scorecardresearch

‘स्पोर्टस् ब्रा’चं कोडं

व्यायामांवेळी स्तनांना अजिबात सपोर्ट न मिळाल्यास स्तन शिथिल दिसू शकतात. हे टाळण्यासाठी उत्तम बसणाऱ्या, पुरेसं ‘कव्हरेज’ आणि ‘सपोर्ट’ देणाऱ्या स्पोर्टस् ब्रा उपयुक्त ठरतात.

‘स्पोर्टस् ब्रा’चं कोडं

हल्ली विशेषत: करोनाच्या टाळेबंदीनंतर जिम किंवा मैदानात जाऊन अथवा अगदी घरच्या घरीही नियमित व्यायाम करण्याचा ‘ट्रेण्ड’ खूपच मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे. ‘फिटनेस’ राखणं हा या व्यायामाचा मुख्य उद्देश. आपण नेहमी सोशल मिडियावर सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सचे व्यायामाचे व्हिडिओ पाहात असतो. त्यांच्या व्यायामाबरोबरच व्यायामासाठी वापरण्यात आलेले खास पोषाखही लक्ष वेधून घेणारे असतात. बहुतेक सेलिब्रिटी स्त्रिया व्यायाम करताना स्पोर्टस् ब्रा आणि टाईटस् परिधान करतात. यातून ‘स्पोर्टस् ब्रा’ विषयी कुतूहल निर्माण होतं.

स्पोर्टस् ब्रा चा वापर का सुरू झाला?

स्तन उतींचे बनलेले असतात आणि निसर्गत: त्यांना भक्कम ‘सपोर्ट’ नसतो. काही विशिष्ट लिगामेंटस् (कूपर्स लिगामेंट) आणि त्वचा एवढाच सपोर्ट स्तनांना मिळालेला असतो. श्रमाचे व्यायाम करताना शरीराची हालचाल बराच वेळ आणि मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा वेळी स्तनांना पुरेसा सपोर्ट मिळणं गरजेचं. व्यायामातल्या प्रत्येक मोठ्या हालचालीच्या वेळी स्तनांना सपोर्ट देणारी त्वचा आणि लिगामेंटस् जास्त ताणली जातात. एखाद्या चुकीच्या वा वेड्यावाकड्या हालचालीमुळे किंवा शरीराला मोठा धक्का बसल्यास तिथे लहानशी दुखापत होऊन स्तनांमध्ये एखाद्या भागात दुखणं जाणवू शकतं. सातत्यानं खूप हालचालीच्या व्यायामांवेळी स्तनांना अजिबात सपोर्ट न मिळाल्यास स्तन शिथिल दिसू शकतात. हे टाळण्यासाठी उत्तम बसणाऱ्या, पुरेसं ‘कव्हरेज’ आणि ‘सपोर्ट’ देणाऱ्या आणि स्तनांना सुरक्षितता देण्याबरोबरच व्यायाम करताना बांधलेपणाची भावनाही येणार नाही, छान ‘रीलॅक्स्ड’ही वाटेल, अशा स्पोर्टस् ब्रा लोकप्रिय होऊ लागल्या.
आणखी वाचा : ‘परफ्यूम’ की ‘बॉडी मिस्ट’… काय वापरु?

sports bra
‘स्पोर्टस् ब्रा’ विषयी कुतूहल

अनेक स्त्रियांना व्यायाम करताना स्पोर्टस् ब्रा मध्ये अधिक ‘कम्फर्टेबल’ वाटत असल्यामुळे त्यांची व्यायामातली वा खेळातली कामगिरी सुधारते, असेही जगभरात झालेल्या काही अभ्यास तसेच सर्वेक्षणांमध्ये स्पष्ट झाले आहे.

स्पोर्टस् ब्रा निवडताना…

स्पोर्टस् ब्राची निवड ही तुमच्या व्यायामाच्या प्रकारावर अवलंबून असायला हवी. काही व्यायाम भरपूर हालचालींनी दमवणारे असतात. उदा. धावणे, उड्या मारणे, वेगात चालणे (ब्रिस्क वॉक), जॉगिंग, विविध मैदानी खेळ इत्यादी. तर योगासनं, स्ट्रेचिंगचे व्यायाम, पिलाटेज् अशा व्यायामांमध्ये हालचाल कमी असली, तरी शरीर विविध प्रकारे व जास्त ताणलं जातं. त्यामुळे एकाच स्टाईलची स्पोर्टस् ब्रा सर्वांना चालेलच असं नाही.

साईज कसा ओळखावा?

स्पोर्टस् ब्रा चा साईज हे आणखी एक कोडं! कारण हा साईज तुमच्या नेहमीच्या ब्राच्या साईजशी नेहमीच मिळताजुळता असेलच असं नाही. शिवाय देशी-परदेशी अशा प्रत्येक ब्रॅण्डस् नुसार साईजमध्ये सूक्ष्म फरक असू शकतो. रोजच्या वापरातल्या ब्रा प्रामुख्यानं होजिअरीसारख्या मऊ कापडाच्या असतात. स्पोर्टस् ब्रा मात्र वेगवेगळ्या मटेरिअल्सच्या असतात. त्यात ‘रॅपिड ड्राय’ किंवा ‘अँटी मायक्रोबिअल’ कापडंही अधिक प्रमाणावर वापरलेली असतात. त्यामुळे स्पोर्टस् ब्रा खरेदी करण्यापूर्वी ती आधी घालून पाहाणं केव्हाही उत्तमच. स्पोर्टस् ब्रा शरीराला आणि स्तनांना ‘कम्फर्टेबल’ वाटतेय का? पुरेसा ‘सपोर्ट’ मिळतोय का? ती घातल्यावर नीट हालचाल करता येतेय का? त्वचेवर व स्तनांवर ब्रा काचत नाही ना? किंवा अतिघट्ट, त्रासदायक वाटत नाही ना? हे सर्व मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

Slim woman jogging with personal stereo

आम्ही तर असं सुचवू, की स्पोर्टस् ब्रा ‘ट्राय’ करताना तुम्ही ज्या व्यायामासाठी ती वापरणार आहात, तशा हालचाली करून पाहा. उदा. धावण्यासाठी वापरणार असाल, तर जागच्या जागी वेगात जॉगिंग करून पाहा किंवा योगासनांसाठी वापरणार असाल, तर व्यवस्थित स्ट्रेचिंग करून पाहा. या हालचाली करताना तुम्हाला ‘सपोर्ट’ आणि ‘कम्फर्ट’चा अंदाज येईल आणि ब्राची निवड करणं सोपं जाईल.

आणखी वाचा : ‘बेस्ट फिटिंग’ ब्रा निवडायचीय?; मग ‘हे’ वाचाच!

बाकी काहीही असो, पण स्पोर्टस् ब्रा आणि टाईटस् घातल्यावर आपण व्यायामाच्या ‘मूड’मध्ये जातो एवढं मात्र खरं! त्या त्या प्रसंगाला साजेसे कपडे घातल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास झळकतो ना, अगदी तसंच. मग वापरून पाहा छानशी स्पोर्टस् ब्रा. तुमच्यातला व्यायामाचा उत्साह तरी निश्चितच वाढेल!

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या