लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे मुलीला मासिकपाळीची माहिती कधी द्यावी | sexual questions and answers at what age to give information about mensural cycle to a girl child vp-70 | Loksatta

लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मुलीला मासिकपाळीची माहिती कधी द्यावी?

कसलीही पूर्वकल्पना नसलेल्या अवस्थेत जेव्हा मुलीला अचानक पाळी येते तेव्हा तिला मानसिक धक्का बसू शकतो. त्याचा परिणाम तिच्या व्यक्तिमत्वावर होऊ शकतो. याउलट पहिली पाळी येण्याआधीच जर मुलींना त्याबद्दलची माहिती देण्यात आली, तर या नव्या अनुभवासाठी त्यांचं मन व शरीरही ते स्वीकारण्यासाठी तयार असतं.

लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मुलीला मासिकपाळीची माहिती कधी द्यावी?
अनेक अंधश्रद्धांनी मासिक पाळीसारख्या नैसर्गिक गोष्टींना विटाळ ठरवले!

प्रश्न : मी एका मुलीचा बाप आहे. माझी पत्नी तीन वर्षांपूर्वी वारली. माझी मुलगी ११ वर्षांची झाली आहे. तिला मासिक पाळीबद्दल अजून काहीही माहिती नाही. पहिली मासिक पाळी येण्याआधी तिला त्याबद्दल माहिती देण्याची गरज आहे का? माहिती द्यायची असल्यास नक्की काय माहिती द्यावी?

उत्तर : मुलीला पहिली पाळी येण्याआधी त्याबद्दलची पूर्वकल्पना देणं, हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. असं न केल्यास, कसलीही पूर्वकल्पना नसलेल्या अवस्थेत जेव्हा मुलीला अचानक पाळी येते तेव्हा तिला मानसिक धक्का बसू शकतो. अशा मानसिक आघाताचा परिणाम तिच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर होऊ शकतो. याउलट पहिली पाळी येण्याआधीच जर मुलींना त्याबद्दलची माहिती देण्यात आली, तर या नव्या अनुभवासाठी त्यांचं मन तयार होतं व जेव्हा कधी पाळी येण्याची घटना नेमकी घडते, त्या वेळी त्यांचं शरीरही ते स्वीकारण्यासाठी तयार असतं.

आणखी वाचा : आई व्हायचंय? तर प्रेग्नंसीसाठी ‘या’ दिवसात शरीरसंबंध ठेवणं महत्वाचं

तुमच्या मुलीला मासिक पाळीबद्दल खालील माहिती तुम्ही किंवा नात्यातल्या एखाद्या स्त्रीकडून द्यायला काहीच हरकत नाही. साधारणपणे वयाच्या १२ ते १४ च्या मधे प्रत्येक मुलींमधे मासिक पाळीच्या चक्राची सुरूवात होते. क्वचित ११ व्या वर्षी किंवा १५-१६ व्या वर्षी याची सुरुवात होऊ शकते. मासिक पाळीची सुरुवात होताच दर महिन्यात तीन ते पाच दिवस ओळीने मुलीच्या योनीमार्गातून रक्तस्त्राव होण्याची प्रक्रिया सुरू होते. यालाच पाळी येणं असं म्हणतात. रक्तस्त्राव होण्याच्या या दिवसांत या रक्तस्त्रावाला शोषून घेण्यासाठी म्हणून कापडाची घडी किंवा सॅनिटरी नॅपकिनचे पॅड योनीमार्गाशी ठेवावं (अथवा बांधावं) लागतं. ३ ते ५ दिवस हा रक्तस्त्राव झाल्यानंतर हळूहळू तो कमी होऊन अखेरीस थांबतो. त्यानंतर साधारणपणे २३ ते २५ दिवस रक्तस्त्राव होत नाही; पण त्यानंतर पुन्हा ४-५ दिवसांसाठी हा रक्तस्त्राव होण्याची पाळी येते. यालाच मासिक पाळी म्हणतात.

आणखी वाचा : दर अकराव्या मिनिटाला जगात एक स्त्रीहत्या! हत्या करणारे नातेवाईक किंवा जवळचेच- संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

प्रश्न : स्त्रीला मासिकपाळी का येते? ती येण्यासाठी कोणकोणत्या रासायनिक प्रक्रिया तिच्या शरीरात घडतात? मासिक पाळीचा स्त्री माता होण्याशी काय संबंध आहे?
उत्तर : मेंदूच्या तळाशी असलेल्या पिट्युटरी या ग्रंथीमधून वयाच्या १२ ते १४ च्या सुमारास ‘फॉलिकल स्टिमुलेटिंग हॉर्मोन’ (FSH) व ‘ल्युटिनाइझिंनगग हॉर्मोन’ (LH) हे दोन संप्रेरक (Hormones) निर्माण होऊ लागतात. फॉलिकल स्टिमुलेटिंग हॉर्मोन हा संप्रेरक रक्तावाटे स्त्रीच्या ओटीपोटात असलेल्या Ovaries म्हणजेच स्त्रीबीजग्रंथींपर्यंत पोहोचताच स्त्रीबीजग्रंथींना चालना मिळते व त्यांमधे स्त्रीबीज (Ovum) परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरू होते. दर महिन्याला केवळ एक परिपक्व स्त्रीबीज स्त्रीबीजग्रंथींमधे तयार होत असतं. या परिपक्व स्त्रीबीजाशी पुरुषाच्या शुक्रजंतूचं मीलन होण्याने गर्भधारणा होते. गर्भधारणा न झाल्यास अफलित बीज कोमेजून (disintegrate) जातं व मासिकपाळीच्या रक्तस्त्रावामार्गे शरीराबाहेर फेकून दिलं जातं. परिपक्व होत असलेलं स्त्रीबीजच इस्ट्रोजन हा संप्रेरक निर्माण करते. इस्ट्रोजन या संप्रेरकामुळेच मुलीच्या शरीरात स्त्रीत्वाची लक्षण (secondary sexual characteristics) निर्माण होऊ लागतात. या संप्रेरकामुळेच तिच्या शरीराचा आकार व बांधा स्त्रीसुलभ होऊ लागतो. ज्या ‘ग्रॅफियन फॉलिकल’मध्ये स्त्रीबीज परिपक्व होण्याची प्रक्रिया घडते, त्या फॉलिकलमधून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडताच त्याच्या अवशेषांमधून म्हणजेच Corpus Luteum मधून प्रोजेस्ट्रॉन हे दुसरे संप्रेरक निर्माण होऊ लागते.

आणखी वाचा : समुपदेशन: मुलीचं बालपण अकाली संपवत नाहीत ना?

इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन ही दोन स्त्री-संप्रेरके दर महिन्याला गर्भाशयामधेही काही बदल घडवून आणत असतात. दर महिन्यात पाळीचा रक्तस्त्राव थांबताच इस्ट्रोजनच्या प्रेरणेने गर्भाशयाची अंत:त्वचा हळूहळू जाड होऊ लागते. गर्भधारणा झालीच तर फलित स्त्रीबीज रूजू होण्यास योग्य अशी ही पूर्वतयारी गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये घडवून आणण्याचं काम इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन ही दोन संप्रेरके करतात. पण गर्भधारणा नाही झाली, तर गर्भाशयाची ही अंत:त्वचा पाळीच्या रक्तस्त्रावामार्गे बाहेर टाकली जाते. रक्ताचं माध्यम वापरून, पाळीच्या रक्तस्त्रावामधून गर्भाशयाची अंतःत्वचा व फलित न झालेलं स्त्रीबीज हे दोन्ही शरीराबाहेर फेकले जातात. अशा तऱ्हेने दर महिन्यात स्त्रीच्या शरीरात गर्भधारणेच्या उद्देशाने अशा प्रकारच्या या घडामोडी घडत असतात. पाळी येण्याच्या वयात दर महिन्याला स्त्रीचं गर्भाशय व स्त्रीबीजकोश संभाव्य गर्भधारणेची सर्व तयारी करण्यात अशा तऱ्हेने सतत व्यग्र असतात. अर्थातच, पाळी येणं हे त्यामुळेच एक निसर्गदत्त लक्षण आहे.

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

प्रश्न विचारा बेधडक !
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 11:04 IST
Next Story
आई व्हायचंय? तर प्रेग्नंसीसाठी ‘या’ दिवसात शरीरसंबंध ठेवणं महत्वाचं