करोना लॉकडाऊननंतर आता माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींची लग्न ठरायला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन संपून वर्ष उलटत नाही तोपर्यंत कुणाच्या लग्नपत्रिका, कुणाकडून साखरपुड्याचं आमंत्रण… असं सगळं सुरू झालंय. यामुळे माझ्या घरातही सतत लग्नाचा विषय सुरू झाला आहे. ‘तुम्ही लग्न कधी करताय’, असा प्रश्न मला आणि माझ्या बॉयफ्रेंडला आतापर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचारला आहे. त्या सर्वांना ‘पुढच्या वर्षी, यावर्षीच्या अखेरपर्यंत, या महिन्यात’ अशी उत्तर देऊन आम्ही सतत टाळाटाळ करतो. पण खरं सांगायचं तर, लग्न हा विषय निघाल्यावर मला मात्र वेगळ्याच गोष्टींची भीती वाटते आणि ती म्हणजे “सासू…!”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सासू हा शब्द आठवला तरी मनात विचारांची घालमेल सुरू होते. काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी छान साडी नेसून बॉयफ्रेंडच्या घरी गेले होते. मला साडीत पाहून त्याच्या आईनेही माझे कौतुक केले. “छान दिसतेस, साडी छान आहे, असे त्यांनी म्हटले. त्यावर माझा बॉयफ्रेंड सहजच त्याच्या आईसमोर साडीवरुन विनोद करु लागला. त्याने सहजच म्हटलं की, “आई ही आज पूर्ण दिवस साडी नेसून होती, किती छान ना.” त्यावर त्याची आई म्हणाली, “त्यात काय आहे, लग्नानंतर तर साडीच नेसायची आहे.” मी ते ऐकलं आणि माझा पारा चढला. पण मी एकही शब्द न बोलता स्वत:ला कसंतरी शांत केलं.

आणखी वाचा : Open Letter : तुझा जीव कसा कळवळला नाही? आईचे तुकडे करणाऱ्या रिंपलला खुलं पत्र

आज आपली २१ व्या शतकाकडे वाटचाल सुरु आहे. प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीला तिच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं का? हाच प्रश्न मला पडला आहे. आजकाल प्रत्येक मुलीला वेगळी चूल मांडायची असते किंवा त्या मुलाचं स्वतंत्र घर असावं, अशी मुलीची अपेक्षा असते. याचं कारण म्हणजे तिच्या होणाऱ्या सासूबाई… माझ्या होणाऱ्या सुनेने असंच वागावं, मी घरात जशी राहते तशाच पद्धतीने तिने घराची, कुटुंबाची, नवऱ्याची काळजी घ्यावी. घरातली सर्व काम तिने करावीत, घरात असताना किंवा बाहेर जाताना साडी नेसून, टिकली लावून, बांगड्या घालूनच घराबाहेर पडावं, या एक ना अनेक अपेक्षा सासूच्या असतात.

पण या सर्व सासूबाईंना मला एक मुलगी म्हणून प्रश्न विचारावासा वाटतो. माय डिअर सासूबाई… तुम्ही जरा काही वर्षे मागे जाऊन तुमच्या तरुणपणाचे दिवस आठवून पाहता का? तुम्हीही नवीन लग्न करुन जेव्हा या घरात आला होता, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी तुमच्या सासूबाई या नऊवारी साडी, ठसठशीत कुंकू, केसांचा आंबाडा घालून स्वयंपाकघरात काम करायच्या. त्यावेळी तर चुलीवर जेवण करावं लागायचं. मिक्सर नसल्याने पाटा-वरवंटा वापरला जायचा. शेणाने अंगण सारवलं जायचं. पण कालांतराने विविध शोध लागले आणि गोष्टी बदलत गेल्या.

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

तसंच आता तुम्ही २१ व्या शतकात आहात, हे प्रथम मान्य करायला हवं. त्यामुळे माझ्या होणाऱ्या सुनेने मी वागले तसंच वागावं हा अट्टहास सोडायला हवा. तुम्ही लग्नानंतर दिवसभर घरात साडी नेसून वावरत होता. पण आता कामावर जाता-येताना ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी यासाठी धावपळ करावी लागते आणि ती धावपळ साडीत करणं कदापि शक्य नाही. याचमुळे आजकाल मुली ड्रेसच्या ओढणीही बॅगेत ठेवतात आणि ऑफिसला जाऊन ती घालतात. त्यामुळे साडी नेसणं खूपच लांबची गोष्ट आहे. कधीतरी सण असताना, कार्यक्रम असताना मीही हौसेने साडी नेसत जाईन.

पण सासूची सूनेने नेहमी साडी नेसावी ही अपेक्षा मलाच काय तर माझ्यासारख्या २१ व्या शतकातील अनेक मुलींना पूर्ण करणं अजिबात शक्य नाही. त्याबरोबर राहिला प्रश्न तर घरातील काम करण्याचा, तर ते माझं कर्तव्य समजून मी नक्कीच करेन. पण तुमच्या पद्धतीने जेवण करायला निश्चितच काही वेळ तुम्हाला मला द्यावा लागेल.

त्यावेळी कधीतरी जेवणात मीठ जास्त पडेल, तर कधी चपाती करपेल, कधी दूध उतू जाईल, तर कधी कुकरमध्ये पाणी जास्त होईल. कारण कधीतरी सून म्हणून तुम्हीही या सर्व गोष्टी सासूकडून शिकल्या असाल आणि तुमच्याही हातून कळत-नकळत का होईना या चुका झाल्याच असतील. मी तुमची आदर्श सून होईन की नाही याची मला कल्पना नाही. पण मी तुमच्या घरची लेक होण्याचा मात्र निश्चित प्रयत्न करेन. माझ्या आईप्रमाणे मी तुमची काळजी घेईन आणि शक्य असेल तिथे तुम्हीही मला सून म्हणून न वागवता लेकीप्रमाणे वागवाल, अशीच अपेक्षा आहे.

तुमचीच होणारी सून

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special open letter from my dear mother in law from future daughter in law nrp
First published on: 28-03-2023 at 14:38 IST