महिला सगळ्याच क्षेत्रात उत्तम काम करतात. आताच्या काळात असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही. चाकोरीबद्ध जीवन झुगारत काहीतरी वेगळे करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. फार पूर्वीपासूनच काही महिलांनी आपल्या कलागुणांनी आणि अभ्यासू वृत्तीने समाजाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळवून दिला आहे. महिला कष्ट घर चालवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे फरिदाबादमध्ये राहणारी सोनाली.

कुटुंबाचा गाडा हाकण्याचा संघर्ष

हरियाणाच्या फरीदाबादच्या रस्त्यावर एक मुलगी ऑटो रिक्षा चालवते. ती पुरुष ऑटो चालकांना स्पर्धा देत आहे. परिस्थितीमुळे तिला हे काम करावे लागत आहे, पण इतरांसमोर हात पसरण्यापेक्षा स्वबळावर मेहनत करून पैसा कमविणे कधीही चांगले, हे काम करायला तिला लाज वाटत नाही. तिने सांगितले की, वडिलांच्या निधनामुळे घरची आर्थिक परिस्थिती खालावली होती, त्यानंतर तिने ऑटोचे स्टेअरिंग हाती घेतले आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. कुणाचाही आधार नसताना सोनाली वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता स्वतः जिद्दीने उभी राहिली.

आजच्या युगात मुलीही कोणापेक्षा कमी नाहीत. ते पुरुषांप्रमाणे रोजगार आणि कुटुंबासाठी समान काम करू शकतात. त्याचप्रमाणे फरीदाबादमध्ये सोनाली ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. सोनालीने सांगितले की ती, यूपीची रहिवासी आहे, जी अनेक वर्षांपासून फरीदाबादमध्ये राहते. सध्या ती २० वर्षांची आहे. वडिलांच्या निधनानंतर घर चालवायला कोणीच नव्हते. तिला तीन लहान बहिणी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिला ऑटो रिक्षा चालवावी लागत आहे. ती फरीदाबादमध्ये अनेक ठिकाणी ऑटो रिक्षा चालवते. रिक्षा चालवून तिने आपल्या मोडकळीस आलेल्या कुटुंबाचा गाडा रुळावर आणला आहे.

दररोज कमवते ‘इतके’ पैसे

ती म्हणाली, “भीक मागण्यापेक्षा काही कष्ट करणे चांगले. कामात लाज नाही, भीक मागायला लाज वाटते. कोणतेही काम करा, कामाची कमतरता नाही” ऑटो रिक्षा चालवून ती दररोज ५०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान कमावते, ज्याद्वारे ती तिच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास सक्षम आहे. आजकाल स्पर्धा जास्त आहे. फरीदाबादमध्ये अनेक रिक्षाचालक आहेत. अनेक वेळा असे घडते की, राईड्स कमी मिळतात. निराश होऊन तिला घरी जावे लागते, पण सोनाली संघर्षमय जीवनाला हिमतीनं तोंड देत आहे. आयुष्यातील सर्व संघर्ष जिंकण्याच्या जिद्दीनं ती पुढे जाताना दिसतेय. सोनालीने स्वतः सिद्ध करुन उभा केलेला कुटुंबाचा गाडा आज सर्वांना आदर्शवत करणारा असा आहे.