Twisha Sharma dowry death case : “मुलगी मृत असण्यापेक्षा ती घटस्फोटित असलेली चालेल,” असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्विशा शर्मा आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नमूद केलं. गेल्या काही दिवसांत नवविवाहित तरुणींच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण पाहता, सर्व पालकांनी या वाक्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण कौटुंबिक प्रतिष्ठेपेक्षाही आपल्या घरात लाडाकोडात वाढलेली मुलगी आणि तिचं सुख अधिक महत्त्वाचं असतं. दुर्दैवाने, जुनाट झालेल्या हुंडाप्रथेला आजकाल ‘भेटवस्तू’ (Gifts) असं आधुनिक नाव देऊन गोंडस रूप दिलं गेलं आहे; परंतु आजची तरुण पिढी याविरोधात आवाज उठवू पाहत आहे.

कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात…

हुंडाबळीविरोधात सुजाण नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्विशा शर्मा आत्महत्या प्रकरणावर तर समाजातून तीव्र चीड व्यक्त झाली. याचं कारण म्हणजे, तिची सासू स्वतः जिल्हा न्यायाधीश होती. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करावी, त्यांनीच प्रथा-परंपरांच्या नावाखाली आपल्याच घरातील सुनेवर अन्याय-अत्याचार करावा, ही गोष्ट अत्यंत संतापजनक आहे. २१ व्या शतकातही हुंड्यासाठी छळ होत असेल आणि तो सहन न झाल्याने मुलींना आत्महत्या करावी लागत असेल, तर समाज म्हणून आपण अद्याप प्रगल्भ झालेलो नाही, हेच उघड होतं.

माहेरच्यांची भूमिका आणि कडाडून विरोध

याबाबत मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेली दीपाली भोसले म्हणते, “जेव्हा सुरुवातीलाच सासरच्यांकडून लोभापायी कशाचीही मागणी केली जाते, तेव्हाच माहेरच्यांनी त्याला कडाडून विरोध केला पाहिजे. मुलीच्या संसारासाठी सासरच्यांची प्रत्येक चुकीची मागणी मान्य करणं चुकीचं आहे. हुंडाबळीला जितके सासरचे जबाबदार असतात, तितकेच माहेरचेही असतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये हुंडा घेणाऱ्यांइतकेच हुंडा देणाऱ्यांनाही दोषी धरलं पाहिजे. माझ्या लग्नात माझ्या आईने स्पष्ट बजावलं होतं की, आम्ही लग्नात कोणताही अतिरिक्त मानपान करणार नाही आणि यावरून आमच्या मुलीला लग्नानंतर त्रास दिला जाता कामा नये. परिणामी, माझ्या सासरच्यांनी हुंड्याबाबत कधी एक शब्दही काढला नाही.”

एचआर क्षेत्रात कार्यरत असलेली गायत्री राणे म्हणाली, “माझा प्रेमविवाह आहे. माझ्या लग्नाआधी माझ्या नणंदेचं लग्न झालं. तिच्या लग्नात भेटवस्तू दिल्या गेल्या. त्यामुळे मला वाटलं की माझ्याही लग्नात आम्हाला हे सर्व द्यावं लागेल. पण मी माझ्या लग्नाच्या वेळी एकदम स्पष्ट सांगितलं होतं की लग्न आमच्या पद्धतीनेच होणार आणि जे मला मान्य नाही ते होणारच नाही. पण सुदैवाने माझ्या सासू-सासऱ्यांनी काहीच मागणी केली नाही. सर्वकाही सुरळीत पार पडलं. पण एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की आपल्या आई-वडिलांची संपूर्ण जमापूंजी आपल्या लग्नात खर्ची होते. त्यामुळे अशा गोष्टी बंद झाल्या पाहिजेत.”

परतीचे दोर कापू नका: मुलींसाठी दरवाजे उघडे ठेवा

“त्विशाला होत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल तिने तिच्या घरी सांगितलं होतं. सासरच्या घरात तिचा जीव गुदमरतोय, असं तिने वारंवार सांगूनही तिच्या पालकांनी तिला ‘सहन कर’ असाच सल्ला दिला. सवयीने या गोष्टी अंगवळणी पडतात, अशी जुन्या लोकांची धारणा असते. पूर्वीपासूनच महिलांना सहनशीलता शिकवली जाते आणि कोणत्याही परिस्थितीत महिलेने संसार रेटून न्यायचा असतो, असे संस्कार केले जातात. दुर्दैवाने, हेच संस्कार आजच्या उच्चशिक्षित महिलांवरही लादले जात आहेत. ज्यांना हा अत्याचार सहन होत नाही, त्यांना माघारी परतायचे असते; पण सामाजिक प्रतिष्ठेपायी आई-वडील आपल्या मुलीच्या परतीचे दोर कापून टाकतात आणि अखेर मुली आत्महत्या करतात”, असं फायनान्स क्षेत्रात काम करणारी निकीता मुरकर सांगते.

निकीता पुढे म्हणाली, “परिस्थिती कशीही असो, आपल्या मुलीसाठी माहेरचे दरवाजे कायम उघडे असायला हवेत. पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणातही असंच घडलं होतं. तिला घरी परतायचे होतं, पण तिच्या आई-वडिलांनी तिला पुन्हा सासरी पाठवले आणि शेवटी तिने मृत्यूला कवटाळले. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणूनच समाजाच्या प्रतिष्ठेपेक्षा मुलीचा जीव महत्त्वाचा मानला पाहिजे. सासू-सासऱ्यांचा जाच वाढत असेल, तर आई-वडिलांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मुलीला सन्मानाने घरी परत आणावं. म्हणूनच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे विधान तंतोतंत खरे आहे.”

बदलाची सुरुवात स्वतःपासून!

‘Charity begins at home’ म्हणजेच समाजात बदल घडवायचा असेल तर आधी स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी लागते. याबाबत प्रणाली कदम हिचा आदर्श घेण्यासारखा आहे. ती म्हणते, “आमच्या समाजात आजही लग्नात ‘भेटवस्तू’च्या नावाखाली छुपा हुंडा घेतला जातो. मानपानावर लाखांचा खर्च केला जातो. ज्या घरात चार-पाच मुली आहेत, त्यांचे आई-वडील अशा परिस्थितीमुळे कर्जबाजारी होतात आणि मेटाकुटीला येतात. त्यांची ही अवस्था पाहून मी माझ्या लग्नात एक निर्णय घेतला. जर ही चुकीची प्रथा बदलायची असेल, तर सुरुवात माझ्यापासूनच व्हायला हवी. मला बघायला येणाऱ्या स्थळांना मी स्पष्ट सांगायचे की, आमच्याकडून भेटवस्तूच्या स्वरूपात एकही वस्तू दिली जाणार नाही, कोणताही मानपान होणार नाही आणि लग्नाचा खर्च दोन्ही बाजूंनी अर्धा-अर्धा उचलला जाईल. ही अट ऐकून अनेकांनी मला सुरुवातीला नाकारलं. पण शेवटी एक सुजाण कुटुंब मिळालं, ज्यांना माझे विचार पटले. त्यांनाही दोन मुली असल्याने त्यांना माझी बाजू समजली आणि अत्यंत थाटामाटात, पण कोणत्याही अवाजवी देवाण-घेवाणीशिवाय आमचं लग्न पार पडलं.”

अर्थसाक्षरतेसोबतच हवी मानसिक आणि कायदेशीर खंबीरता

“हल्ली मुली खूप शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि अर्थसाक्षरही बनतात. मग अशा वेळी त्या स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पाऊल उचलण्यास इतका वेळ का घेतात?” असा प्रश्न वकिलीचं शिक्षण घेणारी पूजा घरत विचारते. ती पुढे म्हणते, “सासरच्या छळामुळे जर जीव गुदमरत असेल आणि माहेरी परतायचे मार्ग बंद झाले असतील, तर मुलींनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत. किरण बेदी यांनी म्हटल्याप्रमाणे, त्विशाने त्या घरातून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व जपायला हवं होतं. ती उच्चशिक्षित आणि कमावती होती, मग सासरच्या जाचातून सुटण्यासाठी तिला पालकांच्या परवानगीची वाट का पाहावी लागली? आपल्याकडे मुलींना केवळ अर्थार्जनापुरते शिकवलं जातं, परंतु त्यांना कायदेशीर ज्ञान दिलं जात नाही आणि मानसिकदृष्ट्या खंबीर बनवलं जात नाही. त्यामुळे अशा चक्रव्यूहातून कसं बाहेर पडावं हे न समजल्यामुळे अनेक मुली टोकाचं पाऊल उचलतात.”

अन्यायाविरुद्ध सामर्थ्यवान व्हा!

त्विशा शर्माच्या आत्महत्येनंतर हुंडाबळीची आणखी काही प्रकरणे समोर आली. नोएडामधील दीपिका नागर या तरुणीने लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांतच आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी लग्नात ५० लाखांचे दागिने, स्कॉर्पिओ गाडी आणि १० लाख रुपये रोख दिले होते. तरीही अधिकच्या हव्यासापोटी सासरच्यांनी तिचा छळ सुरूच ठेवला. इतकी संपत्ती देऊनही जर मुलीचा जीव जात असेल, तर माहेरच्यांनी सासरच्यांचे इतके लाड का करावेत? हा मोठा प्रश्न आहे.

यावर ‘एक्स्ट्रिम शोटोकोन कराटे क्लासेस’च्या प्रशिक्षिका वर्षा कांबळी-टाकळे यांनी काहीशा उपरोधाने म्हटलं, “मी माहेरून इतकी संपत्ती घेऊन गेले असते, तर मीच उलट त्यांचा छळ केला असता!” पुढे गंभीर होत त्या म्हणल्या, “कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करता येत नाही. मुलीकडून किंवा मुलाकडून झालेला शारीरिक अथवा मानसिक छळ हा गुन्हाच आहे. त्यामुळे मुलींनी आता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी न राहता, अन्यायाविरोधात प्रत्यक्ष आवाज उठवण्याइतपत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनले पाहिजे.”