ज्ञानदेव बाबाराव नजान

सोशल मीडियावर एका अनोळखी खात्याने नेहाला वारंवार मेसेज करण्यास सुरुवात केली. तिने उत्तर न देता ते खाते ब्लॉक केले. काही वेळाने दुसऱ्या नावाने नवीन खाते तयार झाले आणि पुन्हा मेसेज सुरू झाले. तेही खाते तिने ब्लॉक केले. मात्र काही दिवसांत आणखी एका नवीन खात्यावरून संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला नेहाने हा प्रकार दुर्लक्षित केला. पण नवीन नवीन खात्यांमधून वारंवार येणारे मेसेज, विचित्र प्रश्न आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती विचारली जाऊ लागल्याने तिला चिंता वाटू लागली.

प्रत्येक मेसेजला उत्तर देणे आवश्यक नाही : सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम आहे; मात्र प्रत्येक अनोळखी व्यक्तीच्या मेसेजला उत्तर देणे आपली जबाबदारी नाही. एखादे खाते वारंवार संपर्क साधत असेल, त्रासदायक किंवा आक्षेपार्ह मेसेज पाठवत असेल किंवा ब्लॉक केल्यानंतर नवीन खात्यांमधून पुन्हा संपर्क करत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.विशेषतः “उत्तर द्या”, “माझे ऐका”, “फक्त एकदा बोलूया” अशा आग्रहाला बळी पडण्याची गरज नाही.

काही व्यक्ती किंवा खाते वापरणारे लोक ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्या खात्याचा वापर करून पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात. नवीन खाते असल्यामुळे ते आपोआप धोकादायक आहे असे नाही; परंतु वारंवार नवीन खात्यांमधून त्रास देण्याची पद्धत दिसत असेल, तर ती नोंद घेण्यासारखी बाब आहे. अशा वेळी प्रत्येक नवीन खात्याशी वाद घालण्यापेक्षा संपर्क कमी करणे आणि उपलब्ध पुरावे जतन करणे अधिक महत्त्वाचे ठरते.
“रिप्लाय” करण्यापूर्वी विचार करा अनोळखी व्यक्तीने मेसेज केल्यावर रागाने किंवा भीतीने लगेच उत्तर देऊ नका. तुमचे उत्तर पुढील संभाषणाला कारणीभूत होऊ शकते.

OTP, Password, UPI, PIN, बँक खात्याची माहिती, घराचा पत्ता, मोबाईल नंबर, कामाचे ठिकाण, रोजचे वेळापत्रक किंवा वैयक्तिक फोटो अशी माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. कोणी तुमच्याबद्दल आधीच काही माहिती सांगितली म्हणून तो व्यक्ती विश्वासू आहे, असे समजू नका.

पुरावे जतन करा
त्रासदायक खाते दिसताच लगेच सर्व काही डिलिट करण्याची घाई करू नका. परिस्थितीनुसार पुढील माहिती जतन करून ठेवता येते :
खात्याचे नाव आणि Username
Profile चा Screenshot
त्रासदायक Message चे Screenshot
Message ची तारीख व वेळ
Profile किंवा Message ची लिंक, उपलब्ध असल्यास
धमकी किंवा आक्षेपार्ह मजकूर असल्यास त्याचा पुरावा
पुरावे जतन करताना स्वतःची वैयक्तिक माहिती अनावश्यकपणे इतरांना Forward करू नका.
ब्लाॅक आणि रिपोर्ट वापरा
बहुतेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक, रिपोर्ट, रिस्ट्रक्ट किंवा प्रायव्हसी कंट्रोल्स यांसारखे पर्याय उपलब्ध असतात. परिस्थितीनुसार त्यांचा वापर करता येतो.
तुमचे खाते कोण मेसेज करू शकते, फाॅलो शकते किंवा तुमच्या पोस्टवर कमेंट करू शकते, याबाबतची प्रायव्हीसी सेंटिंग्स तपासा.
फक्त एक खाते ब्लॉक करून थांबण्याऐवजी तुमच्या खात्याच्या गोपनीयता सेटिंग्जचा आढावा घेणेही महत्त्वाचे आहे.
धमकी मिळत असेल तर दुर्लक्ष करू नका. जर मेसेजमध्ये जीवे मारण्याची धमकी, शारीरिक इजा करण्याची धमकी, बदनामी करण्याची धमकी, खाजगी फोटो किंवा माहिती सार्वजनिक करण्याची धमकी किंवा प्रत्यक्ष भेटण्याचा दबाव असेल, तर हा प्रकार अधिक गांभीर्याने घ्या…

अशा परिस्थितीत विश्वासू कुटुंबीय किंवा व्यक्तीला माहिती द्या आणि उपलब्ध पुरावे जतन करा. परिस्थितीनुसार स्थानिक पोलिस किंवा संबंधित सायबर गुन्हे यंत्रणेकडे तक्रार करता येते. धमकी देणाऱ्या व्यक्तीला स्वतःहून शोधण्याचा, त्याचा सामना करण्याचा किंवा त्याला धडा शिकवण्यासाठी त्याची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करू नका.

महिलांच्याबाबतीत अनोळखी खात्यांकडून वारंवार संपर्क साधणे, वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा सोशल मीडिया पोस्टवरून त्यांच्या दिनक्रमाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक प्रोफाइलवर घराचा पत्ता, रोज कुठे जाता, कोणत्या वेळी कुठे असता, प्रवासाचे नियोजन किंवा कुटुंबातील संवेदनशील माहिती देताना काळजी घ्या.

मुलांनाही हेच समजावून सांगणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीने त्रास दिल्यास “तू उत्तर का दिलेस?” असे म्हणत मुलाला दोष देण्यापेक्षा त्याने पालकांना किंवा विश्वासू व्यक्तीला लगेच सांगावे, असे वातावरण तयार करा.शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा… ऑनलाइन त्रास सहन करणे ही तुमची जबाबदारी नाही. ब्लॉक करणे म्हणजे भ्याडपणा नाही आणि मदत मागणे म्हणजे कमजोरी नाही.

अनोळखी खात्यांमधून वारंवार त्रास होत असेल तर—
उत्तर देण्यापूर्वी विचार करा, पुरावे जतन करा, खाते रिपार्ट/ब्लॉक करा, प्रायव्हसी सेंटिंग्ज तपासा आणि धमकी गंभीर असेल तर योग्य यंत्रणेकडे तक्रार करा. ऑनलाइन जगात प्रत्येक नवीन खाते म्हणजे नवीन ओळख असेलच असे नाही; पण वारंवार होणारा त्रास दुर्लक्षित करण्याचीही गरज नाही.

ज्ञानदेव बाबाराव नजान
सायबर फॉरेन्सिक विश्लेषक
dnyandev.najan@yahoo.in