ज्ञानदेव बाबाराव नजान

ज्युलीच्या मोबाइल क्रमांकासाठी दुसरे SIM सक्रिय झाले होते. तिच्या मूळ SIM वर नेटवर्क बंद झाले आणि तिच्या क्रमांकावर येणारे SMS आणि काही सेवा दुसऱ्या SIM वर उपलब्ध होऊ लागल्या. ज्युली नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसमध्ये पोहोचली होती. काम सुरू करण्यापूर्वी तिने मोबाइल पाहिला. काही वेळापूर्वीपर्यंत फोनवर नेटवर्क व्यवस्थित होते. अचानक मोबाइलच्या स्क्रीनवर “No Service” दिसू लागले. तिने फोन एकदा बंद करून पुन्हा सुरू केला. तरीही नेटवर्क आले नाही. “कदाचित नेटवर्कची अडचण असेल,” असे समजून तिने दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने तिला इ-मेलवर एक सूचना आली- “Your mobile number has been activated on another SIM.”

ज्युलीला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. तिने लगेच मोबाईल कंपनीच्या ग्राहकसेवेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तिच्या ई-मेलवर बँकेकडून काही व्यवहारांच्या सूचना येऊ लागल्या. ज्युली घाबरली. तिचा मोबाइल तिच्याच हातात होता. मग तिच्या क्रमांकावर येणारे OTP आणि संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचू शकतात? तिला नंतर समजले की तिच्या मोबाइल क्रमांकासाठी दुसरे SIM सक्रिय झाले होते. तिच्या मूळ SIM वर नेटवर्क बंद झाले आणि तिच्या क्रमांकावर येणारे SMS आणि काही सेवा दुसऱ्या SIM वर उपलब्ध होऊ लागल्या. या प्रकाराला SIM Swap Fraud किंवा SIM Swap असे म्हटले जाते.

आपला मोबाईल क्रमांक बँक खाते, UPI, ई-मेल किंवा इतर ऑनलाइन सेवांशी जोडलेला असू शकतो. काही सेवांमध्ये खात्याची ओळख पटवण्यासाठी किंवा व्यवहाराची सूचना देण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. SIM Swap मध्ये फसवणूक करणारी व्यक्ती संबंधित मोबाईल क्रमांकासाठी दुसरे SIM सक्रिय करून घेण्याचा प्रयत्न करू शकते. प्रक्रिया यशस्वी झाल्यास मूळ SIM वर नेटवर्क सेवा बंद होऊ शकते आणि नवीन SIM वर मोबाईल सेवा सुरू होऊ शकते. याचा गैरवापर करून मोबाईल क्रमांकाशी संबंधित काही खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र SIM अचानक बंद झाला म्हणजे SIM Swap Fraud झालाच आहे, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. नेटवर्कमधील तांत्रिक अडचण, SIM खराब होणे किंवा इतर कारणांमुळेही मोबाइल सेवा बंद होऊ शकते.म्हणूनच परिस्थितीची तातडीने पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.

आज अनेक महिला मोबाईल क्रमांकाचा वापर बँकिंग, UPI, ऑनलाइन खरेदी, ई-मेल, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल सेवांसाठी करतात. त्यामुळे मोबाइल क्रमांक सुरक्षित ठेवणे म्हणजे केवळ फोनवर कॉल येणे एवढेच नाही. तो अनेक डिजिटल खात्यांशी जोडलेला असल्यामुळे त्याच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः अचानक मोबाइल नेटवर्क बंद होणे आणि त्याच वेळी बँक किंवा इतर खात्यांमध्ये अनोळखी हालचाली दिसणे, ही परिस्थिती दुर्लक्षित करू नये. SIM Swap करण्यासाठी फसवणूक करणाऱ्याला काही वैयक्तिक माहितीची आवश्यकता भासू शकते. ही माहिती विविध मार्गांनी मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. समाजमाध्यमांवर सार्वजनिक केलेली माहिती, फसव्या फोन कॉलद्वारे मिळवलेली माहिती, बनावट लिंकद्वारे मिळवलेले तपशील किंवा इतर मार्गांचा वापर होऊ शकतो.

म्हणूनच OTP, PIN, Password, बँकिंग माहिती किंवा इतर संवेदनशील तपशील कोणालाही सांगू नका. मोबाइल कंपनी, बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था असल्याचे सांगून कोणी माहिती मागितली तरी त्याची सत्यता स्वतंत्रपणे तपासा. मोबाइल अचानक ‘No Service’ दाखवत असेल तर काय कराल?सर्वप्रथम घाबरू नका. मोबाइल एकदा रीस्टार्ट करून पाहा आणि शक्य असल्यास दुसऱ्या फोनवरून आपल्या मोबाइल सेवा पुरवठादाराशी संपर्क साधा. तुमच्या क्रमांकासाठी अलीकडे SIM बदल किंवा नवीन SIM सक्रिय करण्यात आले आहे का, याची चौकशी करा. त्याच वेळी बँक खाते, UPI आणि महत्त्वाच्या ऑनलाइन खात्यांमध्ये अनोळखी व्यवहार किंवा बदल झाले आहेत का, हे तपासा. काही संशयास्पद दिसल्यास संबंधित बँक किंवा सेवा पुरवठादाराशी तातडीने संपर्क साधा.

मोबाइल क्रमांक आणि वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांवर अनावश्यकपणे सार्वजनिक करू नका.OTP, UPI PIN, ATM PIN आणि Password कोणालाही सांगू नका. अनोळखी लिंकवर वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती भरू नका. बँक आणि इतर महत्त्वाच्या खात्यांमध्ये उपलब्ध अतिरिक्त सुरक्षा सुविधा सुरू ठेवा. ई-मेल किंवा ॲपद्वारे आलेल्या अनोळखी लॉगिन किंवा व्यवहाराच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. मोबाइल अचानक नेटवर्कविना झाल्यास आणि समस्या कायम राहिल्यास तातडीने सेवा पुरवठादाराशी संपर्क साधा.

बँक खात्यात अनधिकृत व्यवहार आढळल्यास बँकेशी त्वरित संपर्क करा. आर्थिक सायबर फसवणूक झाल्याचा संशय असल्यास भारतातील 1930 हेल्पलाइनवर तातडीने संपर्क करा आणि National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवा.ज्युलीला एक महत्त्वाचा धडा मिळाला- ज्युलीने नंतर आपल्या सर्व महत्त्वाच्या डिजिटल खात्यांची सुरक्षा तपासली. बँकेशी संपर्क साधून आवश्यक ती खबरदारी घेतली आणि मोबाइल सेवा पुरवठादाराकडूनही आपल्या क्रमांकाची स्थिती तपासून घेतली. त्या दिवसानंतर मोबाइल अचानक नेटवर्कविना झाल्यावर ती त्याकडे साधी तांत्रिक अडचण म्हणून दुर्लक्ष करत नाही.(सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)

dnyandev.najan@yahoo.in