scorecardresearch

मुलींनो, अमेरिकेत शिकायचंय?

खास मुलींसाठी भारत सरकारने ‘स्टेम’ शिष्यवृत्ती सुरू केली आहे. काय आहे ही योजना, कशाप्रकारे त्याचा लाभ घेता येईल?

मुलींनो, अमेरिकेत शिकायचंय?
मुलींना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास पालक धजावत नाहीत.

मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी, वैद्यकशास्त्र या विषयातील पीएचडी पदवी प्राप्त आणि सध्या पीएचडी करणाऱ्या महिलांना अमेरिकेतील दर्जेदार आणि आघाडीच्या शैक्षणिक संस्थेत अधिक प्रगत संशोधन कार्य आणि आपली क्षमतावृध्दी करण्यासाठी भारत सरकारने खास शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. ही शिष्यवृत्ती, इंडो यूएस फेलोशिप फॉर वुमेन इन स्टेम (STEMM- सायन्स- टेक्नॉलॉजी- इंजिनीअरिंग- मॅथ्स- मेडिसीन) या नावानं ओळखली जाते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इंडो-यूएस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी फोरम मार्फत ही शिष्यवृत्ती दिली जाते.

या शिष्यवृत्तीचा कालावधी ३ ते ६ महिने आहे. या शिष्यवृत्तीमध्ये दरमहा विद्यावेतन, परतीच्या प्रवासाचा खर्च, आरोग्य विमा, इतर दैनंदिन शिष्यवृत्ती, इतर खर्च यांचा समावेश आहे.

या शिष्यवृत्तीचे दोन प्रकार आहेत

(१) वुमेन्स ओव्हरसीज स्टुडंट इंटर्नशिप- दरमहा विद्यावेतन – अडीच हजार डॉलर्स, विमान प्रवास – अडीच हजार डॉलर्सपर्यंत, आरोग्य विमा- ५०० डॉलर्स, इतर खर्च- १ हजार डालर्स. अर्हता- मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान, कृषी/ वैद्यकीय शास्त्रात पीएचडीचा अभ्यासक्रम करणाऱ्या भारतीय महिला.
वयोमर्यादा- २१ ते ३५ वर्षे.
(२) वुमेन्स ओव्हरसिज फेलोशिप – दरमहा विद्यावेतन- तीन हजार डॉलर्स, विमान प्रवास -अडीच हजार डॉलर्सपर्यंत, आरोग्य विमा- १००० डॉलर्स, इतर खर्च- १२०० डॉलर्स. अर्हता- मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान,कृषी/ वैद्यकीय शास्त्रात पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि भारतातील एखादी शैक्षणिक संस्था/ विद्यापीठ/ संशोधन आणि विकास संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय महिला.
वयोमर्यादा- २७ ते ४५ वर्षे.

आणखी वाचा : मुलींच्या उच्च शिक्षणासाठीची ‘ग्लो अ‍ॅण्ड लव्हली’ शिष्यवृत्ती!

संशोधनाची क्षेत्रे

या शिष्यवृत्तीअंतर्गत कोणकोणती क्षेत्रे येतात, कोणत्या क्षेत्रात संशोधन चालते, त्यावर एक धावती नजर.
पुढील क्षेत्रात प्रगत संशोधन करता येतं.
-(१) भौतिकशास्त्र,
(२) वैद्यकीय शास्त्र,
(३) गणितीय शास्त्र,
(४) जैव शास्त्र,
(५) कृषी शास्त्र,
(६) रसायन शास्त्र,
(७) पर्यावरण आणि- भू शास्त्र,
(८) संज्ञानात्मक/ ज्ञानआकलन (कॉग्निटिव्ह) शास्त्र,
(९) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान,
(१०) संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान.

आणखी वाचा : पुरुषी मक्तेदारी मोडीत काढणारी मूर्तिकार रेश्मा खातू!

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-

(१) सध्याच्या पदवीची माहिती/ प्रतिलिपी (ट्रान्सस्क्रिप्ट)/ गुणपत्रिका,
(२) अधिकृत कार्यालयीन पत्रावर पीएचडीचे मार्गदर्शक, वरिष्ठ शास्त्रज्ञ, संस्थेचे प्रमुख यांच्याकडील पहिले संदर्भ (रेफरन्स) पत्र.
(३) अधिकृत कार्यालयीन पत्रावर मार्गदर्शक, वरिष्ठ शास्त्रज्ञ, संस्थेचे किंवा विभाग प्रमुख यांच्याकडील दुसरे संदर्भ पत्र,
(४) संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र,
(५) अमेरिकेतील संस्थेचे स्वीकृती पत्र,
(६) अमेरिकेतील ज्या मेन्टॉरने (मार्गदर्शक) स्वीकृती दिली आहे, त्याच्या शैक्षणिक कामगिरीची माहिती/ परिचय(सीव्ही) आणि संशोधनकार्याच्या अनुषंगाने प्रकाशित सर्वोत्कृष्ठ साहित्य.
(७) अर्जदाराची शैक्षणिक माहिती. चार पृष्ठाच्या पलीकडे नसावी.
(८) जन्मदाखला,
(९) पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पृष्ठाच्या स्कॅन केलेल्या प्रती,
(१०) असल्यास इतर कागदपत्रे.
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

संपर्क संकेतस्थळ- http://www.dst.gov.in/callforproposals/indo-us-fellowship-women-stemm

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scholarship for girls and women in india know all details nrp