यूपीएससी परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी होण्यासाठी दरवर्षी लाखो तरुण- तरुणी या परीक्षेला बसतात. यासाठी ते जीवापाड मेहनत घेतात. मोजकेच या परीक्षेत पास होतात. यातील काहीजणांचा संघर्ष हा समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आलेला आहे. आजवर आपण गरीबीतून वर आलेल्या अधिकाऱ्यांचा संघर्ष पाहत आलो आहे. आज अशाच एका महिला अधिकारीच्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्या घरची परिस्थिती उत्तम होती. पण लग्नानंतर आयुष्य एकाएकी बदलून जातं, पण त्या हार न मानता संघर्ष करत राहिल्या आणि आज आयएएस अधिकारी बनल्या आहेत. त्यांचं नाव शिवांगी गोयल.
उत्तरप्रदेशमधील हापुड शहरातील पिलखुवा येथील रहिवासी. सर्व शिक्षण, जडणघडण इथलीच. घरची आर्थिक परिस्थितीदेखील चांगली होती. लहानपणापासूनच शिवांगी अभ्यासात अव्वल होत्या. मोठं होऊन आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचं स्वप्न होतं. तसा त्यांनी दोनवेळा प्रयत्नसुद्धा केला, पण यश आलं नाही. नंतर आई-वडिलांनी मुलगी वयात आली म्हणून लग्नाचा तगादा लावला. अखेर आई-वडिलांचा मान ठेवत त्यांनी लग्न केलं. नवीन लग्न झाल्यानंतर नव्या नवरीप्रमाणे त्यादेखील सुखी संसाराची स्वप्नं रंगवत होत्या. पण लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांचा सासरच्यांकडून कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागलं. सासरच्यांनी त्यांना माहेरून पैसे आणण्यासाठी छळ चालू केला. त्यामुळे मानसिक तणावात जाऊन आत्महत्येचे देखील विचार त्यांच्या मनात येऊ लागले. अधूनमधून आईवडील येऊन सासरच्यांबरोबर चर्चा करून तडजोड करून जात, पण नंतर काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती.
दरम्यानच्या काळात त्या गरोदर राहिल्या. एका गोंडस मुलीला जन्म दिला. निदान मूल झाल्यावर तरी परिस्थिती बदलेल या आशेवर त्या सर्वकाही सहन करत राहिल्या. पण पती आणि सासरच्यांकडून काही त्यांचा छळ थांबला नाही. अखेर त्या सासरच्या जाचाला कंटाळून मुलीला घेऊन माहेरी निघून आल्या. आपल्या मुलीची दयनीय अवस्था पाहून आईवडिलांनी देखील तिला आधार दिला. एक दिवस वडीलच त्यांना म्हणाले की, ‘‘तू कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेऊ नकोस. तुला आम्ही टाकून देणार नाही. तुला जे पाहिजे ते तू कर. आम्ही तुझ्या पाठंशी खंबीरपणे उभे आहोत.’’ शिवांगी यांना वडिलांच्या या बोलण्याने बळ मिळाले व त्यांनी पुन्हा यूपीएससी देण्याचा निर्धार केला. लग्नाअगोदर दोन वेळच्या प्रयत्नात अपयश आले असले तरी यावेळी मात्र त्यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. १७७ वी रँक मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या.
शिवांगी म्हणतात की, मी समाजातील त्या सर्व विवाहित महिलांना सांगू इच्छिते की, सासरी तुमच्यासोबत काही चुकीचे होत असेल, किंवा अत्याचार होत असतील तर घाबरून जाऊ नका. त्यांना विरोध करून तुम्ही तुमच्या पायावर उभे राहून तुम्ही काय आहात हे सिद्ध करून दाखवा. आपण ठरवलं तर खूप काही करू शकतो. फक्त आपला आत्मविश्वास डळमळू दिला नाही पाहिजे. सासरचा जाच सहन होत नाही म्हणून आत्महत्या करणे हा योग्य नाही. तसेच अशा पडत्या काळात म्हणजे जर आपल्या मुलीला सासरी जाच होत असेल तर मुलीच्या आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिला आधार दिला पाहिजे.
एरवी सासर सोडून माहेरी आलेल्या मुलींना नेहमीच समाजातून टीकेचा, टोमण्यांचा जाच सहन करावा लागतो. पण आता आयएएस अधिकारी झाल्याने शिवांगीचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा संघर्ष हा अनेक महिलांसाठी खासकरून ज्या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरू लागला आहे.
rohitpatil.loksatta@gmail.com