आराधना जोशी

Smartphone Etiquette Tips : भारतात मोबाइलचं आगमन होऊन आता जवळपास २९ वर्षं तर स्मार्ट फोन येऊन १६ वर्ष झाली आहेत. ’सोळावं वरीस धोक्याचं गं’ असं जे आपल्याकडे म्हटलं जातं ते स्मार्टफोनच्या संदर्भात अगदी खरं आहे. करोनानंतर ऑनलाइन शिक्षणप्रणालीमुळे मुलांच्याही हातात स्वतःचे स्मार्टफोन आले आणि मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइमचा प्रश्न निर्माण झाला. कायम ऑनलाइन राहणं, हे एक व्यसन बनत चाललं आहे का? कारण तसेच प्रकार पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. पालकांनी स्मार्टफोन वापरू न दिल्याने किशोरवयातील मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना सतत कानावर येतात. त्यामुळे स्मार्टफोनचं व्यसन किती धोकादायक बनू शकते, याची चर्चा होऊ लागली आहे. पण मुद्दा स्मार्टफोनमध्ये गुंतून जाण्याचा नाही, तर स्मार्टफोन वापराच्या ‘एटिकेट्स’चा म्हणजेच शिष्टाचाराचा आहे. वाचून आश्चर्य वाटलं? हो, स्मार्टफोन वापरायचे शिष्टाचार आहेत! परदेशात या शिष्टाचारांच्या पालनासाठी वेगवेगळ्या मोहिमा सुरू आहेत आणि वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनांपर्यंत अनेकांनी या शिष्टाचारांची गरज नमूद केली आहे.

Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

काय आहेत स्मार्टफोन शिष्टाचार (What is Smartphone Etiquette)

स्मार्टफोनच्या वापराबाबत नियमन करणारे किंवा त्याच्या अवाजवी वापरावर निर्बंध आणणारे कायदे अजून तरी कोणत्याही देशात बनलेले नाहीत. फ्रान्स सरकारनं शाळांमध्ये स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वापराला पूर्णपणे मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. त्या देशात १२ ते १७ वर्षं वयोगटातील ९० टक्के मुलामुलींकडे मोबाइल आहेत. वर्गात बसलेले विद्यार्थी जर स्मार्टफोनमध्येच डोके खुपसून बसणार असतील तर, शिक्षकांनी शिकवायचं कोणाला? या समस्येतून तो कायदा निर्माण झाला. पण त्या निर्णयाच्या निषेधाचे सूर उमटलेच. अमेरिकेतही सार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापरण्यासंदर्भात नियमावली बनविण्यात आली आहे. मोबाइलधारकांनी काय करावं आणि काय करू नये, याबद्दल त्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा >> मुलांना स्मार्ट बनवायचं आहे, पण त्यांचा स्क्रीन टाइम कसा कमी कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स!

मागील वर्षी जुलै महिन्यात युनेस्कोने जगातील सर्वच शाळांमधून स्मार्ट फोनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली. डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी, ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही. कोणतंही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षण हे मानवकेंद्रीत असायला हवं. स्मार्टफोनच्या अतिवापराचा थेट परिणाम शैक्षणिक कामगिरीवर होत असल्यानं शैक्षणिक कामगिरी खालवल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

शाळेत फोनच्या वापरावर बंदी घालणं सोपं असलं तरी, घरी मात्र ते काहीसं अवघड आहे. मात्र पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन, त्यांचं मत विचारात घेऊन काही एटीकेट्स शिकवले तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल –
१) आपल्या सोयीसाठी फोन आहे, फोनसाठी आपण नाही हे आधी मुलांना पटवून द्या.
२) फोनवर संभाषण साधताना हळू पण, स्पष्ट आवाजात बोला.
३) घरातील व्यक्तींबरोबर तुम्ही असाल आणि फोन वाजला तर तो फोन घेण्याची गरज का आहे, ते इतरांना समजावून सांगा आणि मगच कॉल उचला.
४) मित्र-मैत्रिणींशी बोलताना जो टोन असतो, त्याच टोनमध्ये नातेवाइकांशी, वडीलधाऱ्या व्यक्तींशी संवाद साधू नये. त्यांच्याशी बोलताना आपला टोन कसा सांभाळायचा याचं उदाहरण पालकांनी आपल्या कृतीतून मुलांसमोर ठेवणं आवश्यक आहे. मेसेजला रिप्लाय करताना इमोजी वापरून आपल्या भावना पोहोचवता येतात. मात्र त्यासाठी योग्य इमोजींची निवड करता आली पाहिजे.
५) सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना, चारचौघांमध्ये आपली भाषा सांभाळणं का गरजेचं असतं याचं भान पालकांनी मुलांना द्यावं. याशिवाय वडीलधाऱ्यांना मेसेज करताना शक्यतो संपूर्ण शब्द आणि वाक्य टाईप करावे. अनेकदा त्या व्यक्तींना शब्दांचे शॉर्टफॉर्म लक्षात येतीलच, असं नाही.
६) सार्वजनिक ठिकाणी आपला फोन शक्यतो सायलेंट मोडवर असावा. आपल्या रिंगटोनमुळे इतरांना त्रास होऊ नये, याची खात्री करावी.
७) घरातील इतर मंडळी जर तुमच्याशीच बोलत असतील तर अशावेळी मेसेज करणं, स्क्रोल करणं, अशा गोष्टी करू नयेत.
८) किशोरवयीन मुलांनी गाडी चालवताना फोनचा वापर टाळावा
९) ग्रुपसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याअगोदर शक्य असेल तर त्या फोटोतील व्यक्तींना त्याची कल्पना द्यावी.
१०) तुमच्या घरच्या शेड्यूलप्रमाणेच इतरांच्या घरचं शेड्यूल नसतं. त्यामुळे रात्री १० वाजल्यानंतर शक्यतो इतरांना फोन करणं किंवा मेसेज करणं टाळावं.
११) समोरच्या व्यक्तीने तुमचा फोन उचलला नाही तर वारंवार त्याला फोन करू नये. त्याऐवजी तुमचं नेमकं काय काम आहे, याचा मेसेज पाठवावा.
१२) व्हिडीओ कॉल सुरू असेल तर तशी कल्पना तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना असू दे.
१३) आजही मोबाइल जरी मुलांच्या हातात असला तरी त्याची बिलं किंवा त्याच्या प्लॅनचे पैसे पालकच देत असतात. त्यामुळे महिन्याच्या या खर्चावर कंट्रोल कसा करायचा याचा विचार दोन्हीकडून झाला पाहिजे.
१४) व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये एखाद्याला ॲड करताना आधी त्याची परवानगी घ्या.

हेही वाचा >> परीक्षा, गुण यापलीकडेही आहे जग! पालकांनी मुलांना ‘या’ गोष्टी शिकत स्वत:त करा ‘हे’ बदल

पूर्वी आपला मुलगा किती साधा सरळ आहे, हे मुलीकडच्यांना पटवून देताना अनेकदा सांगितलं जायचं की ‘मुलगा कोणाच्या अध्यात नाही की मध्यात. मान खाली घालून जातो, मान खाली घालून येतो. कोणा मुलीकडे मान वळवून तर जाऊ द्या, पण नजर उचलूनही बघत नाही.’ आताचे पालकही हीच वाक्यं म्हणतात, पण वेगळ्या संदर्भात. ‘मोबाईलमध्ये घातलेली नजर वर उचलून बघायलाच आमच्या मुलांना जमत नाही,’ असं हल्ली म्हटलं जातं. एक विनोद म्हणून जाऊ दे; पण खरंच आपल्याशी समोरची व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीनं वागते तेव्हा आपल्याला या शिष्टाचारांचं महत्त्व कळतं. त्याऐवजी सर्वांनीच हे ‘एटिकेट्स’ समजून घेऊन अमलात आणले तर, अपघात आणि अपमान दोन्हीही टाळता येतील.