सुचित्रा प्रभुणे
चांगले करिअर, उत्तम पैसा, दुबईसारख्या शहरात वास्तव्य, हाताशी कार असे उत्तम आयुष्य सुरळीत सुरू असताना हे सर्व काही सोडून एका अज्ञात देशातील मागासलेल्या गावात राहायला कुणाला आवडेल का? अशी व्यक्ती एक तर वेडी तरी असेल किंवा नैराश्यग्रस्त तरी असेल, असाच आपला समज होईल. स्वीस रहिवासी असलेल्या सॅन्ड्रा लावी गोजकोविच यांची कहाणी काहीशी अशीच आहे.

जगातील श्रीमंत शहरांच्या मांदियाळीतील एक शहर म्हणजे झ्युरीच. अशा वैभवपूर्ण शहरात सॅन्ड्रा यांचे बालपण अत्यंत सुखाचे गेले. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये फार्मसी क्षेत्रात काम करू लागल्या. पुढे कामाच्या निमित्ताने त्यांनी दुबई गाठली. तिथे कॉर्पोरेटमध्ये काम करू लागली. उत्तम पगाराचे पॅकेज, स्वत:ची गाडी, राहायला उत्तम घर असे सर्व काही सुरळीत सुरू होते.

लहानपणापासून प्रवासाची आवड असल्यामुळे देश-विदेश फिरून झाले होते. अशाच एका भटकंतीत एक अनवाणी चालणारी मुलगी भेटली. तिची दया वाटली आणि तिने आपले बूट तिला देऊ केले. तेव्हापासून माझ्याप्रमाणे इतरही लोक सुखी असले पाहिजेत, हा विचार त्यांच्या मनात रूजला. त्यासाठी काहीतरी करायचे होते, नेमके काय ते मात्र कळत नव्हते.

अशातच एक दिवस तिचा निर्णय झाला. २०११ साली दोन कपड्यांचे जोड सोबत घेतले आणि भारताचे तिकीट काढले. भारतात येऊन काय करायचे काही काही माहित नव्हते. भारतातच जायचे हा निर्णय मात्र पक्का होता. इथे आल्यानंतर तिचा बराचसा भाग फिरून काढला. बस, रेल्वेने प्रवास केला. इथल्या समाजाचे, लोकांचे निरीक्षण केले. अचानक एक दिवस प. बंगालमधील सुंदरबन भागात असलेल्या सागर बेटावर जाण्याचा योग आला. तिथल्या परिस्थितीचे निरीक्षण केल्यानंतर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली ती म्हणजे, तिथे मुलांसाठी कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. आणि त्याचवेळी त्यांना त्यांच्या आयुष्याचा हेतू सापडला. स्वत:च्या साठविलेल्या बचतीमधून त्यांनी ‘इंडिया स्कूल प्रोजेक्ट’ सुरू केला. या शाळेमार्फत मुलांना आवश्यक त्या शिक्षणांबरोबर पोटभर पौष्टीक आहार उपलब्ध होईल, यां गोष्टींना प्राधान्य दिले.

एक परदेशी स्त्री आपल्या गावात येऊन शाळा उघडते, याविषयी गावातील लोकांच्या मनांत शंका होती. पण जसजसे घरोघरी जाऊन त्यांनी आपला विचार समजावून सांगितला, तेव्हा लोकांना हळूहळू त्यांच्यावर विश्वास बसायला लागला. आपल्या गावातच मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण व जोडीला पोटभर आहार मिळू लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली.

सुरुवातीला मुलभूत शिक्षण हाच विचार होता. पण जसजसा चांगला प्रतिसाद मिळू लागला, तसतसा त्यांनी शैक्षणिक धोरणात बदल केला. आज तिथे मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि ती स्वत:च्या पायावर उभे रहाण्यास सक्षम होतील, अशा स्वरूपाचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबरीने गावातील स्त्रियांचादेखील विकास व्हावा या हेतूने कौशल्यावर आधारित कामे त्यांच्याकडून करवून घेतली जातात. जेणेकरून चार पैसे कमावून त्यादेखील स्वावलंबी बनतील.

२०१२ मध्ये शाळा सुरू केल्यानंतर ते आजतागायत गावाच्या परिस्थितीत कमालीची सुधारणा झाली आहे. महिला आणि मुलांवर होणारी कौटुंबिक हिंसा मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. समानतेची मूल्ये लहानपणापासूनच मुले शाळेत शिकत असल्यामुळे स्त्री-पुरुष हे दोघेही समान आहेत, हा दृष्टीकोन विकसित होत आहे.

अर्थात हा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. गेल्या १४-१५ वर्षांत गावातल्या स्थितीमध्येदेखील चांगला फरक दिसून आला. चांगली ध्येय मनात ठेवून जर शिक्षणाचा योग्य तो प्रचार-प्रसार केला तर कमालीचा बदल घडून येऊ शकतो, हे सॅन्ड्राच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. ‘‘लहानपणापासून मी सुखाचा काळ बघितला आहे. पुढे तरुण वयात यशस्वी करिअर घडविल्यानंतरही मी सुखी होते. पण आज ‘इंडिया स्कूल’च्या निमित्ताने माझ्या आयुष्याचा खरा हेतू सापडल्यानंतर मी खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी आहे.’’ हे सांगताना सॅन्ड्राचा चेहरा आनंदून जातो.