Premium

गच्चीवरची बाग : खतासाठी माठाचा उपयोग

माठामध्ये हिरव्या कचऱ्यापासून काळ्या रंगाचे खत ४५ ते ६० दिवसांत मिळते. या पद्धतीत थोडी निमपेंड वापरल्यास उत्तम. या प्रकारात खरकटे अन्न व पातळ पदार्थ वापरू नयेत.

terrace garden
गच्चीवरची बाग

संदीप चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण भागात वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या घराच्या जवळ उकिरडा असायचा आणि या उकिरड्यामध्ये आपण जे काही तयार करायचो त्यालाच नैसर्गिक खत म्हणतात. परंतु त्या पद्धतीने तयार केलेल्या खताचा फारसा फायदा होताना दिसत नव्हता कारण ते तयार करताना अनेक दोष राहून जात असायचे. ते दोष दूर करून शास्त्रीय पद्धतीने खत तयार केले गेले तर मात्र ते खत गुणकारी व उपयुक्त ठरू शकते. नैसर्गिक खत तयार करण्यासाठी माठाचा चांगला वापर होतो. ओला, हिरवा कचरा या माठात टाकल्यास त्याचेही छान खत तयार होते. ही पद्धतही फ्लॅटमध्ये उत्तमरीत्या अंमलात आणता येते.

रोजचा हिरवा कचरा सुरीने अगदी बारीक करावा. तो वर्तमानपत्रावर तास दोन तास वाळवावा. सावलीत वाळवला तरी चालतो. माठात टाकावा. त्यावर झाकण ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवसाच्या कचऱ्यावर वरील प्रमाणेच प्रक्रिया करावी. दुसऱ्या दिवसाचा कचरा टाकण्यापूर्वी माठातील कचरा वर्तमानपत्रावर घेऊन मिक्स करावा. पुन्हा माठात टाकावा. असे रोजचे करत गेल्यास छान मऊ, काळ्या रंगाचे खत ४५ ते ६० दिवसांत मिळते. या पद्धतीत थोडी निमपेंड वापरल्यास उत्तम. तसेच हिरवा कचरा हा रोजसारखाच प्रमाणात वापरावा. हे खत आठवड्याला चमचा भर याप्रमाणे प्रत्येक कुंडीला द्यावे. या प्रकारात खरकटे अन्न व पातळ पदार्थ वापरू नयेत.

प्लॅस्टिक क्रेट्स…

बाजारात भाजीपाला व फळे वाहून नेणाऱ्या प्लॅस्टिकचे क्रेटस मिळतात. यात रोजचा हिरवा कचरा हवा तसा टाकून द्यावा. हिरवा कचरा सुरीने कापून घेतल्यास उत्तम. तो अडोशाला, निर्मनुष्य जागी ठेवता येतो. खुल्या वातावरणात गच्चीवर किंवा ऊन पावसात ठेवला तर उत्तम. पहिला क्रेट्स भरला की त्यावर दुसरा क्रेट ठेवावा, तो भरला की त्यावर तिसरा क्रेट् ठेवावा. तिसरा क्रेट भरला की पहिला रिकामा करून घ्यावा. त्यात छान खत तयार झालेले असते. या प्रकारात आपण आठवड्यातून एकदा या प्रमाणे ताक किंवा गुळाचे पाणी यापैकी एक किंवा आळीपाळीने दर आठवड्यास स्प्रे केल्यास कचरा कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. हिवाळ्यात यात गरम पाण्याचा शिडकावा द्यावा. कारण हिवाळ्यात नैसर्गिक जीवाणूंच्या निर्मितीची प्रक्रिया थंडावते. आठवडा पंधरा दिवसांतून एकदा गोमुत्राचा स्प्रे केल्यास चिलटे होत नाही. या क्रेट्सला शेडनेटचे हिरवे कापड किंवा नायलॉनच्या साडीचे अस्तर दिल्यास उत्तम. कचरा सुकवून संग्रही करता येतो. अधिकची काळजी म्हणून यात हिंग किंवा हळद ही चिमूटभर महिन्यातून एका शिपंडावी. तसेच छोट्या प्रमाणातील कचऱ्यासाठी क्रेटसऐवजी प्लॅस्टिकच्या बास्केटही आळीपाळीने वापरता येतात.

sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 04:40 IST
Next Story
गच्चीवरची बाग: खरकट्या अन्नापासून खतनिर्मिती