scorecardresearch

सनटॅन? विसरून जा…

या साध्या-सोप्या उपायांनी घालवा सनटॅन!

sun tan
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

उन्हाळा सुरू झाला की, सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते म्हणजे टॅनिंगचं (Tanning). ऑफिस असेल तर घराबाहेर पडणं अगदी अपरिहार्यच असतं. ऑफिसला जाण्या-येण्याची वेळ जर दुपारची असेल तर टॅनिंगची समस्या आणखीनच त्रास देते. त्यात तुमचं काम जर फिरण्याचं असेल तर मग टॅनिंगचा त्रास आणखीनच वाढतो. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींच्या परीक्षांचा सीझन आहे. त्यामुळे क्लास, कॉलेज यासाठी जावं लागतं, पण उन्हामुळे टॅनिंग वाढतं. गृहिणींनाही काही ना काही कामासाठी घराबाहेर पडावंच लागतं. सामान घेण्यासाठी, मुलांना शाळेत सोडणं आणि आणणं, मेडिकल इमर्जन्सी अशा अनेक गोष्टींसाठी बाहेर पडलं की, टॅनिंग होणं अपरिहार्य असतं. पण काही घरगुती उपायांनी हे सनटॅन आपण कमी करू शकतो. चला बघू या, हे साधे सनटॅन रिमूव्हल फेस मास्क-

१. बटाट्याचा रस- (Potato Juice)

बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लीचिंग एजंटसारखं काम करतो. बटाट्याच्या रसामुळे स्किन-टोनही चांगला राहतो आणि त्वचा मऊ होते. डोळ्याखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्याचबरोबर सनटॅन घालवण्यासाठीचाही हा हमखास उपाय आहे.

एक कच्चा बटाटा किसून घ्या. आता एका सुती कापडामधून तो पिळून घेऊन त्याचा रस काढा. हा रस त्वचेवर १० ते १२ मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. आठवड्यातून चार वेळा हा पॅक लावल्यास त्याचे उत्तम परिणाम मिळतात.

२. चंदन आणि गुलाबपाणी- (Sandal And Rose Water)

चंदन हे आपल्याकडे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी शतकानुशतकं वापरलं जातं. चंदन त्वचेला नैसर्गिकरीत्याच थंडावा देतं. एक्ने, ब्रेकआऊटची समस्या असलेल्या त्वचेसाठी हा उपाय अगदी उत्तम आहे. तर गुलाबपाण्याने त्वचा मऊ होते आणि त्वचेवर साचलेली धूळ, घाण अगदी आतून स्वच्छ होते. या दोन्हीचं कॉम्बिनेशन सनटॅन काढण्यात प्रभावी आहे.

एका बाऊलमध्ये दोन चमचे चंदनपावडर घ्या आणि गुलाबपाणी घालून दाटसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर सगळीकडे लावा आणि २० ते ३० मिनिटं सुकू द्या. पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा.

३.लिंबाचा रस आणि मध (Lemon Juice And Honey)

लिंबाचा रस हा नैसर्गिकरीत्या ब्लीच करतो. त्यामुळे टॅन लगेचच कमी होण्यास मदत होते. मधामुळे चेहरा उजळतो आणि त्वचेचा पोतही सुधारतो.

ताज्या लिंबाचा रस घ्या आणि त्यात थोडासा मध घालून पेस्ट करा. हा पॅक साधारणपणे ३० मनिटं चेहऱ्यावर राहू द्या. स्क्रबिंगचा इफेक्ट हवा असेल, तर तुम्ही लिंबाच्या रसात साखर घालून हलक्या हाताने स्क्रब करू शकता. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल.

४. पपई आणि मध (Papaya And Honey)

पपईमध्ये ब्लीचिंग, अँटिबॅक्टेरियल, अँटिइन्फ्लेमेटरी, अँटिएजिंग आणि स्किन लाईटनिंग गुणधर्म असतात. तर मधामुळे त्वचा मऊ आणि उजळ बनते. या दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यास सनटॅन कमी होण्यास मदत होते.

एका बाऊलमध्ये पपईचे तुकडे घेऊन ते कुस्करा. त्यात दोन चमचे मध घाला आणि ते चांगलं मिक्स करा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि तो पूर्णपणे सुकू द्या. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. पपईमुळे डेड सेल्स मऊ होतात आणि निघून जातात.

४. दही आणि टोमॅटो (Yoghurt And Tomato)

टोमॅटोमध्ये अॅंटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा उजळ व्हायला मदत होते. तर दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं ज्यामुळे त्वचा मऊ होते.

एक टोमॅटो घ्या आणि त्याची साल काढून टाका. १ ते २ चमचे दह्याबरोबर टोमॅटो मिक्सरमधून फिरवून घ्या. आता चेहऱ्यावर टॅन झालेल्या भागावर हा पॅक लावा आणि २० मिनिटांनी धुऊन टाका.

५. तांदळाचं पीठ आणि दूध (Rice floor and milk)

दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. त्यामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्स कमी होण्यास मदत होते. तर तांदळाच्या पिठात त्वचा उजळ करण्यासाठीचे गुणधर्म असतात. त्यावर पॅचेस राहत नाहीत. तांदळाचं पीठ आणि दुधाच्या मिश्रणामुळे स्किनटॅन तर जातंच पण त्वचाही नैसर्गिकरीत्या उजळते.

एका बाऊलमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घ्या आणि त्यात दोन चमचे गार दूध घाला. दोन्ही छान एकत्र करून दाट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर सगळीकडे लावा. विशेषत: जिथे टॅन झालं आहे तिथे नक्की लावा. चेहऱ्यावर ३० मिनिटं ही पेस्ट ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका.

६. काकडीचा रस (Cucumber juice)

सनटॅन झालेल्या किंवा सनबर्न झालेल्या त्वचेसाठीही काकडी अत्यंत गुणकारी आहे. काकडीमध्ये थंडावा देण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे हा पॅक नक्की वापरून बघा. एक काकडी घेऊन ती किसा. हा कीस पिळून त्याचा रस काढा. कापसाच्या बोळ्याने हा रस तुमचा चेहरा आणि मानेवर लावा. वाळल्यानंतर चेहरा धुऊन टाका. हवं असल्यास या रसात तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता.

७. मसूरडाळ, टोमॅटो आणि कोरफड (Red Lentil, Tomato And Aloe Vera)

मसुराची लाल डाळ हा सनटॅन कमी करण्यावरचा हमखास उपाय आहे. टोमॅटोच्या रसाने त्वचा उजळते तर कोरफडीमुळे त्वचा मऊ होते आणि मॉईश्चराईजही होते. दोन चमचे मसुराची डाळ पाण्यात चांगली भिजवा. डाळ चांगली भिजल्यानंतर त्यातून पाणी काढून घ्या. या डाळीमध्ये एक चमचा कोरफड जेल आणि दोन चमचे टोमॅटोचा ताजा रस घाला आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर सनटॅन झालेल्या भागावर लावा आणि २० मिनिटे ठेवा. आता चेहऱ्यावर मसाज करत पाण्याने हा पॅक धुऊन टाका.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:09 IST

संबंधित बातम्या