scorecardresearch

महिलांसाठी अनुकूल शहरांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर… चेन्नईचा पहिला क्रमांक!

महिलांसाठी सुरक्षित शहरांचे एक सर्वेक्षण अलीकडेच पार पडले… काय आढळले या सर्वेक्षणात?

महिलांसाठी अनुकूल शहरांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर… चेन्नईचा पहिला क्रमांक!
शहरे महिलांसाठी सुरक्षित असायला हवीत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

स्त्री शिक्षणासाठी आणि नोकरी-उद्योग व्यवसायासाठी घराबाहेर पडू लागली. प्रवास करु लागली, तशा तिच्या गरजाही वाढल्या. या गरजांकडे अजूनही पुरेसे लक्ष दिलं जातं असं नाही. पण मोठ्या शहरांमध्ये किमान काही प्रमाणात का होईना विचार होऊ लागला आहे हे खरं आहे. अर्थात अजूनही महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता अशा अनेक सुधारणा होणं बाकी आहे, अशा निकषांचा विचार करूनच एक सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये चेन्नई शहर हे महिलांसाठी सर्वांत चांगलं सुरक्षित शहर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांवार आहे. त्यानंतर बंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे राजधानी दिल्ली यामध्ये १४ व्या क्रमांकावर आहे. देशातील राजधानीच्या फक्त १० शहरांनी पहिल्या २५ शहरांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. टॅलेंट स्ट्रॅटेजी कन्सल्टींग फर्म ‘अवतार’ (Avtar)च्या वतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे, यामध्ये एकूण १११ शहरांची यादी देण्यात आली आहे.

आणखी वाचा : जिंदादिल मास्टरशेफ उर्मिला बा!

या सर्वेक्षणामध्ये फक्त महिलांची सुरक्षितता हा मुद्दा होता. पण तोच एकमेव मुद्दा नव्हता. तर यामध्ये राजकीयदृष्ट्टया, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या, पर्यावरणदृष्ट्या आणि महिलांच्या विकासाच्या दृष्टीने कोणती शहरं उत्तम कामगिरी करत आहेत असे निकष होते. विशेष म्हणजे यामध्ये उत्तरेकडील राज्यांमधील शहरांपेक्षा दक्षिणेकडील शहरांनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे. या संस्थेनं सर्वेक्षण करताना पाच महत्त्वाचे निकष ठेवले होते- राहण्यासाठीच्या सुविधा, सुरक्षितता, महिला प्रतिनिधित्व आणि महिला सक्षमीकरणासाठी उचलण्यात आलेली पावले हे निकष होते. तसंच या शहरांमध्ये काम करत असलेल्या विविध संघटना आणि यापैकी किती संघटना विशेषत: महिलांसाठी काम करत आहेत हा मुद्दाही विचारात घेण्यात आला होता. दक्षिण किंवा पश्चिमेकडील राज्यांमधील राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता या राज्यांमध्ये महिलांना रोजगाराच्या संधी जास्त असणं स्वाभाविक आहे असं अवतार ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष सौंदर्य राजेश यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : स्त्रिया आणि अर्थसाक्षरता : मैत्रीणींनो, आरोग्य विमा काढलात का?

महिलांना आरोग्य, शिक्षण, रोजगार संधी, नागरी, सामाजिक सुविधा आणि सुरक्षित वातावरण जी शहरे देऊ करतात ती शहरे महिलांसाठी अनुकूल शहरे समजली जातात, अशी व्याख्या संयुक्त राष्ट्रांच्या वतीनेच करण्यात आली आहे. दुर्दैवाने आपल्याकडे यापूर्वीही आणि आताही शहरांचा विकास करताना महिलांच्या काही वेगळ्या गरजा असू शकतात ही गोष्टच लक्षात घेतली जात नाही. तामिळनाडूमधील चेन्नईबरोबरच कोईमतूर आणि मदुराई या शहरांनीही पहिल्या १० शहरांमध्ये स्थान मिळवलं आहे. ज्या प्रमाणात महिला शिक्षण घेत आहेत, विविध क्षेत्रांत काम करत आहेत त्या प्रमाणात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्या तरी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत का हाही मुद्दा आहे.

आणखी वाचा : ‘आर्थिक बाबी मला नाही बाई कळत!’

राजधानी दिल्लीचा मात्र पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेला नाही. दिल्लीतील महिला अत्याचारांच्या घटना पाहता महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा कायमच इथं महत्त्वाचा आहे. सुरक्षिततेबरोबरच महिलांना मिळणाऱ्या संधी आणि तिथलं वातावरणही इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीत बऱ्याच त्रुटी आढळल्या. पहिल्या पाच राज्यांमध्ये दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांचा समावेश आहे. आपल्याला अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्रातील पुण्याचा समावेश आहे. तर उत्तरेकडील फक्त हिमाचल प्रदेशचा यात क्रमांक आहे. दक्षिण आणि महाराष्ट्रासारख्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये रोजगारासाठी महिलांना संधी मिळणं तसं नवीन नाही. त्यामुळे ती राज्यांसाठी अधिक अनुकूल आहेतच. पण या कर्नाटकमधील हुबळी, महाराष्ट्रातील नागपूर, गुजरातमधील अहमदाबाद आणि तामिळनाडूतील कोईमतूर ही शहरं आता महिलांसाठी रोजगार संधीसाठी नवी आश्वासक शहरं ठरली आहेत. तिथे असलेल्या औद्योगिक वातावरणामुळे अधिक संधी मिळत आहेत आणि त्याचबरोबर तिथलं वातावरणही महिलांसाठी पोषक आहे. त्यामानाने दिल्ली आणि कोलकत्तासारखी महानगरं मात्र मागे आहेत. याचं कारण म्हणजे तिथं महिला सुरक्षिततेचा दर्जा कमी आहे आणि महिलांना रोजगार देण्यात ही शहरे पुरेसं पोषक वातावरण देण्यात कमी पडत आहेत.

आणखी वाचा : तुम्हीही सुपरमॉम सिंड्रोमच्या शिकार झाला आहात का?

महाराष्ट्र कायमच स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा, महिलांना दिल्या जाणाऱ्या संधींबाबत अग्रेसर राहिला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये नोकरदार महिलांची संख्या लक्षणीय आहे. इतरही शहरांमध्ये ही संख्या वाढत आहे. मात्र त्याचबरोबरीने शहरांचं नियोजन, विस्तार करताना महिलांचाही विचार केला जाणं अत्यावश्यक ठरलं आहे. कोणत्याही शहरामध्ये महिला सुरक्षितता, महिलांच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांची वेळेवर आणि तातडीनं घेतली जाणारी दखल, कारवाई या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकल स्टेशनवर पुरेसा बंदोबस्त असणे, रात्री उशिरा येणाऱ्याजाणाऱ्या महिलांसाठी रस्त्यांवर पुरेसे दिवे असणे, वाहतुकीची सुरक्षित साधने उपलब्ध करुन देणे, रस्त्यांवर, स्टेशन्सवर स्वच्छतागृहांची सोय हे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण, विविध संघटनांमध्ये महिलांचा सहभाग, महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

प्रत्येक स्त्री मध्ये आत्मनिर्भर होण्याची क्षमता असते. पण आपल्याला संधी मिळू शकते, आपण सुरक्षितरित्या प्रवास करु शकतो हा विश्वास तिला तिच्या शहरामुळे येतो. त्यासाठी गरजेचं आहे निकोप, सुरक्षित वातावरण. हे वातावरण राज्यकर्ते आणि प्रशासनकर्तेच देऊ शकतात. वाहतुकीपासून ते सुरक्षिततेपर्यंतचे मुद्दे लक्षात घेऊन नियोजन केलं गेलं तर महिलांसाठी प्रत्येक शहर राहण्यासाठी अनुकूल ठरू शकतं.

(शब्दांकन : केतकी जोशी)

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 18:41 IST

संबंधित बातम्या