scorecardresearch

Premium

समुपदेशन: शरीरसंबंधांचं वय असतं का?

वय झालं, की अनेकांच्या तोंडी निवृत्तीची भाषा येते. त्यात शारीरिक संबंधांचाही समावेश असतो, बहुतांशी स्त्रियांना ते नकोच वाटतं. पण खरंच यासाठी वय आ़डवं येतं की मानसिकता?

Sexual relation, feelings between aged couple
शरीरसंबंधांचं वय असतं का? (प्रातिनिधिक छायाचित्र)

“ये चित्रा, खूप दिवसांनी आलीस. तुझा फोन आल्यानंतर मला एवढा आनंद झाला, की तू केव्हा एकदा भेटतेस असं झालं होतं, शाळा-कॉलेजच्या दिवसांत तर आपल्याला एकमेकींना भेटल्याशिवाय एक दिवसही चैन पडायचं नाही. प्रत्येक क्षण आपण एकमेकींना शेअर करायचो, पण आता बघ ना, तुझा संसार, माझा संसार. आपण पुरते अडकून गेलो, आयुष्याच्या वळणावर अनेक मित्र-मैत्रिणी भेटल्या पण, सख्खी मैत्रीण वेगळीच असते. मनात घरं करून बसलेली.”

“खरं आहे रेवती, आपण एकमेकींना आता भेटत नसलो तरी, आपल्यातील नातं त्याच ओढीचं आहे, मनातून आपण एकमेकींच्या अगदी जवळ असतो. त्यासाठी प्रत्यक्ष भेट व्हायलाच हवी, असं काही नसतं गं.”

dr Abhishek Somani
आई- बाबांच्या वागणुकीचा मुलांवर होतो परिणाम- डॉ. अभिषेक सोमाणींचे मत
women mental health isses
Mental Health Special: स्त्रियांच्या मानसिक समस्या
Women, menopause problems sex relations partner
कामजिज्ञासा: मेनॉपॉजच्या काळात शरीरसंबंधांचा त्रास होतोय?
mental states skin disorders related
Health Special: मानसिक स्थिती आणि त्वचाविकार यांचा संबंध असतो का?

खूप काळाने भेटल्यामुळं चित्रा आणि रेवतीच्या गप्पा सुरु होत्या, मागील आठवणी काढून खूप हसत होत्या, आणि काही प्रसंगाच्या आठवणी काढून डोळ्यांतील अश्रूही बाजूला सारत होत्या. त्यांच्या भेटीचा आवेग थोडा ओसरल्यावर रेवती म्हणाली, “ अगं चित्रा, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून तू आलीस, असं काय बोलायचं होतं तुला माझ्याशी?”

हेही वाचा… पालकत्वः तुमची मुलं आहेत समाधानी?

आत्तापर्यंत मोकळेपणाने हसून गप्पा मारणारी चित्रा थोडी गंभीर झाली. आपल्या मनातील सल हिला सांगावेत का? खरं तर मनातील गोष्टी आपण जवळच्या मैत्रिणीकडंच बोलू शकतो, पण ही व्यथा ती तरी समजून घेईल का? तिला काय वाटेल? चित्रा स्वतःच्याच विचारांत मग्न झाली, पण आज हिंमत करून बोलायचंच असं तिनं ठरवलं, “रेवती, माझी आता पन्नाशी उलटली, आयुष्यातील सर्व सुख-दु:ख अनुभवली. मुलांची लग्नं झाली नातवंड आली. माझी नोकरी मी स्वेच्छेने संपवली आणि नवराही नोकरीतून निवृत्त झाला. आता रिटायरमेंट लाईफ म्हणजेच आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला आणि या वयात त्याला वाटतं, मी त्याच्या सतत आजूबाजूला असावं. त्या वेळी धावपळीच्या जीवनात जे करायला मिळालं नाही ते आता करावं. माझं आध्यात्मिक वाचन, पारायण करणं नेहमी चालू असतं आणि त्याला माझ्याकडून ते सर्व सुख हवं असतं, जे मला पाप वाटतं. अशा सुखात आता अडकायचं नाही असं मी ठरवते, त्याच्या जवळ झोपणंही मला योग्य वाटत नाही. आता आपण गृहस्थाश्रमातून बाहेर पडून संन्यासाश्रमाकडे चाललो आहोत त्यामुळे या सर्व इच्छांचे दमन करायला पाहिजे, असं मी त्याला अनेक वेळा सांगितलं परंतु त्याला माझं म्हणणं पटत नाही. बाकी सर्व काही चांगलं आहे,आमच्या दोघांचं आरोग्यही उत्तम आहे. अगदी सर्व काही दृष्ट लागण्यासारखं आहे, पण रोज या विषयावरून आमचे मतभेद होतात. मी कधी जवळ गेलेच तर माझीच मला लाज वाटू लागते. काय करावं मला काही कळत नाही, पण तूच सांग, या वयात हे बरं दिसतं का? या वयात देवधर्म करायचा सोडून हे करायचं का?”

हेही वाचा… गच्चीवरची बाग: सुगंधाचे गंधकोष मरवा, दवणा…

चित्राच्या मनात काय चाललं आहे, हे रेवतीच्या लक्षात आलं. लहानपणापासून ती कोणत्या वातावरणात वाढली, हे तिनं पाहिलं होतं. सॅनिटरी पॅड आणताना काळ्या पॉलिथिनमध्ये किंवा वर्तमान पत्रात गुंडाळून ती आणायची, स्त्रियांनी आपली अंतर्वस्त्र इतर कपड्यांखाली झाकून सुकवायची, लैंगिकता या विषयावर कधीही उघडपणे बोलायचं नाही, असे विचार तिच्या घरात होते. चित्राने सायन्सचे शिक्षण घेतले, नोकरी केली आणि समाजात एवढे अनुभव घेतले, पण तरीही पारंपरिक विचारांचा पगडा तिच्या मनात किती घट्ट रुजून बसला आहे, याचा तिला अंदाज आला, तिला या विचारसरणीतून बाहेर काढणं गरजेचं होतं.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’

“चित्रा, लैंगिक भावना आणि लैंगिक कृती यांना तू पाप समजते म्हणून तुझ्या मनात असे विचार येतात. भूक, तहान, निद्रा यांसारखी कामक्षुधा ही सहाजिक आणि नैसर्गिक आहे. लैंगिकता हे सृष्टीतील मूलभूत तत्व आहे. एक नैसर्गिक आविष्कार आहे. फुल बहरणं, वृक्ष फळाफुलांनी लगडणं, पक्षांचं कुंजन हे सर्व लैंगिकतेचे वेगवेगळे अविष्कार आहेत किंबहुना निसर्गातलं सारं सौंदर्यचं मुळी लैंगिकतेमुळे आहे. कामतृप्ती हे शरीराचं नैसर्गिक कार्य आहे, त्याचा आणि नीतीचा काहीही संबंध नाही. इतर शारीरिक क्रियांप्रमाणे ती एक क्रिया आहे,त्यामुळं या वयात या भावना निर्माण होणं म्हणजे पाप आहे हे मनातून काढून टाक. नैसर्गिक भावना या प्रत्येकालाच असतात, पण त्यांना निती-अनिती च्या चौकटीत बसवून आपण आपल्या नैसर्गिक भावनांचे दमन करतो. या वेळी, या वयात करणं योग्य नाही, स्त्रियांनी तर या बाबतीत संकोच दाखवला पाहिजे, अशा अपेक्षा समाजाने तयार केल्या आहेत, त्याचा सतत मारा समाजातून झाल्याने त्या मागचे शास्त्र विचारात घेण्याचे आपण विसरून गेलो आहोत. मुलं झाली की संसार झाला. वय झालं म्हणजे नैसर्गिकरित्या आपली कामवासना कमी होते, असं आपण समजतो पण यात नैसर्गिकतेपेक्षा मानसिकतेचा भाग जास्त आहे. आपण मनाने अशी समजूत करून घेतो त्यामुळे शरीर निरोगी असूनही कामवासना नकोशी वाटते. पण आपल्या जोडीदाराच्या इच्छेचा विचार करून दोघांना ते सुख अनुभवता येत असेल तर त्यात गैर काय आहे, उलट त्यामुळे शारीरिक आणि मानसिक सुदृढता टिकून राहते. वय झालं म्हणून हे सुख अनुभवणं चुकीचं हे विचार मनातून काढून टाक.”

रेवती बोलत होती आणि चित्रा अवाक होऊन सर्व ऐकत होती. इतक्या जवळच्या मैत्रिणी असून आपण आपल्या अंतरंगातील कप्पे कधी उलगडलेच नव्हते आणि या विषयावर इतक्या सहजतेने कधी बोललोही नव्हतो, पण रेवतीशी मोकळेपणाने बोलल्यावर तिला छान वाटलं. आपण करतोय ते पाप नाही ती एक सहज नैसर्गिक भावना आहे, हे पटल्यानं तिच्या मनावरचं ओझंही हलकं झालं. आणि शांत मनाने ती घराकडे, नवऱ्याकडे निघाली.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sexual relation feelings between aged couple dvr

First published on: 02-10-2023 at 13:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×