आज महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. तरीदेखील आज समाजात काही ठिकाणी महिलांना कमी लेखलं जातं. आधुनिक काळात जर ही परिस्थिती असेल तर पूर्वी स्त्रियांच्या सन्मानाविषयी कशी परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. परंतु अशा परिस्थितीवर मात करून काही महिलांनी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं आणि भारताच्या इतिहासात आपला ठसा उमटवला आहे.

आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत- ज्यांनी अशी काही कामगिरी केली आहे की जे काम भल्याभल्यांना जमलं नाही. ते काम त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडलं आहे. कदाचित हे नाव आपणा सर्वांना परिचित नसेल किंवा नवीनदेखील असेल. पण सिव्हिल इंजिनिअर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांसाठी हे नाव प्रेरणास्थानी आहे. ते नाव म्हणजे शकुंतला भगत.

हेही वाचा – Vinesh Phogat : गावची खेळाडू सून राजकीय आखाड्यात; विनेश फोगटच्या सासरची मंडळी म्हणतात, “तिच्या लग्नावेळी…”

शकुंतला भगत या भारतातील पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यांनी त्यांचे शिक्षण वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट, आयआयटी मुंबई येथून घेतले. तसेच १९६४ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. शकुंतला यांचे वडील एस. बी. जोशी हेदेखील त्याकाळचे ख्यातनाम इंजिनिअर होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने संशोधन करून त्यावर तोडगा काढण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. पुढे त्यांचा विवाह अनिरुद्ध यांच्याशी झाला तेदेखील पेशाने इंजिनिअरच.

लग्नानंतर काही काळ त्यांनी आयआयटी मुंबईमध्ये नोकरी केली. नंतर त्यांनी १९७० मध्ये पतीसोबत एक पूल बांधणारी ‘क्वाड्रिकॉन’ (Quadricon) नावाची कंपनी स्थापन केली. सुरुवातीला एक महिला म्हणून त्यांना थोडाफार विरोध सहन करावा लागलाच, पण शकुंतला यांचे बुद्धीकौशल्य आणि चिकाटीपुढे कुणाचेच काही चालले नाही. पुढे १९७२ मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पितीमध्ये पहिले दोन पूल उभारले, तेही अवघ्या चार ते पाच महिन्यांत. त्यांची कामाची पद्धत आणि शैली पाहता त्यांना पूल बांधणीची आणखी कामे मिळाली व १९७८ पर्यंत त्यांनी भारतातच हिमाचल प्रदेश ते अरुणाचल प्रदेशपर्यंत जवळपास ६९ पूलांची निर्मिती केली. तर भारत आणि जगभरातील पूल बांधणीची संख्या २०० इतकी आहे.

हेही वाचा – नऊ वर्षाची श्रेयोवी मेहता कशी ठरली ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकणारी भारतातील सर्वात तरुण मुलगी?

शकुंतला यांनी आपल्या कामाने सिव्हिल इंजिनिअर क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्या या कर्तबगारीमुळेच त्यांना मॉडर्न इंजिनिअरिंगचे महारथी म्हटलं जाऊ लागलं. पुढे शकुंतला यांनी यूके, यूएस, जर्मनी या देशांतील काही मोठमोठे प्रोजेक्ट व्यवस्थितरित्या पूर्ण केले. सिमेंटवर संशोधन करण्यातदेखील त्यांचे मोठे योगदान आहे. इंडियन रोड क्रॉसच्या देखील त्या सदस्या होत्या. १९७२ मध्ये त्यांना ‘‘युनिशिअर कनेक्टर’ (Unishear connectors) या त्यांच्या संशोधनासाठी इन्वेंशन प्रमोशन बोर्ड (Invention Promotion Board) तर्फे सन्मानित करण्यात आले. या योगदानाबद्दल त्यांना १९९२ मध्ये ‘वूमन ऑफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले. भारताच्या या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअरचे १४ ऑक्टोबर २०१२ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं.