यशस्विनी ती उगवत्या सूर्याच्या देशात | shrunali ranade went to japan and had her successful career vp-70 | Loksatta

यशस्विनी : ‘ती’ उगवत्या सूर्याच्या देशात! (पूर्वार्ध)

कॅम्पस इंटरव्ह्यू मधून सर्वाधिक पगार देणाऱ्या ड्रीम कंपनीत सिलेक्ट झालेली श्रुणाली रानडे सांगते आहे मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातल्या तिच्या करिअरविषयी आणि जपान अर्थात उगवत्या सूर्याच्या देशातील अनुभवाविषयी…

यशस्विनी : ‘ती’ उगवत्या सूर्याच्या देशात! (पूर्वार्ध)
जपानमधला साकुरा म्हणजे चेरीब्लॉसम सीझन खूपच प्रसिद्ध आहे. तो आठवडय़ाभरासाठीच असतो.

श्रुणाली रानडे

मी मुळची पुणेकर. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे (COEP) मधून मी बी.टेक. – मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये कॉलेजमध्ये मी सातवी आले होते. दरम्यान झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एबारा (EBARA) या कंपनीत नोकरी मिळाली. कॅम्पस प्लेसमेंटसाठी ही
कंपनी तीन वर्षे येत असली, तरीही त्यांनी भारतातून एकाही मुलीची निवड केली नव्हती. कदाचित माझ्या बायोडेटामधला मी आठ वर्षांपूर्वी जपानला जाऊन आले होते, हा तपशील त्यांना रुचला असेल. एमईएस बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत असताना जपानमधील इंटरनॅशनल एन्व्हायर्नमेंटल समिटसाठी भारतातून माझी निवड झाली होती. त्या आठवडाभराच्या परिषदेसाठी माझ्यासोबत आणखी एक विद्यार्थी आणि शिक्षिका होत्या. एकूण ३० देशांतून दोन विद्यार्थीच निवडले होते. त्या परिषदेत आपापल्या देशातील पर्यावरणविषयक समस्या मांडून त्यावर उपायही सुचवायचे होते. त्याचवेळी पर्यावरणमंत्र्यांची आंतरराष्ट्रीय परिषद होती. तिथपर्यंत या समस्या आम्हाला पोहोचवायच्या होत्या. त्यासाठीही माझी निवड झाली. त्या वेळी आम्ही भारतातील प्लॅस्टिकच्या समस्येचा मुद्दा मांडला होता.

आणखी वाचा : श्याम बेनेगलांनी लीड रोल दिला नाही, तर कमर्शिअल चित्रपटवाले कसे देणार? – नीना गुप्ता

तर त्यानंतर एस.पी. कॉलेजमध्ये ज्युनिअर कॉलेजच्या वर्षांत मी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन हा विषय घेतला होता, कारण ते माझ्या बाबांचं क्षेत्र होतं. पुढं सीओपीमध्ये प्रवेश मिळणं ही खूप अवघड गोष्ट असते. मनातून हेच कॉलेज हवं होतं. त्यामुळं तिथंच प्रवेश मिळून मेकॅनिकल इंजिनीअरिंग विषय घेता आल्यानं खूप आनंद झाला. माझी नोकरीही मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधलीच आहे. सामान्यपणे या क्षेत्रात
प्रॉडक्शन आणि डिझाइनिंग असे दोन विभाग असतात. मी डेव्हलपमेंटमध्ये काम करते. त्यात माझ्या डिपार्टमेंटमध्ये डिझाइनिंगपासून टेस्टिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. मी सॉफ्टवेअरमध्येही काम करते आणि फॅक्टरीतही जाते. बहुतांश वेळा मुली मेकॅनिकलला जाऊनही डिझाईन निवडतात. मला दोन्ही गोष्टींची लहानपणापासून आवड होती. पहिल्यापासूनच मला घरच्यांचा भक्कम पाठिंबा होता. पुढं जपानमध्ये जायचं ठरल्यावर सुरक्षेचा काहीचप्रश्न नव्हता. फक्त घर शोधावं लागलं असतं तर कदाचित त्याचा थोडा विचार केला गेला असता. पण कंपनीनं घराची सोय केल्यानं तोही प्रश्न आला नाही. याआधी पुण्याबाहेर मी फारशी कधी गेले नव्हते. निवडीनंतर फायनल मुलाखत जपानमध्येच द्यायची असते. तिथल्या फॅक्टरीज आणि त्यांच्या संस्कृतीत आपण रूळू शकू का, याचा अंदाज घेऊन मग ठरवायचं होतं. अर्थातच मी होकार दिला.

आणखी वाचा : कौतुकास्पद! तेलंगणामध्ये पहिल्यांदाच सरकारी रुग्णालयात दोन ट्रान्सजेंडर डॉक्टर रुजू, वाचा त्यांचा खडतर प्रवास…

निवड झाल्यानंतर कंपनीतर्फे जपानी भाषा शिकवली गेली. जेएलपीटीच्या एन३ लेव्हलपर्यंत मी पोहोचले आहे. दिल्लीत आमच्याकडून नऊ तास अभ्यास करून घेतला होता. पहिल्या दोन महिन्यांत आमच्या दोन लेव्हल्स पूर्ण झाल्या. मग जपानमध्ये येऊन थेट एन४ची परीक्षा दिली. आता ऑफिसमध्ये काम करून पुढच्या परीक्षा देते आहे. ही गोष्ट अवघड नसली तरी आव्हानात्मक आहे. घर-ऑफिस आणि परीक्षेचा अभ्यास करणं, ही अजूनही तारेवरची कसरत होते होती. पहिले सहा महिने कंपनीत रूळायला वेळ मिळाला होता. ओव्हरटाइम चालू झाला आणि परीक्षाही द्यायची होती. सुरुवातीला ऑफिस आणि घरात अंतर बरंच होतं. त्यामुळं जवळपास तीन तास प्रवासाला लागत. तेव्हा मी थोडाफार अभ्यास ट्रेनमध्ये करायचे. त्यानंतर घरी येऊन स्वयंपाक करणं खूपच अवघड गेलं. नंतर ऑफिसपासून फारच जवळ घर मिळालं. त्यामुळं स्वयंपाक आणि अभ्यासाला वेळ मिळाला. खायची खूप आवड असून इथं आल्यावर खूप प्रकारची क्युझिन्स खायला आणि करायलाही शिकले. कंपनीच्या जपानमधील सगळ्या ऑफिसांमध्ये एकूण पंधरा भारतीय आहोत. माझ्या ऑफिसमध्ये आम्ही पाचजण आहोत. जपानी शिकले होते तरी सुरुवातीच्या काळात जपानीतून संवाद साधायला तितकासा आत्मविश्वास वाटत नव्हता. आमच्या ग्रुपच्या बॉसला इंग्लिश येत असल्यानं तो संवाद साधण्यातील अडीअडचणीला धावून यायचा. भारताविषयी जपानी लोकांना खूप उत्सुकता वाटते. भारतातलं हवामान, प्रांतोप्रांतीचे पदार्थ आदींविषयी मी अनेकांशी बोलले. या गप्पांमुळं खूपजण ओळखीचे झाले. त्यामुळं पूर्वी वाटणारा एकटेपणा नंतर कमी झाला . मलाही त्यांच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यायची खूपच उत्सुकता होती. दोन्ही संस्कृतींत समान नव्हे, पण काही ओळखीचे धागे पाहायला मिळाले. उदाहरणार्थ- आपल्याकडच्या चैत्रगौरीची आठवण यावी, त्या धर्तीचा इथंही एक सण असतो. या सणाला हिनामात्सूरी म्हणतात. माझ्या जपानी शिक्षिकांनी मुलींसाठी आवर्जून केल्या जाणाऱ्या गोड लाह्या मला दिल्या होत्या.

आणखी वाचा : आई xx दे की रिप्लाय!

जपानी लोक खूपच व्यवस्थित असतात. त्याच्याकडं प्रत्येक गोष्टीचा तपशील सविस्तर मिळतो. बिझनेस कार्ड देताना विशिष्ट पद्धतीनंच द्यायला पाहिजेत, असं जपानमध्ये मानण्यात येतं. तसं झालं नाही, तर त्या व्यक्तीला बिझनेस मॅनर्स नाहीत, असं म्हणतात. इथं बिझनेस मॅनर्सना खूप महत्त्व दिलं जातं. कंपनीतर्फे परिषदेला जाताना किंवा कंपनीत ट्रेनिंग असेल तेव्हा आम्हाला सूटस् घालणं सक्तीचं होतं. सूट घालणं हा बिझनेस मॅनर्सचा एक मोठा भाग गणला जातो. सूटसोबत सगळा जामानिमा लागतोच. इथं शर्ट बहुतांशी पांढऱ्या किंवा अन्य फिक्या रंगाचे घातले जातात. घडय़ाळ, कानातले टॉप्स, नीटनेटके केस आणि मेकअपही हवाच. माझ्यासोबत तैवान, चायना, कोरिया, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान आणि जपानी अशा एकदम जॉईन झालेल्या आमचा पंधराजणांचा चांगला ग्रुप तयार झालाय. जपानी इंग्लिशचा सराव करायला आमच्याशी बोलायचे. ते चांगले मिसळले. तरीही इतरांपेक्षा एकूणच जपानी लोक पटकन मिळूनमिसळून वागत नाहीत.

आणखी वाचा : नवरा नको गं आई, मला नवरा नको!

माझं जपानला जायचं निश्चित झाल्यावर आईनं ते काहीजणांना सांगितलं. तेव्हा अनेकांच्या ओळखीचं किंवा नात्याचं कुणी ना कुणी जपानमध्ये होतंच. आल्यावर त्यांपैकी जमेल तेवढय़ांशी संपर्क साधला. कारण इथं येऊन एकटीनं राहणं फारसं सोप्पं नव्हतं. मुख्य म्हणजे मी खूप बहिर्मुख असल्यानं मला माणसांशी संवाद साधायची आवड आहे. मग ओळखी होत होत खूपजण ओळखीचे झालेत. मात्र ते टोकियोमध्येच आणि मी थोडी लांब राहात होते. त्यामुळं वरचेवर भेटणं अवघड जातं. भारतातल्या मित्रमैत्रिणी किंवा ओळखीच्यांचे मला मेसेजेस येतात की, ‘आमच्या नात्यातली किंवा परिचितांपैकी अमुक जपानमध्ये येतेय किंवा येतोय..’ त्यामुळं ज्युनिअर्सशीही ओळखी वाढल्यात. आपले सणवार आम्ही साजरे करतो. दिवाळी ऑफिसमधले सगळेजण मिळून साजरी करतो. फिरायची आवड मला आहेच. वीकएण्डला शक्य होईल तेव्हा बाहेर पडते. इथला साकुरा म्हणजे चेरीब्लॉसम सीझन खूपच प्रसिद्ध आहे. तो आठवडय़ाभरासाठीच असतो. आम्ही चिडोरीगाफुची या ठिकाणी गेलो होतो. बोटिंग करतानाचा अनुभव शब्दांत सांगणं कठीण आहे. योगायोगानं दुसऱ्या दिवशी घरच्यांनी माझा नव्हे, पण या ब्लॉसमचा फोटो आपल्याकडच्या वृत्तपत्रात पाहिला होता. हा बहर पाहायला लोक परदेशांतून आवर्जून येतात. एकदा बुलेट ट्रेननं प्रवास केला. स्टेशनवर उतरल्यावर ट्रेन समोरून गेल्यावर तो वेग खरोखरच
जाणवला.
सर्वात वाईट अनुभव इथल्या भूकंपाचा होता. मध्यंतरी मोठय़ा भूकंपाचे धक्के बसले.. सकाळी सहा वाजता हा भूकंप झाला होता. त्यामुळं आता उठल्यावर आज भूकंप होणार नाही ना तसा.. अशी पुसटशी भीती अजूनही वाटते.. ते काही क्षणांचे धक्के खूपच परिणामकारी ठरतात. आमच्या नऊ मजली इमारतीत सातव्या मजल्यावरून माऊंट फुजी दिसतो. तो भारी व्ह्य़ू आहे. पण मी भूकंपाच्या भीतीमुळं तो व्ह्य़ू
दिसणारा मजला नको, असं सांगितलं होतं. प्रत्येक घरात ठेवलेल्या एका फाइलमध्ये अमुक गोष्ट घडल्यास
काय करा, हे नमूद केलेलं असतं. आम्ही इथं आल्यावर सांगितलं गेलं होतं की, बॅगच तयार करून ठेवायची
एक. दुर्दैवानं फार वाईट परिस्थिती उद्भवली तर बॅग उचलून बाहेर पडायचं. हा भूकंप झाला तेव्हा भारतात रात्र असल्यानं घरच्यांना काही कळलं नाही. पण मी कायमच अगदी छोटासा भूकंप झाला तरी मेसेज करून ठेवते की, मी सेफ आहे.. या भूकंपाच्या वेळी खुशाली विचारणारे खूप जणांचे मेसेजेस आले. मला पुढं शिकायचं आहे. सुदैवानं मला पाहिजे तो जॉब मिळाला आहे. अजून काही वर्ष हा जॉब करेन.
बाकी पुढचा विचार केला नाही. माझ्या काही आवडीनिवडी जोपासायला मिळत आहेत आणि काही नाहीदेखील. मी आवर्जून चित्र काढते. एकदा एका रेस्तराँमध्ये आम्ही काही भारतीय गेलो होतो. तिथं भारतीय संगीताचं एक प्रतीक म्हणून तबला ठेवला होता. सगळ्यांच्या फर्माइशीमुळं मी तबला वाजवला. एरवी घरी ते शक्य नाही. तबला, गाणं, हार्मोनिअम आणि कथकच्या काही परीक्षा दिल्या आहेत. त्यांपैकी
फक्त गाणं गुणगुणणंच शक्य होतं. कॉलेजच्या क्रिकेट टीममध्येही मी होते. मला क्रिकेटची खूप आवड आहे
लहानपणापासूनच. मी सलामीलाच जायचे आणि जलदगती गोलंदाजही होते. अभ्यासामुळं हे सारे छंद आणि आवडी काहीशा मागंच पडल्या आहेत. त्यातल्या त्यात सॉफ्टबॉल क्वचितच खेळते.
इथला निसर्ग खूप सुंदर आहे. काही वर्षांपूर्वी ऑटम सीझनमध्ये ५४ वर्षांनी इथं स्नोफॉल झाला. मी खूपच एक्सायटेड झाले होते. मी पाहिलेला तो पहिलावहिला स्नोफॉल होता. गेल्या वर्षी इथं आल्यावर स्नो पडला होता, पण
मी स्नोफॉल बघितला नव्हता कारण तो रात्री झाला होता. स्लिट (बर्फ नि पाऊस एकत्र पडणं) पाहिलं होतं.
त्यावर्षी आठ तासांचा स्नोफॉल झाला तेव्हा सुदैवानं त्या दिवशी मी फॅक्टरीत होते. त्यामुळं मला स्नोफॉल
मनसोक्त एन्जॉय करता आला.. मात्र निसर्गाचे रंगढंग न्याहाळताना आणि जपानी जीवनशैलीत रुळताना
घरची आठवण आल्यावाचून राहत नाही.. होम स्वीट होम, सी यू सून..

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 07:42 IST
Next Story
कृत्रिम नखं वापरताय?… इकडे लक्ष द्या