प्रश्न : स्त्रीने पोटात घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल (Oral Contraceptive Pills) माझ्या मनात खूप शंका आहेत. या गोळ्यांचा उपयोग कसा होता? त्या घ्यायच्या कशा? या गोळ्यांपासून काही अपाय होऊ शकतो का ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर : स्त्रियांनी खाण्याच्या या गोळ्यांमध्ये प्रोजेस्ट्रॉन व ईस्ट्रोजन ही दोन स्त्री-संप्रेरक वापरलेली असतात. स्त्रीच्या शरीरात प्रत्येक मासिक चक्राबरोबर एक स्त्रीबीज (ovum) परिपक्व होऊन गर्भधारणेसाठी तयार होत असतं. गर्भनिरोधक गोळ्या स्त्रीबीज निर्माण होण्याच्या प्रक्रियेस (ovulation) विरोध करतात. स्त्रीबीजाअभावी साहजिकच गर्भधारणा होणं अशक्य असतं. या गोळ्या २१ किंवा २८ गोळ्यांच्या पाकिटात मिळतात. २१ गोळ्यांचं पाकीट असल्यास गोळ्या पाळीच्या पाचव्या दिवशी सुरू करून, रोज एक अशा तऱ्हेने २१ दिवस घ्याव्या लागतात. २१ दिवसांनंतर गोळ्या घेणं बंद करताच दुसऱ्या दिवशी स्त्रीला पाळी येते. २८ गोळ्यांचं पाकीट असल्यास गोळ्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून रोज एक अशा २८ दिवस घ्याव्यात. गोळ्या जर अनियमितपणे घेतल्या तर मात्र गर्भधारणेचा धोका निर्माण होतो.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : वहिनीविषयी आकर्षण वाढलंय, काय करू?

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने अनेक स्त्रियाचं वजन वाढतं. गोळ्या सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात मळमळणं, चक्कर येणं किंवा सकाळी उठल्यावर डोक दुखणं असे साइड इफेक्ट्स काही जणींमध्ये उद्भवू शकतात. एक-दोन महिने सलग घेतल्यानंतर मात्र हे त्रास कमी होतात. या गोळ्या सुरू करण्याआधी डॉक्टरांकडून एकदा शारीरिक तपासणी करून घेणं योग्य. कावीळ, यकृताचे विकार, मधुमेह, अर्धशिशी, स्तनांचे विकार व हृदयाचे विकार असलेल्या स्त्रियांनी मात्र या गोळ्या घेऊ नये. तसंच एखादी स्त्री बाळाला स्वतःच दूध पाजत असेल, तर तिने डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेण्यास सुरुवात करू नये.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ‘माझा मुलगा स्त्रियांची अंतर्वस्त्रे घालतो’

काही महिने गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या, की मग एक-दोन महिने त्या बंद ठेवून इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करावा. एक-दोन महिन्यांनतर गोळ्या पुन्हा सुरू करू शकता येतात. कुठल्याही गर्भनिरोधक प्रकाराचा वापर न करता जर अनपेक्षितपणे संभोग झालाच, तर इमर्जन्सी गर्भनिरोधक म्हणूनही विशिष्ट पद्धतीने या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करता येतो. अशा परिस्थितीत संभोग झाल्यानंतरच्या तीन दिवसांत दोन-दोन गर्भनिरोधक गोळ्या बारा तासांच्या अंतराने घ्याव्या लागतात. त्यानंतर त्या बंद करताच पाळी येते. पाळी न आल्यास मात्र लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य. संततीनियमनाचा हा प्रकार मात्र फारसा खात्रीलायक नाही.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नापूर्वी व्हर्जिनिटी गमावणं योग्य की अयोग्य?

‘अलीकडेच संप्रेरकविरहित अशा सेंटक्रोमॅन (Centchroman) या द्रव्याच्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. या गोळ्या रोज घ्याव्या लागत नाहीत. पाळीच्या पहिल्या दिवशी एक गोळी घेतल्यानंतर दर तीन दिवसांच्या अंतराने आठवड्यातून केवळ दोन वेळा त्या घ्याव्या लागतात. तीन महिने अशी घेतल्यानंतर दर आठवड्यातून एकदा घेऊनही या गोळ्यांचा उपयोग होतो. जे गोळ्यांनी साधल जातं तेच साधणारी इंजेक्शन्स् अलीकडेच वापरली जाऊ लागली आहेत. ही इंजेक्शन पाळीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या दिवशी एक घेतल्यास त्याचा परिणाम दोन ते तीन महिन्यांपर्यंत राहतो.

आणखी वाचा : लैंगिक समस्या आणि व्हायग्रा

प्रश्न विचारा बिनधास्त

तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बिनधास्त विचारा. लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची उत्तरे दर सोमवारी देतील. तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sextalk sexual problems question and answers sex are you taking oral contraceptive pills side effects vp
First published on: 03-10-2022 at 11:18 IST