आज तजामुल इस्लाम केवळ एक खेळाडू नाही, तर ती काश्मीर खोऱ्यातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक प्रेरणास्थान बनली आहे. तुमच्यात जिद्द असेल, तर परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही, हे तिनं जगाला दाखवून दिलं आहे.
काश्मीर खोऱ्याचा उल्लेख झाली की डोळ्यासमोर संघर्ष, दगडफेक, कर्फ्यू असे अस्थिर चित्र उभे राहते. या वातावरणात तिथल्या लहान मुलांचं बालपण कसं असेल, त्यांच्यावर काय परिणाम होत असतील याची कल्पनासुद्धा करवत नाही. पण याच वातावरणात एखादं मूल केवळ खेळ, स्वप्नं आणि उज्वल भविष्य घडविण्याच्या जिद्दीनेसुद्धा फुलू शकतं हा असा विचार जरा काल्पनिक कथांमध्येच बरा वाटतो. मात्र अशा वातावरणातूनच काश्मीरमधून तजामुल इस्लाम नावाची एक लहान मुलगी जिद्दीनं उभी राहते आणि स्वकर्तृत्वानं स्वत:चं व काश्मीरचं नाव जगात गाजवत आहे.
काश्मीरमधील श्रीनगरपासून ७० किलोमीटरवर असलेल्या बांदीपोरा येथील दुर्गम भागातील तारकपोरातील मुस्लिम कुटुंबातील तजामुल इस्लामचा जन्म. घरची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच. बेताची आर्थिक परिस्थिती आणि त्यात काश्मीरमधील अस्थिर सामाजिक वातावरण, अशा दुहेरी आव्हानांसोबत तजामुलचं बालपण सुरू झालं. गावातल्या शाळेत शिकत असताना वयाच्या ६ व्या वर्षी वुशु आणि किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली.
तजामुलला लहानपणापासूनच मैदानी खेळांची आवड होती. तिनं जेव्हा साहसी खेळ शिकण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला आणि तिच्या कुटुंबाला समाजातील धर्मांध लोकांकडून कौतुक कमी आणि विरोध सहन करावा लागला. पण तिच्या वडिलांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय मनाशी पक्का केला होता.
वयाच्या ६ व्या वर्षी अकादमीमध्ये प्रवेश घेतल्यावर तिनं किक बॉक्सिंगमधले बारकावे लवकरच आत्मसात केले आणि सरावावर जोर दिला. याचा परिणाम असा झाला की दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या भारतीय सब – ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग सपर्धेत अवघ्या वर्षभराच्या सरावाच्या जोरावर तिनं वयाच्या ७ व्या वर्षीच एका १३ वर्षाच्या प्रतिस्पर्धीला हरवून विजय मिळवला. त्यावेळी ती राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा जिंकणारी सर्वात तरुण महिला खेळाडू म्हणून नावारुपाला आली. तिचा हा विजयाचा आलेख पुढे चढाच राहिला.
राज्यस्तरीय स्पर्धेत ती अव्वल गुणांसह ती स्पर्धा जिंकत सुवर्णपदक जिंकलं. नोव्हेंबर २०१६ मध्ये इटलीत झालेल्या सब जागतिक सब ज्युनिअर किकबॉक्सिंग स्पर्धेत पाच दिवसांत सहा लढती जिंकून अंडर -९ च्या श्रेणीत अव्वल येऊन वयाच्या ७ व्या वर्षी जगातील सर्वात तरुण किकबॉक्सिंग ची जगज्जेत्ती ठरली. तिचा विजय फक्त एका खेळाडूचा विजय नव्हता, तर तो काश्मीरच्या बदलत्या प्रतिमेचा विजय होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
२०२१ मध्ये इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून तिनं आपली क्षमता सिद्ध केली. सलग दोनदा जागतिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली काश्मिरी मुलगी ठरली. पुढे तिनं भारत सरकारला काश्मीरमधील अस्थिर वातावरणावर, समस्यांवर तोडगा काढण्याची, काश्मिरी लोकांच्या वेदना दूर करण्याची मागणी भारत सरकारकडे केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्ष्मीकरणावरील परिषदेतसुद्धा सहभाग नोंदवला.
आज तजामुल इस्लाम केवळ एक खेळाडू नाही, तर ती काश्मीर खोऱ्यातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक प्रेरणास्थान बनली आहे. तुमच्यात जिद्द असेल, तर परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही, हे तिनं जगाला दाखवून दिलं आहे. २०१९ मध्ये वडिलांच्या साथीनं एक स्वतंत्र अकादमी चालू केली आहे. या अकादमीत आजपर्यंत शेकडो मुला- मुलींनी किकबॉक्सिंगचं प्रशिक्षण घेऊन शालेय, राज्यस्तरीय स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आहे.
तजामुलचा प्रवास हा केवळ पदकांचा प्रवास नाही, तर तो एका मुलीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या स्वप्नांचा लढा आहे. जेव्हा तिला विचारलं जातं की, तुझा आदर्श कोण? तेव्हा ती अभिमानाने सांगते, माझे वडील, ज्यांनी समाजाचा विरोध पत्करून मला साथ दिली.
तजामुलच्या या खेळातील धाडसाचे आणि कर्तृत्वाची दखल घेऊन तिला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे व भारत सरकारनं ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेसाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. २०२२ साली भारताचे गृहमंत्री अमित शाह काश्मीरच्या दौऱ्यावर असताना तजामुलची भेट घेतली. या भेटीत तजामुल ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. खूपच प्रतिभावान मुलगी आहे अशा शब्दांत तिला कौतुकाची थाप दिली. तजामुल इस्लामची कथा आपल्याला सांगते की, संघर्ष कितीही मोठा असला तरी स्वप्ने पाहणं थांबवायचं नसतं. काश्मीरच्या खोऱ्यातून उमटलेला हा किकबॉक्सिंगचा आवाज आज जागतिक स्तरावर गाजत आहे.
rohit.patil@expressindia.com
