प्रत्येक यशस्वी मुलीच्या जडणघडणीत तिच्या आईचा खूप मोठा वाटा असतो. मुलीच्या स्वप्नांना आई पंख तर देतेच, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या पंखांना बळही देते. तिच्यामागे भक्कमपणे उभी राहते. त्यामुळेच कितीतरी मुली अशक्य ते शक्य करू शकतात. भारताची नवी फुलराणी तन्वी शर्मा हिच्या बाबतीत तर हे अगदी खरं आहे. अवघ्या १७ वर्षांच्या तन्वी शर्मानं बॅडमिंटन क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ताईपे ओपन २०२६ या बॅडमिंटन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेत तन्वीनं महिला एकेरी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अशी कामगिरी करणारी ती सर्वात युवा खेळाडू तर ठरली आहेच, पण तिच्या या कामगिरीमुळे भारताला या स्पर्धेत १८ वर्षानंतर पहिल्यांदाच विजेतेपद मिळालं आहे. याआधी २००८ मध्ये सायना नेहवालने तैपेईचे विजेतेपद मिळवलं होतं. इतकंच नाही तर हे विजेतेपद म्हणजे तत्वीच्या करियरमधला पहिला बीडब्ल्यूएफ सुपर-३०० किताबही आहे. गेल्यावर्षी ती ओपन सुपर-३००च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. पण त्यावेळेस तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

भारताची आणखी एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू व पी.व्ही. सिंधुचे माजी कोच पार्क ते-सँग यांच्या मार्गदर्शनाखाली तन्वीला हे यश मिळालं आहे. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या तन्वीला इतक्या लहान वयात जागतिक स्तरावर एवढं घवघवीत यश मिळालं त्यामागे तिची अफाट मेहनत तर आहेच, पण तिच्या आईची तिला मिळालेली भक्कम साथही आहे. तन्वी मूळची पंजाबमधल्या होशियारपूरची आहे. तिची आईच तिची पहिली गुरू आणि कोच आहे असं ती सांगते. तन्वीची आई मीना शर्मा या शाळेत शारीरिक शिक्षण विषयाची शिक्षिका आहेत. त्या स्वत: व्हॉलीबॉलपटूही आहेत. मीना शर्मा य़ांनी मुलीला बॅडमिंटन खेळायला प्रोत्साहन तर दिलंच, पण तिला बॅडमिंटनचे प्राथमिक धडे देण्यासाठी त्या स्वत: आधी बॅडमिंटन शिकल्या.

पहाटे चार वाजल्यापासून तन्वीच्या प्रशिक्षणापासूनच त्यांचा दिवस सुरू होता. प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू होण्याआधी होशियारपूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये त्यांनी तन्वीचा कित्येक तास सराव करून घेतला. पण आईने तन्वीला खेळातले बारकावे तर शिकवलेच, पण त्याचबरोबर तिला शिस्त, खेळातली जिद्द, परीक्षेच्या काळात न डगमगण्याची शिकवणही दिली आणि भरपूर आत्मविश्वासही दिला. तन्वीचे वडील एडीसी कार्यालयात सुपरिटेंडंट म्हणून काम करतात. आपल्या मुलीच्या या यशाने तिले आईवडील आणि कुटुंबीय भारावून गेले आहेत. त्यांच्या या भक्कम साथीचा परिणाम म्हणजेच तन्वीने अगदी लहान वयातच गुवाहाटीतील नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स (NCE) गाठलं. तिथे तिला पार्क यांचे मार्गदर्शन मिळालं. पार्क यांनीच पी.व्ही.सिंधुला टोकियो ऑलिंपिकमध्ये मार्गदर्शन केलं होतं.

‘हे विजेतेपद मिळाल्याचा मला खरोखरंच प्रचंड आनंद होत आहे. मी खूप तयारी केली होती. पण हे विजेतेपद मिळेल अशी मला खरोखरंच अपेक्षा नव्हती. मी टप्प्याटप्प्याने खेळत गेले. त्यामुळे खरं तर माझी प्रत्येक मॅच चांगली झाली. मी खरं म्हणजे मॅचआधी खूप नर्व्हस झाले होते. पण मी माझे १०० टक्के देण्याचा निश्चय केला होता. तसंच मी खेळले आणि जिंकत गेले,” अशी प्रतिक्रिया जिंकल्यानंतर तन्वीनं दिली होती. तन्वीचा अंतिम फेरीतील सामना अजिबात सोपा नव्हता. तिनं सहाव्या मानांकित व्हिएतनामच्या थुई लिन्ह एनगुयेनचा २१-१६, २१- १६ असा पराभव केला. ३६ मिनिटे चाललेल्या या मॅचमध्ये लहान वयातही तन्वीला असलेली खेळाची समज सगळ्या जगाला दिसून आली. एवढ्या लहान वयात सुपर ३०० मध्ये नाव कोरणारी ती सर्वात लहान वयाची भारतीय खेळाडू ठरली आहे.

पी.व्ही सिंधू, सायना नेहवाल यांनी बॅडमिंटन क्षेत्रात भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलं. तन्वीनं त्याच वाटेवर चालत भारताची मान उंचावली आहे. तिच्याकडून येणाऱ्या काळात भरपूर अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. खरंतर भारतात खेळामध्ये करियर करण्याबाबत भारतात उदासीनताच होती. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलत आहे. घरातूनच मुलींना खेळात करिअर करण्यासाठी जर पाठबळ मिळालं तर त्या काय करू शकतात याचं तन्वी शर्मा हे उत्तम उदाहरण आहे. तन्वीची मेहनत आणि खेळातली प्रगल्भता पाहता यापुढे तिचा खेळ बहरत जाईल यात शंकाच नाही. तिच्या या यशामुळे भारतातील कितीतरी तरुण बॅडमिंटनपटूंना सकारात्मक संदेश मिळाला आहे.