चौसष्ट कलांचा अधिपती गणपती अन् साजिऱ्या गोजिऱ्या गौरीचे आगमन झाले. विविध कलागुणांचा आविष्कार हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. यात पाककौशल्यही आलेच. गणरायांसाठी, गौरींसाठी गृहिणी रुचकर पक्वान्नांची रेलचेल करतात. अन् सुग्रास भोजन घरच्यांना खाऊ घालतात. या भोजनानंतर हवा सुगंधी, द्रव्ययुक्त, पाचकरसयुक्त, मधुररसयुक्त, त्रयोदशगुणी विडा.

गुणवंत विड्यासाठी कमीतकमी तेरा पदार्थ हवेत. नागवेलीचे कोवळे पान, चुना, कात, सुपारी, बडीशेप, गुंजपाला, जायपत्री, वेलदोडा, लवंग, गुलकंद, खोबरे, जेष्ठमध आणि कंकोळ. यात केशराची काडी घातल्यास स्वाद व लज्जत वाढते अन् हा होतो चर्तुदशगुणी विडा. खायचा कापूर अन् केवडा घातला तर षष्ठोदशगुणी विडा होतो! यातील चुना वगळला तर सर्व पदार्थ वनस्पतीजन्य आहेत आणि त्यातील काही वनस्पती आपण बागेत लावू शकतो.

best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज
how to take Care of indoor plants
घरातल्या झाडांची निगा

विडा म्हणजे नागवेलीच्या पानात, अल्पमात्रात विविध औषधी सुगंधी गुणधर्माच्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, कळ्या, खोडाचे (चूर्ण) घालून केलेली वैशिष्ट्यपूर्ण बांधणी. नागवेलीच्या पानाचा वेल बागेत जमिनीत अथवा छोट्या कुंडीतही लावता येतो. वाटिकेत रोप मिळतात. एखाद्या मैत्रिणीकडे वेल असेल तर पाच-सहा डोळे असलेले कडे जमिनीत आडवे खोडून वर माती घालावी. सहज फुटते. मध्यम ऊन व रोज पाणी लागते. भिंतीचा आधार मिळाला तर खूप वाढते, नाही तर झाडावर चढवावा. कुंडीत काठीचा आधार द्यावा. मघईची मुलायम, चविष्ट भरपूर पाने मिळतात. भारतात अनेक ठिकाणी व्यावसायिक लागवड करतात. कर्नाटकात शिमोगा येथे नागवेलीची शेती पाहायला मिळाली. हातगा किंवा शेवग्याची झाडे जवळजवळ लावून त्या सोटावर वेल चढवतात. पाने काढताना पुरुषच काढणी करतात. काही ठिकाणी अनवाणीच काढणी करतात.

विड्यातील कात खैर या वृक्षापासून करतात. खैर वृक्षाची साल उकळतात व त्याच्या अर्कापासून कातवड्या बनवतात. पान खाल्यानंतर लाल रंग येतो तो कातामुळे. तुमच्या परिसरात खैर वृक्ष असेल तर त्याला जपा. पक्ष्यांचा तो आवडता आसरा आहे. भटकंती करायला गेलात तर नाजूक पानांचा, पांढऱ्या तुऱ्यांचा खैर ओळखायला शिका. डॉ. शरदिनी डहाणूकर या फुलांच्या तुऱ्यांना फुलबाजा म्हणतात, ते सार्थच वाटते.

हेही वाचा… युटिलिटी: केस कुरळे करण्याचा दावा करणारा ‘मायक्रोवेव्हेबल जेल कर्लर’!

सुपारी वाचून आपल्या धार्मिक कार्याचे पान हलत नाही. विड्यासाठी ही सुपारी हवी. कत्री, कुटलेली, खडी सुपारी पानात वापरतात. उत्तर पूर्वेकडे ओली सुपारी वापरतात. कारण थोडी नशा येते. पामकुलातील ही उंच देखणी झाडे गृहसंकुलामध्ये लावायला छान आहेत. कोकणात पोफळीच्या वाड्या असतात. तिथे झावळ्या, बुंध्याचाही वापर होतो. आता झावळ्यांच्या ताटल्या, वाट्या करतात. त्या आपण आवर्जून वापराव्यात. महाराष्ट्रीय स्वयंपाकात बडीशेप फार वापरत नाहीत. पण पानात स्वादासाठी व पाचक म्हणून घालतात. पाने नाजूक असतात. सुवासिक असतात. पिवळ्या नाजूक फुलांचे घोस येतात व नंतर नाजूक छोटे दाणे तयार होतात.

गुंजवेल रानावनात आढळते. मध्यम वेल, नाजूक पर्णिका असतात. पांढुरक्या जांभळ्या फुलांचे तुरे येतात. नंतर बोटभर लांबीच्या हिरव्या शेंगा येतात. शेंगाचे गुच्छ उकलतात. तेव्हा आत लाल रंगावर काळा ठिपका असलेल्या गुंजा असतो. गुंजा अती विषारी असतात. पण पाला औषधी, उग्रसर गोड असतो. पूर्वी गुंजा सोनं मापण्यासाठी वापरत. कारण प्रत्येक गुंजेचे वजन सारखे असते. शहाण्णव गुंजा म्हणजे एक तोळा सोने. गुंजापासून रोप तयार होतात. माझ्याकडे सात-आठ वर्षांपासून वेल आहे. खूप पाने मिळतात. गुंजापासून रोप तयार झाली की मैत्रिणींना देता येतात.

विड्यात सुगंधासाठी जायपत्री वापरतात. जायफळाच्या बाहेरचे लाळुंगे आवरण म्हणजे जायपत्री. जायफळाचा वृक्ष मध्यम असतो. त्यास सावली आवडते. नर-मादी वृक्ष असतात. दोन्ही जवळ लावले तर फळधारणा होते. हा वृक्ष सुंदर दिसतो. गृहनिर्माण संस्थांमध्ये जरूर लावावा. सात-आठ वर्षांनी जायफळे लागतात. ती काढून वरची जायपत्री काढून वाळवतात. विड्यात मसाल्यात वापरतात कारण सुगंधी असते.

दंतरोगावर गुणकारी लवंगेचा वापर विड्यात सयुक्तिकच आहे. याचाही मध्यम वृक्ष असतो. याच्या फुलांच्या कळ्या म्हणजे लवंग. लवंगेने स्वाद तर वाढतोच. पण पान व मसाल्याला ती बांधून ठेवते व विड्याचे रूप खुलवते.

आले कुटुंबातील वेलदोडा यास कोण विसरेल? सोनटक्क्य़ासारखी पाने, पांढुरकी फुले येतात. नंतर वेलदोडे लागतात. केरळ, सिक्कीममध्ये शेती करतात. याचा एखादा दाणा विडा सुगंधी करतो.

घरच्या गुलाब पाकळ्यांचा गुलकंद विड्यास माधुर्य अन् पोटात थंडावा देतो. ताजे खोबरे विडा अधिक रसदार बनवेल, तर खायचा कापूर, केशर, केवडा याने शाही विडा होईल. ओवा बाळंतशोपा घालून बाळंतिणीसाठी औषधी विडा करता येईल. यातील जास्तीत जास्त वनस्पती मिळवून बागेत लावा अन् टुटी फ्रुटी, चॉकलेट विडा खाण्यापेक्षा घरच्या नागवेलीच्या पानाचा आरोग्यपूर्ण विडा खा.