Success Story: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे प्रतिष्ठेची अशी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे. फार कमी जणांना या परीक्षेत यश मिळते. पण असे अनेक उमेदवार आहेत की, जे परीक्षा कठीण असूनही कठोर परिश्रम आणि चिकाटी यांच्या जोरावर या परीक्षेत उत्तीर्ण होऊन 'युरेका'चा आनंद मिळवितात. नुकताच काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती तरुणी चार्टर्ड अकाउंटंट्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आनंदाने तिच्या बाबांना मिठी मारताना दिसली होती. दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या तरुणीने तिचे स्वप्न साकाराले आहे. आर्थिक परिस्थिती वाईट असूनही अमृताने हे मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस केले. तिचे पालक पोटापाण्यासाठी चहाची टपरी सांभाळायचे आणि झोपडपट्टीत राहायचे. अमृताच्या शिक्षणासाठी तिचे पालक नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते; पण तिच्या पालकांना अनेकांकडून टोमण्यांचा मार सोसावा लागायचा. अमृताच्या शिक्षणासाठी खर्च करण्याच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केली होती. ते झोपडपट्टीत राहत असल्याने त्यांना, मुलीच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करण्याऐवजी घर बांधण्यासाठी पैसे वाचवावेत, अशा अनाहूत सल्ल्यांचा 'प्रसाद' मिळायचा. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती (Success Story) या तरुणीचे नाव अमृता प्रजापती असून, लिंक्डइनवरील एका पोस्टद्वारे अमृताने तिचा प्रवास शेअर केला. ज्यामध्ये तिने लिहिलेय, "बाबा मी सीए झाले. १० वर्ष डोळ्यांत हे स्वप्न ठेवून दररोज स्वतःलाच विचारायचे की, हे स्वप्न खरंच कधी पूर्ण होईल का? ११ जुलै २०२४ रोजी हे स्वप्न पूर्ण झाले. स्वप्न खरंच पूर्ण होतात. लोक घरच्यांना म्हणायचे की, तुमची मुलगी एवढी मोठी परीक्षा नाही देऊ शकत. त्यांचे बोल खोटे ठरवल्याचे समाधान त्यांना नक्कीच मिळेल." हेही वाचा: Women in Sports: महिला खेळांचे प्रेक्षक किती? क्रीडा क्षेत्रात महिलांसमोरील आव्हान काय? अमृताचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी झोपडपट्टीत राहणाऱ्या अमृताला अनेकांच्या टोमण्यांचा सामना करावा लगाला. पण, या सर्व अडथळ्यांवर मात करीत, तिने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर परीक्षेत यश मिळवले. अमृता प्रजापतीच्या यशाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिचे यश ही तिच्या पालकांसाठी मोठी भेट आहे. अनेकांच्या अपमानास्पद टोमण्यांकडे दुर्लक्ष करून, तिच्या पालकांनी तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.