Navratri 2022 : हीच खरी दुर्गालक्ष्मी | sweeper clean up conservation worker cleaners durga laxmi real durga vp-70 | Loksatta

Navratri 2022 : हीच खरी दुर्गालक्ष्मी !

रोज सायंकाळी प्रसादाच्या वेळी झालेला मैदानातील कचरा दुसऱ्या दिवशी सकाळच्या निःशब्द शांततेत दोन-तीन तासात स्वच्छ करण्याचं काम ती करत असे. एका बाजूला शक्तिस्वरूप, प्रेमस्वरूप मातेचं भारावून टाकणारं, भक्ताला आश्वस्त करणारं आश्वासक रूप आणि दुसऱ्या बाजूला या जित्याजागत्या लक्ष्मीचं अविरतपणे कर्तव्य बजवणारं, इतरांना आरोग्य प्रदान करणारं रूप…

Navratri 2022 : हीच खरी दुर्गालक्ष्मी !
स्वच्छतादूतही आपल्यासाठी दुर्गेचा आशीर्वादच आहेत…

अनघा सावंत
एका मोठ्या मैदानात तिचं कचरा सफाईचं काम चाललं होतं. अगदी तनमन लावून ती ते करत होती. साडीचा पदर खोचून, तोंडाला, डोक्याला रुमाल बांधून जराही इकडे तिकडे न पाहता कचरा काढण्याचं तिचं काम अविरतपणे चालू होतं. मैदानासमोरचं एका भव्य मंडपात तेजस्वी अष्टभुजाधारी देवी विराजमान होती. देवीचं प्रेमळ सात्विक रूप अतिशय सुंदर होतं. मात्र दागिन्यांनी सजलेली, भरजरी साडी परिधान केलेली देवी आणि रंगीबेरंगी साड्या, दागदागिने घालून देवीच्या दर्शनाला येत असलेल्या स्त्रिया या कशाकडेच तिचं लक्ष नसे… एवढी ती आपल्या कामात नेहमीच खाली मान घालून रममाण झालेली दिसे. माझ्या इमारतीखालीच हे मैदान असल्यामुळे रोज सकाळी तुळशीला पाणी घालताना माझं लक्ष सहज तिच्याकडे जाई.

आणखी वाचा : घर आणि करियर: वर्क और लाइफ, दोनो के साथ जिन्दगी बॅलन्स हो सकती है|

देवीच्या दर्शनाला रोजच त्या त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदर साड्या परिधान करून स्त्रिया येत. पण हिची साडी मात्र एकाच रंगाची, सफाई कामगाराचा युनिफॉर्म असलेली निळ्या रंगाची. तिने परिधान केलेल्या रोजच्या साडीचा हा निळा रंगच तिच्यासाठी खास होता. तिचा संसार चालविणारा होता. जणू काही तिच्यासाठी तिचं काम म्हणजेच देवीची सेवा होती. या नऊ दिवसांच्या नऊ रंगांशी तिला काहीच देणं घेणं नव्हतं. दिवसभर असंख्य भाविक देवीच्या दर्शनाला येत. संपूर्ण मैदान देवीच्या आरतीच्या वेळी भक्तजनांनी तुडुंब भरून जात असे. आरतीच्या घोषात, देवीच्या जयजयकारात, धुपाच्या सुगंधात देवीचा मंडप आणि मंडपासमोरील अखंड मैदान न्हाऊन निघत असे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या छटेमध्ये मैदान खुलून आणि फुलून येत असे. एका वेगळ्याच तेजाने भारलेलं वातावरण आणि देवीचं अलौकिक सौंदर्य प्रत्येक भक्ताला आश्वस्त करीत असे. भक्तीगीतं, गाणी म्हणत चाललेलं जागरण, खाणंपिणं यांनी रात्रभर मैदान गजबजून जात असे…

आणखी वाचा : सुंदर मी होणार – काळजी तेलकट त्वचेची

रोज सायंकाळी प्रसादाच्या वेळी झालेला मैदानातील कचरा दुसऱ्या दिवशी सकाळच्या निःशब्द शांततेत दोन-तीन तासात स्वच्छ करण्याचं काम ती करत असे. सकाळी तुळशीला पाणी घालताना बाल्कनीतून सहजच तिच्याकडे लक्ष जाई. मनात येई, एका बाजूला शक्तिस्वरूप, प्रेमस्वरूप मातेचं भारावून टाकणारं, भक्ताला आश्वस्त करणारं आश्वासक रूप आणि दुसऱ्या बाजूला या जित्याजागत्या लक्ष्मीचं अविरतपणे कर्तव्य बजवणारं, इतरांना आरोग्य प्रदान करणारं रूप… दोन्ही एकच की!

आणखी वाचा : करिअर : अपंग विद्यार्थिनींसाठी शिक्षणसंधी

नेहमीप्रमाणेच आज सकाळी ती दिसली. तेव्हा मनाशी ठरवलंच, काही झालं तरी या दुर्गालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आणि खणा नारळाने तिची ओटी भरायची. अजून तिची बरीचशी साफसफाई बाकी होती. खराट्याचा खरखर आवाज करीत आपल्या कामात ती एकदम मग्न दिसत होती. पट्कन घरातलं ओटीचं सगळं साहित्य घेतलं. मैदानात गेले. नेहमीप्रमाणेच तिचं आजूबाजूला जराही लक्ष नव्हतं. “ताई” तिला हाक मारली आणि थांबवलं. ती कचरा काढायची थांबली आणि क्षणभर भांबावली. विस्मयकारक नजरेने माझ्याकडे पाहू लागली. मैदानाच्या कट्ट्यावर तिला बसवलं आणि तिच्यासाठी नेलेलं ते लेणं तिच्या ओटीत घातलं.

आणखी वाचा : Navratri 2022 :  उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास?

तोंडाला लावलेला रुमालही न काढता आणि एकही शब्द न बोलता तिच्या त्या कष्टकरी सुंदर हातांनी तिने ते लेणं छातीशी कवटाळलं. तिच्या डोळ्यांत एक चमक आली होती. डोक्याभोवती, तोंडाभोवती बांधलेल्या रूमालातून दिसणाऱ्या त्या डोळ्यात पाणी तरळलं होतं, अपरिमित आनंदाचं… समाधानाचं… प्रेमपूर्वक तिच्या खांद्यावर थोपटून मी निघाले. मैदानासमोरील मंडपातील देवीला नमस्कार केला.
मुक्यानेच चाललेला एका जित्याजागत्या लक्ष्मीचा हा सन्मान पाहून समोरच्या मंडपातली देवी प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देत होती!

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
घर आणि करियर: वर्क और लाइफ, दोनो के साथ जिन्दगी बॅलन्स हो सकती है|

संबंधित बातम्या

नवरा नको गं आई, मला नवरा नको!
आई-वडिलांच्या निधनानंतर पोरकी झाले, २२व्या वर्षात लग्न केलं पण वर्षभरातच…
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
श्रद्धा, तू चुकलीस कारण….

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs PAK: “भारताचा आत्मविश्वास वाढू नये…” २६ वर्षापूर्वीच्या वादाला वसीम अक्रमच्या वक्तव्याने फुटले तोंड
पुणे: एसटी बसच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू; सोलापूर रस्त्यावर अपघात
व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा
विश्लेषण : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?
IPL 2023 Auction: ५५ खेळाडूंवर लागणार करोडोंची बोली; तर दोन-दीड कोटीच्या गटात एकाही भारतीयाला स्थान नाही