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून त्या मोठ्या पडद्यावर चमकल्या. त्यानंतर राज चक्रवर्ती यांच्या ‘शत्रू’ या चित्रपटात त्यांनी काही अनुभवी कलाकारांसोबत काम केले. पुढे ‘प्रलय आशे’ या मालिकेत एका पत्रकाराची भूमिका साकारली.  ‘कानामाची’, ‘अंतराल’, ‘एकला चालो’, ‘आमार शहर’, ‘बिटनून’, ‘मायेर बिये’, ‘राजकहिनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. २०१३ आणि २०१४ मध्ये त्यांनी ‘कलकत्ता फुटबॉल लीग’ समालोचन केलं.

राजकीय कारकीर्द

सायोनी घोष यांनी २०२१ मध्ये अखिल भारतीय तृणमूल कँग्रसमध्ये प्रवेश केला. मार्च २०२१ मध्ये त्यांना आसनसोल दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली; मात्र त्या अग्निमित्रा पॉल यांच्याकडून पराभूत झाल्या. जून २०२१ मध्ये त्यांची तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ३० जून २०२३ रोजी इडीच्या २०२२ च्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात चौकशीला सामोरं जावं लागलं. पुढे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जादवपूर मतदारसंघातून उमेदवारी लढवून सुमारे २.५ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या.

त्यांच्या या प्रचाराला बंगाली लोकांचा विशेषत: महिलांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. शेरोशायरी, गुरूबानी, काबा, हनुमान चालिसा तोंडपाठ असलेल्या सायोनी घोष भाजपच्या हिंदू-मुस्लिम प्रचाराला चांगलीच टक्कर देतात. लोकांना भारतीय संविधानाच्या समतेच्या शिकवणीची आठवण करून देतात. बंगालमध्ये सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि बंगालच्या लोकांना हेच चित्र हवं असेल तर ममता दीदींना निवडून द्या असे प्रचार सभांमध्ये आवाहन करतात. तिथल्या महिलाही घोष यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हात मिळविण्यसाठी गर्दी करतात… कधी त्या कुठल्या महिलेची गळाभेट घेतात तरी कधी लहानग्याला आपल्या पोटाशी धरतात… गोड भाषेत ‘जय बांगला’ म्हणतात….

मोदी-शहांना टक्कर देण्यात अन्य  राज्यांमधले भले भले गारद होतात, तिथे प. बंगालच्या निवडणुकीत तृणमूलच्या फायर ब्रॅंड नेत्या असलेल्या सायोनी घोष या दोघांना खुलं आव्हान देताना कुठलीही भीती, दडपण बाळगत नाहीत…

lata.dabholkar@expressindia.com