सध्या देशभरात एका ‘गोल्डन गर्ल’ची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा ॲथेलिटक्समध्ये सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या या गोल्डन गर्लचं नाव आहे शर्मिला धनखड. आपल्या असामान्य कामगिरीनं तिनं फक्त तिचीच नाही तर संपूर्ण देशाची मान जगभरात उंचावली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा ॲथेलिटक्समध्ये शर्मिलानं गोळाफेकच्या F57 प्रकारात सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरा ॲथेलिटक्समध्ये ही कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. शर्मिलाच्या कामगिरीमुळे पॅरा ॲथेलिटक्समध्ये गेल्या २० वर्षांपासून असलेला सुवर्णपदकाचा दुष्काळही संपला आहे. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या शर्मिलाच्या या यशामागे प्रचंड संघर्षाची आणि अफाट जिद्दीची पार्श्वभूमी आहे. लहानपणी पोलिओमुळे आलेलं अपंगत्व, आर्थिक अडचणी, वैयक्तिक आयुष्यातील फरफट… तरीही शर्मिला यांनी हार मानली नाही. जिद्दीनं त्या संकटांवर मात करत राहिल्या आणि त्यामुळेच आज यशाच्या शिखरावर पोहोचल्या.

शर्मिला यांचा जन्म मूळच्या हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील छितरौली येथे झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील तीन मुलींपैकी शर्मिला दुसऱ्या क्रमांकाची मुलगी. शर्मिलाला वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रचंड ताप आला आणि त्यातच पोलिओ होऊन त्यांचा डावा पाय बाधित झाला. वडील शेतकरी तर आई अंध होती. या दोघांनीच त्यांचं पालनपोषण केलं. १८ व्या वर्षी शर्मिला यांचा विवाह झाला. पण लग्नानंतर शर्मिला यांना सासरच्या घरी प्रचंड जाच सहन करावा लागला. हुंड्यासाठी त्यांना कित्येकदा मारहाण, शिवीगाळ सहन करावी लागली. कित्येकदा त्यांच्या मनात आयुष्य संपवण्याचाही विचार आला. पण उद्या नक्की काहीतरी चांगले घडेल या आशेवर त्या जगत राहिल्या.

शारीरिक आणि मानसिक त्रास असह्य झाल्यावर शर्मिला यांनी आपल्या नवऱ्याचं घर सोडलं आणि ती त्यांच्या आईवडिलांकडे आल्या. कुटुंबाच्या भक्कम साथीच्या आधारावर शर्मिलानं त्यांच्या आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू केला. पण आर्थिक प्रश्न कायम होताच. स्वत:चे आणि मुलींचं पोट भरण्यासाठी या काळात शर्मिला यांनी मिळतील ती कामं केली. अगदी लोकांच्या घरी धुणी-भांडी करण्यापासून ते मुलं सांभाळणाऱ्या आयापर्यंत कामं केली. २८ व्या वर्षी शर्मिलाचं दुसरं लग्न झालं. तिचे दुसरे पती अजित सिंह यांनी आपली पत्नी काहीतरी वेगळं करू शकते असा विश्वास होता. त्यांनी तिला आधार तर दिलाच, पण पॅरा ॲथेलिटक्समध्ये सहभागी होण्यासाठी हिंमत दिली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच शर्मिलाही गोळाफेकीत प्रशिक्षण घेता येईल का याचा शोध घेऊ लागली. अशाच एका प्रशिक्षणाबद्दल समजल्यामुळे त्या तुलाराम स्टेडियमवर गेल्या. तिथं त्यांचे नातेवाईक टेकचंद यांच्याशी तिची भेट झाली. टेकचंद स्वत: पॅरा ॲथेलिट आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. तेच त्यांचे कोचही झाले.

जेव्हा शर्मिला यांनी पहिल्यांदा शॉट पुट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो फक्त ५ मीटरपर्यंतच गेला होता. पण हार मानायची त्यांच्या स्वभावातच नव्हतं. तिनं अखंड सराव केला. तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. एका वर्षाच्या आतच त्यांनी नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकलं. नॅशनल चॅम्पियनशीपनंतर शर्मिला २०२२ च्या बर्मिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाल्या होती. तिथे त्या F75 शॉट पुट या प्रकारात चौथ्या स्थानावर होत्या. या संपूर्ण प्रवासात पती आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा भक्कम पाठिंबा मिळाला. अखंड संघर्ष करणाऱ्या आईला पाहून त्यांच्या मुलींनाही बळ मिळालं. आईच्या यशासाठी त्यांच्या मुलींनी त्यांना भक्कम साथ दिली. सरावातील सातत्यामुळे खेळात सुधारणा घडवली आणि २०२५ मध्ये बंगळुरूमध्ये झालेल्या ओपन पॅरा ॲथेलिटक्स चॅंपियनशीपमध्ये ९.७७ मीटरचा थ्रो करून सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर २०२६ मध्ये फज्जा इंटरनॅशनल पॅरा ॲथेलिटक्स चँपियनशीपमध्ये F57 शॉट पुट प्रकारात ८.८६ मीटर थ्रो करून सुवर्णपदक आणि F57 थाळीफेकमध्ये कांस्यपदक जिंकलं.

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर शर्मिलाची प्रतिक्रिया बघून अनेकांचे डोळे भरून आले. त्यांचं यश आपल्या आईला अर्पण केलं आहे. असंख्य अडचणी, सामाजिक संघर्ष, नातेवाईकांचे टोमणे यांत आपल्या आईनं आपल्याला भक्कम साथ दिली म्हणूनच आपण हे यश मिळवू शकलो असं तिनं म्हटलं. संधी नाही म्हणून शर्मिला रडत कुढत बसल्या नाहीत. घरगुती हिंसाचार, सामाजिक बंधनं, प्रतिकूल परिस्थितीतही आशेची ज्योत तेवत ठेवली आणि संधी मिळाल्यावर त्या संधीचं सोनं केलं. त्यामुळेच शर्मिलाची कहाणी ही फक्त एका संघर्षाची कहाणी नाही तर ती लाखो महिलांसाठी प्रेरणादायी आहे.