Sexual Violence Survey by WHO : गेल्या काही दिवसांपासून भारतात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, संपूर्ण जगभरातच ही परिस्थिती असल्याचं द लॅन्सेट चाइल्ड अँड ॲडॉलेसेंट हेल्थ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार सिद्ध होत आहे. प्रेमसंबंधात असलेल्या किंवा बालविवाह झालेल्या १५ ते १९ वयोगटातील मुली सर्वाधिक लैंगिक हिंसाचाराला बळी पडतात, असं या अभ्यासातून समोर आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.

जवळपास १६ टक्के म्हणजेच प्रत्येक सहाव्या मुलीमागे एकजण या लैंगिक हिंसाचाराने (Sexual Violence) त्रस्त आहे. WHO च्या लैंगिक, पुनरुत्पादक आरोग्य आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. पास्केल ॲलोटे यांनी नमूद केले की जगभरातील लाखो तरुण स्त्रियांवर त्यांच्या जोडीदाराकडूनच अत्याचार केला जातो.

हेही वाचा >> Women Need More Sleep: पुरुषांपेक्षा महिलांनी ‘इतके’ मिनिटं जास्त झोपावे? यामागचं नेमकं कारण काय? पाहा संशोधन नेमकं काय सांगते…

जोडीदाराकडून हिंसाचार झाल्यास महिलांच्या आरोग्यावर परिणाम

जोडीदाराकडूनच हिंसाचार (Sexual Violence) झाल्यास आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यामुळे दुखापती, नैराश्य, चिंताग्रस्त विकार, अनियोजित गर्भधारणा, लैंगिक संक्रमित संसर्ग आणि इतर अनेक शारीरिक आणि मानसिक परिस्थिती वाढण्याची शक्यता असते. संपूर्ण जगभरात अशी परिस्थिती आढळते. परंतु, काही देशांमध्ये हे सर्वाधिक प्रमाणात आढळतं असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. ओशियानामध्ये ४७ टक्के महिलांवर हिंसाचार होतात तर, मध्य उप-सहारा आफ्रिकेत ४० टक्के होतात. सर्वांत कमी दर युरोपमध्ये असून येथे १० टक्क्यांवर हे प्रमाण आहे. तर, मध्य आशियात ११ टक्के आहे. तसंच, ज्या ठिकाणी महिला शिकत नाहीत, कमवत नाहीत अशा प्रदेशात जोडीदाराकडून लैंगिक हिंसाचार सामान्य मानले जातात.

जगात बालविवाहाची स्थिती गंभीर

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेने शाश्वत विकास लक्ष्यांच्या अनुषंगाने २०३० पर्यंत महिला आणि मुलींवरील हिंसाचार (Sexual Violence) दूर करण्याच्या मार्गावर सध्या कोणताही देश नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, जागतिक स्तरावर प्रत्येक पाच मुलीमागे एकीचा बालविवाह होत असतो. बालविवाह प्रथा थांबवणे, मुलींना निदान माध्यमिक शिक्षण दिल्याने तरुण मुलींवरील लैंगिक हिंसाचार कमी होतील, असाही निष्कर्ष WHO ने म्हटले आहे.

हेही वाचा >> Investment in Women : “भारतातील महिलांमध्ये योग्य गुंतवणूक केल्यास, जगाचा फायदा होईल”, प्रसिद्ध गुंतवणूकदाराचा नेमका दृष्टीकोन काय?

बालविवाह रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मार्गदर्शक तत्वे जारी होणार

“लिंग-आधारित हिंसाचार (Sexual Violence) संपवण्यासाठी सर्व देशांनी महिला आणि मुलींसाठी समानता वाढवणारी धोरणे आणि कार्यक्रम आखणे आवश्यक आहे”, असं जागतिक आरोग्य संघटनेमधील लेखिका डॉ. लिनमरी सार्डिन्हा म्हणाल्या. “याचा अर्थ सर्व मुलींसाठी माध्यमिक शिक्षण सुनिश्चित करणे, दोहोंनाही संपत्तीचा अधिकार देणे आणि बालविवाहासारख्या हानिकारक प्रथा बंद करणे गरजेचं आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या. एवढंच नव्हे तर बालविवाह प्रथा रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून नवे मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत.