IIT JEE Success Story: प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे जग धावत असतं, त्याच्या यशाचं त्यांना अप्रूप असतं; पण त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत, त्यांची जिद्द ही फारच कमी लोकांना माहीत असते. अंगात जिद्द असेल, तर काहीही करून दाखवता येतं. जर तुम्ही परिस्थितीला तुमचं गुलाम बनवलं, तर परिस्थिती कशीही असो, यश तुमच्या पावलावर असते. अशीच एक कथा एका मुलीची आहे जिने आर्थिक विवंचनेशी झगडत असतानाही आपली स्वप्नं साकार केली आहेत. दारिद्र्यालाही तिच्या धैर्यापुढे झुकावं लागलं. शेळ्या चरवून अभ्यास करून ती कशीतरी JEE Mains आणि Advanced परीक्षा उत्तीर्ण झाली. जेईई परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटीमध्ये मिळवले स्थान आयुष्यात जे लोक संघर्ष करतात, त्यांना यश मिळतेच. मोठ्या यशासाठी मोठाच संघर्ष करावा लागतो. याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे बदावथ मधुलता (Badavath Madhulatha) या मुलीची यशोगाथा. बदावथ मधुलता ही तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील रहिवासी आहे. या वर्षी तिनं जेईईमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीमध्ये ८२४ वा क्रमांक मिळवून आयआयटी पाटणामध्ये प्रवेश केला आहे. तथापि, तिचं कुटुंब अभियांत्रिकी भौतिकशास्त्रात बी.टेक. करण्यासाठी शिकवणी आणि इतर खर्चासाठी आवश्यक असलेले २.५ लाख रुपये उभे करू शकत नाही. एका शेतमजुराची मुलगी मधुलता हिनं गेल्या महिन्यात उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेण्यासाठी फक्त १७,५०० रुपये दिले. मात्र, आर्थिक चणचण आणि वडिलांच्या आजारपणामुळे कुटुंबाला अतिरिक्त २.५१ लाख रुपये देता आले नाहीत. मधुलता हिला तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिच्या गावात शेळ्या चरवाव्या लागल्या. २७ जुलै ही शुल्क भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असता, तिने बारावीचा अभ्यास पूर्ण केलेल्या आदिवासी कल्याण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी मदतीसाठी आवाहन केले तेव्हा तिची दुर्दशा सर्वांसमोर आली. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी आर्थिक अडचणींमुळे शेळ्या चरवणाऱ्या आदिवासी मुलीला आर्थिक मदत देण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन आर्थिक आव्हाने असतानाही प्रतिष्ठित संस्थेत जागा मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मधुलताचे अभिनंदन केले. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर)वर जाहीर केले आहे की, आदिवासी कल्याण विभागाने तिच्या शिक्षणासाठी आवश्यक निधी जारी केला आहे. मधुलता यापुढेही शैक्षणिकदृष्ट्या चांगली कामगिरी करीत राहील आणि तेलंगणाचा गौरव करील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आदिवासी कल्याण आयुक्तांच्या आदेशानुसार मधुलतानं २,५१,८३१ रुपयांची आर्थिक मदत मागितली होती. राज्य सरकारनं शिक्षण शुल्कातील एक लाख रुपये माफ केले आणि शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, जिमखाना, वाहतूक, मेस फी, लॅपटॉप आणि इतर शुल्कांसाठी १,५१,८३१ रुपये तिला दिले.