नदी, समुद्र, वन-जंगले अशी नैसर्गिक संपदा आपल्या देशाला भरभरून लाभली आहे. पण विचित्र योगायोग असा की, या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित करण्यास आपण भारतीय अग्रेसर असतो. आता हेच पाहा ना, कोणत्याही समुद्रावर फिरायला जावं, तर बहुतांश वेळा पाणी हे खराबच असतं आणि मग अशा पाण्यावर प्लास्टिक बाटल्या, खाद्य पदार्थाची रिकामी पाकिटे, इतर विविध स्वरूपाचा कचरा त्या समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसतो. नैसर्गिक ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणं, हे इतकं सवयीचं झालंय की त्यात आपल्याला काही वावगं वाटत नाही. पण पद्दुचेरी येथील १५ वर्षीय थारागाई आराधना या विद्यार्थिनीने मात्र अत्यंत कल्पकतेने या विरोधात आवाज उठविला आहे.

भरतनाट्यम् नर्तिका आणि स्कुबा डायव्हर असलेल्या थारागाईने रामेश्वरम येथील समुद्रात चक्क वीस फूट खोल पाण्यात जाऊन भरतनाट्यम् नृत्य सादर केलं. समुद्रात सातत्यानं जमा होणारा प्लास्टिक कचरा हा फक्त समुद्रासाठीच नाही तर आपल्यासाठीदेखील एक धोक्याची सूचना आहे, असा संदेश तिनं आपल्या या नृत्यातून दिला आहे.

समाजमाध्यमांवर तिचं हे नृत्य प्रसारित होताच फक्त देशातूनच नाही तर जगभरातील विविध ठिकाणाहून तिच्या या नृत्याची दखल घेतली गेली. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारचा स्विमिंग सूट न घालता पारंपारिक भरतनाट्यमचा पोशाख आणि त्यासाठी आवश्यक ती असणारी आभूषणे घालून तिने हे नृत्य सादर केलं. यावेळी तिला सहाय्य करण्यासाठी तिचा चुलत भाऊ अश्विनदेखील होता. तिनं ज्या गाण्यावर हे नृत्य सादर केले, त्याचा आवाज इतक्या खोलवर पोहचत नव्हता. पण आपल्या रोजच्या तालमीच्या जोरावर तिनं हे नृत्य पूर्ण केलं व त्याव्दारे आवश्यक तो संदेश लोकांपर्यत पोहचविण्यात यशस्वी झाली.

नृत्य सादर करण्यासाठी समुद्राचीच निवड का केली, यावर व्यक्त होताना थारागाई म्हणते की, स्कुबा डायव्हिंगच्या निमित्तानं समुद्राच्या तळाशी खोलवर जाताना तिथं दिसणारा प्लास्टिक कचऱ्याचा ढीग पाहून जीव तळमळला. हे प्लास्टिक समुद्राखाली असणाऱ्या सर्व जैविक घटकांवर परिणाम करतंय. खरं तर ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि लोकांना याची तितकीशी जाणीव नसते ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. ही जाणीव लोकांपर्यत पोहचावी म्हणून नृत्याची मदत घेतली.

तसं पाहिलं तर समुद्रात इतक्या खोलवर ऑक्सिजनशिवाय राहणं, ही नवलाईची गोष्ट आहे. परंतु थारागाई हिनं स्कुबा डायव्हिंगमधील काही तंत्रे, श्वास नियंत्रणाची कौशल्ये आत्मसात करीत हे नृत्य सादर केले.

आपली जीवनशैली जसजशी प्रगत आणि अत्याधुनिक होत आहे, तसतसा नदी-नाले, समुद्र, जंगले इथला कचरादेखील भरभरून वाढत आहे. हातातला प्लास्टिक कचरा कुठेही फेकला की संपली आपली जबाबदारी, ही विचारसरणी बदलायची गरज निर्माण झाली आहे. अन्नसाखळीला बाधक ठरणारा हा कचरा जोपर्यंत आपल्या जीवाला बाधक ठरीत नाही, तोपर्यंत या प्रश्नावर कठोरपणे पावलं उचलली जाणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणूनच जेव्हा तरुण विद्यार्थिनी त्यांच्या परीने याविरोधात आवाज उठवितात, तेव्हा तो फक्त समुद्राच्या तळाशीच खोलवर पोहचत नाही तर मानवी हृदयातदेखील तितकाच खोलवर तरंगलहरी निर्माण करतो, हे थारागाई हिनं खूप सूचकपणे दाखवून दिलं आहे.