scorecardresearch

लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जबाबदार लैंगिक संबंधांचं वय कोणतं?

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (WHO) केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, लैंगिक शिक्षण दिल्यानंतर मुलांमध्ये धाडसी लैंगिक प्रयोग करण्याची प्रवृत्ती कमी होते; जबाबदार लैंगिक संबंध ठेवण्याचं वय होईपर्यंत थांबण्याचं सामंजस्य त्यांच्यात निर्माण होतं. म्हणूनच वयात आल्यानंतर मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे आणि शाळेतूनच हे शिक्षण मिळालं तर ते योग्य ठरू शकतं.

sex, relationship, sexual
लैंगिक शिक्षण मुलांना वेळेतच आणि शाळेत मिळायला हवं

प्रश्न : माझ्या मुलाच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार आहेत. माझा मुलगा अवघा १४ वर्षांचा आहे. या वयात लैंगिक शिक्षण दिल्याने मुलाच्या मनावर त्याचे विपरीत परिणाम होतील व त्याचं अभ्यासावरचं लक्ष कमी होईल, अशी भीती मला वाटते. शिवाय या शिक्षणाची त्याला गरज तरी काय, असं मला वाटतं.

आणखी वाचा : सॅलीला सॅल्यूट! …एक धाव मदतकार्यासाठी!

उत्तर : लैंगिकता ही एक नैसर्गिक गोष्ट आहे; शरीरातील इतर क्रियाप्रक्रियांप्रमाणे सामान्य व गरजेची. वाढीच्या वयात लैंगिकतेबद्दल चुकीच्या गोष्टी ऐकण्याने लैंगिकता म्हणजे एक गैर, पतित गोष्ट आहे असा समज आपण करून घेतो. अनेकदा पालक, शिक्षक व धार्मिक उपदेशक लैंगिकतेच्या विरोधात मुलांची मानसिकता तयार करतात. याची परिणती लैंगिकतेचा दांभिक तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या रूपात होते. निसर्गत: उमलणाऱ्या निरागस कामऊर्जेबद्दल आपल्या मनात शत्रूपणाची आत्मघातकी भावना निर्माण होते. निसर्गाशी लढून जिंकणं अशक्य आहे; अशा वेळी मग त्यात विकृतीचा उगम होतो. स्त्रियांशी टिंगल करणे, अश्लील साहित्य वाचणे, चोरून ब्ल्यू फिल्म पाहाणे, समलिंगी संबंध ठेवणे, बलात्कार करणे ही या विकृतींची काही उदाहरणे. या विकृतींचा प्रतिबंध करायचा असेल तर योग्य वयात, योग्य व्यक्तींकडून, योग्य असं लैंगिक शिक्षण दिलं जाणं गरजेचं आहे.

आणखी वाचा : चॉकलेटमुळे फक्त मनच नाही त्वचेलाही वाटतं ‘फील गुड’

तुमच्या मुलाच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. ही सुवर्णसंधी दवडू नका. तुम्ही तुमच्या मुलाला स्वत: हे शिक्षण देऊ शकाल असे वाटत नाही. त्यामुळे त्याची शाळा जर अशा प्रकारचे प्रशिक्षण देत असेल तर त्याला आवर्जून पाठवा. मुख्य म्हणजे त्याचं वयही या ज्ञानासाठी अगदी योग्य आहे. साधारणपणे वयाच्या १३-१४ व्या वर्षी मुलामुलींमध्ये लैंगिकतेचा उगम होतो. मुलींना (काही वेळा तर त्याही आधी) मासिक पाळी सुरू होते व मुलांमध्ये पुरुषत्वाची लक्षणं दिसू लागतात. याच सुमारास अगदी नैसर्गिकपणे मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्यांच्या शरीरात एक नवीन गरज हळूहळू आकार घेऊ लागते. लैंगिक इच्छा, विचार, स्वप्न, उत्तेजना व त्यांचे शरीरावर उमटणारे परिणाम याची तीव्र जाणीव त्यांना होऊ लागते. या वेळी पालक, शिक्षक या अधिकृत सूत्रांकडून जीवनाच्या या नवीन पैलूंची शास्त्रोक्त माहिती मिळणंच योग्य. असं न झाल्यास मग आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मुलं अपरिपक्व मित्र, अश्लील साहित्य, ब्ल्यू फिल्म अशा माध्यमांची वाट धरतात. या मार्गांनी मिळवलेली अर्धवट व चुकीची माहिती मुलांवर विपरीत परिणाम घडवू शकते.

आणखी वाचा : स्पेनचा ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीच्या काळात सुट्टी देणारा ठरला पहिला युरोपियन देश

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (W.H.O.) ने केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, लैंगिक शिक्षण दिल्यानंतर मुलांमध्ये धाडसी लैंगिक प्रयोग करण्याची प्रवृत्ती कमी होते; जबाबदार लैंगिक संबंध ठेवण्याचं वय होईपर्यंत थांबण्याचं सामंजस्य त्यांच्यात निर्माण होतं. योग्य माहिती मिळाल्यामुळे फाजील कुतूहल, घातक प्रयोग करण्याची उत्सुकता व गैरसमजांमुळे आलेला न्यूनगंड यांना आळा बसतो व लैंगिकतेचा एक सहज – स्वाभाविक असा स्वीकार व्यक्तीमध्ये निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत मनाने त्याला या वर्गांना पाठवायला हरकत नाही.

आणखी वाचा : शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम

सेक्सविषयीचे प्रश्न विचारा बेधडक
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 07:42 IST
ताज्या बातम्या