-डॉ. स्मिता प्रकाश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ नलिनी, बघितलंस, नवरोबाचा, सुजयचा मेसेज आलाय, होमलोनसाठी पैसे कमी पडत आहेत, ५०,००० रुपये ट्रान्सफर कर.’ दोन महिन्यांपूर्वी त्यानं माझ्याकडून ४० हजार रुपये घेतले होते, त्यातील १० हजार अजूनही मला परत करणं बाकी आहे, तरीही आता पुन्हा पैशांची मागणी. याला फक्त माझ्याकडून पैसे काढायचे असतात.”

“ सलोनी अगं, त्याला काहीतरी अडचण असेल म्हणून त्यानं तुझ्याकडं पैशाची मागणी केली असेल ना?.”
“ त्याची अडचण नेहमीच असते. मागच्या महिन्यात सासऱ्यांचं आजारपण झालं, या महिन्यात सासूबाईंचं आजारपण आणि नणंदेच्या घरचा कार्यक्रम झाला, मग पैसे कमी पडले की, घराचे हप्ते फेडणं जमतं नाही, प्रत्येक वेळी काहीतरी कारणं चालूच असतात, त्यानं आधीच या सगळ्याची व्यवस्था करायला नको का?”

“अगं, पण आजारपण काही सांगून येतात का? काही अडचणी ऐनवेळीचं येतात, त्यातून मार्ग काढवाच लागतो.”

आणखी वाचा-Forbes India: ‘फोर्ब्स’च्या यादीमध्ये या ‘पाच’ प्रसिद्ध अन् यशस्वी महिलांची वर्णी; जाणून घ्या

“ ऐन वेळी येणाऱ्या अडचणीसाठीही पैशांची व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते. सासू सासरे दोघांचाही मेडिक्लेम आहे, पण अगोदर खर्च याला करावा लागतो, मग तेवढे पैसे बाजूला काढून ठेवायला हवे. लग्न समारंभ, नातेवाईकांचे कार्यक्रम हे सगळं असणारच, त्याचाही फंड वेगळा ठेवायला हवा, नियोजन काहीतरी असायला हवं, सतत बायकोच्या पैशावर डोळा कशाला? ”

“सलोनी, अगं तू कुणी वेगळी आहेस का? लग्न झाल्यानंतर त्याचे नातेवाईक तुझे कुणी नाहीत? घरखर्चासाठी थोडा हातभार तू लावलास तर बिघडलं कुठं? आणि त्याच्या सर्व खर्चाचं नियोजन करून त्यानं २ बीएचके फ्लॅट घ्यायचं ठरवलं होतं, तुझ्या हट्टासाठी त्यानं ३ बीएचके फ्लॅट बुक केला, मग हप्ते भरताना त्याची आता ओढाताण होत आहे, तर तू त्याला मदत करणं अपेक्षित आहे, शिवाय घरावर तुझंही नाव आहेच, मग ती तुझी जबाबदारीही आहे. ”

“ नलिनी, तू त्याची मैत्रीण आहेस की माझी? तू तर त्याच्याच बाजूनं बोलते आहेस.”

“ मी तुझी मैत्रीण आहे, म्हणूनच तू कुठं चुकतं आहेस ते मला सांगायचंय.”

आणखी वाचा-तालिबान सरकारकडून अफगाणिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन; घराबाहेर पडण्यास महिलांना वाटते भीती

“ नलिनी, पण लग्नाच्या अगोदर त्यानं मला सांगितलं होतं की, मला तुझ्या पैशांची गरज नाही, तू नोकरी केलीच पाहिजेस असं नाही, तू काही कमवलंस तरी, तुझे पैसे तू इन्व्हेस्ट कर, मग आता त्याची अपेक्षा का आहे? जसं आमचं ठरलंय त्याचप्रमाणे मी वागते आहे, मग माझं कुठं चुकतंय? आणि घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी नवऱ्याचीच असते ना? त्यातच त्याचा पुरूषार्थ असतो.”

“ सलोनी, लग्न झाल्यानंतर हा तुझा पैसा- हा माझा पैसा असं काही नसतं आणि नसावं. संसार तुमच्या दोघांचा आहे, मग संसाराची जबाबदारीही दोघांनी घ्यावी. तुम्हा मुलींना स्त्री पुरुष समानता हवी आहे, प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषासोबत काम करू शकते, असं तुम्हीच म्हणता ना, मग संसारातील आर्थिक जबाबदाऱ्या घेताना, पुरुषानंच सर्व करायला हवं हा अट्टाहास का? संसाराच्या अडीअडचणीत पत्नीनं त्याला बरोबरीनं साथ द्यायला हवी, तुम्ही दोघंही बरोबरीनं कमावता, मग आर्थिक जबाबदारीही बरोबरीनं घ्यायला हवी. त्यानं तुला मदत मागितली तर ‘तुझ्या पैशांवर त्याचा डोळा’ असं तुला का वाटतं? त्याचं सर्व आहे ते तुझं, मग तुझं सर्व आहे त्याच्यावर त्याचा अधिकार का नसावा? घरातील आर्थिक जबाबदाऱ्यांचं ओझं त्यानं एकट्यानंच पेलावं असं तुला का वाटतं?”

आणखी वाचा-स्त्री आरोग्य : सलाइन लावल्यावर ‘लो’ बीपीचा त्रास कमी होतो?

नलिनी जे जे बोलत होती ते सर्व खरं तर सलोनीला पटतं होतं. तिनं घरात पैसे द्यायलाच हवेत, असा सुजयनं कधीही अट्टाहास केला नाही, अडीअडचणीच्या वेळी पैसे मागितले तरी तिचे सर्व पैसे जमेल तसं तो परत करीत होता, तिच्या पगाराचं ती काय करते, याबाबतही कधीही विचारणा करीत नव्हता. कुठंही ट्रीपला गेलं, मजा करायला बाहेर हॉटेलमध्ये गेलो तरीही तो तिच्याकडं पैसे मागायचा नाही,आणि हे सर्व त्यानं करायलाच हवं, हे मात्र ती गृहीत धरून चालली होती, याशिवाय तिचा स्वतःचा प्रवास खर्च, वैयक्तिक खर्च ती स्वतः करते आणि यासाठी त्याला काहीच खर्च करावा लागत नाही म्हणून त्यानं गिफ्ट्स देत राहावीत, अशीही तिची अपेक्षा असायची. आपलं चुकतंय हे तिच्याही लक्षात आलं. जरा जास्त खोलात जाऊन आत्मपरिक्षण केल्यानंतर तिला अनेक गोष्टी जाणवल्या. मग तिनं त्याला ५० हजार रुपये ट्रान्सफर केलेच आणि मेसेज टाकला,
“ माझे आणि तुझे पैसे वेगळे नाहीत हे माझ्या आता लक्षात आलं आहे., मी तुझ्यासोबत आहे आणि कायम राहीन, काळजी करू नकोस, आय लव्ह यू.”

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should the division of money between husband and wife be like yours and my money and how much mrj
First published on: 19-02-2024 at 16:18 IST