भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
कोलेस्टेरॉल जीवनासाठी गरजेचा असलेला मेणासारखा, चरबीसारखा पदार्थ आहे. कोलेस्टेरॉल शरीरासाठी महत्वाचे कार्य करत असते. पेशींची रचना, पेशींना लवचिक आणि टिकाऊ बनवतो. पचनासाठी आम्ल पित्त तयार करतो. कोलेस्टेरॉल स्टिरॉइड हार्मोन्स, लैंगिक हार्मोन्सच्या निर्मितीत मदत करतो. तसेच ड जीवनसत्वाच्या संश्लेषणात मदत करतो. त्यातून कॅल्शियम निर्मिती होते. तसेच कोलेस्टेरॉल अ, ई, के जीवनसत्व यांच्या निर्मितीत मदत करते. इतक्या सगळ्या गोष्टी कोलेस्टेरॉल करत असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाईट नाही शरीरासाठी आवश्यक आहे.

आपलं शरीर स्वतः कोलेस्टेरॉल तयार करत असतं. प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी कोलेस्टेरॉल गरजेचं असतं. आपण जेव्हा अति रागराग करतो, आरडाओरडा करतो, भांडतो, मारामारी करतो, शारिरीक-मानसिक इजा करून घेत असतो; तेव्हा शरीरात त्या विरुद्ध लढण्यासाठी कॉर्टिसॉल आणि स्ट्रेस हार्मोन तयार होतं. धमन्यांच्या आतल्या स्तरांमध्ये हे स्ट्रेस हार्मोन भेगा पाडतात. त्यामुळे धमनी फाटू शकते, फुटू शकते. त्यातून रक्ताच्या गुठळ्या होऊन हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी निसर्गाची यंत्रणा किती सक्षम आहे पाहा- आपला ‘मेंदू’ यकृताला कोलेस्टेरॉलला तयार करण्याचा आदेश देतो. आणि कोलेस्टेरॉलला ज्या ज्या रक्त वाहिनींच्या स्तरांना भेगा पडल्यात तिथे, झीज भरून काढायला पाठवतो.

कोलेस्टेरॉल चरबीयुक्त असल्याने रक्तात मिसळू शकत नाही. त्याला विशिष्ट प्रथिन म्हणजेच लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन (एलडीएल) पेशींपर्यंत पोहोचवते. तिथे ब्लॉकेज नसून कोलेस्टेरॉल भेगा बुजवण्याचं, झीज भरून काढण्याचं काम तातडीने सुरू करतं. म्हणून कोलेस्टेरॉल रक्त वाहिनीच्या आत चिकटलेलं दिसतं. परंतु याची पातळी खूप जास्त झाल्यास धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करणारा प्लाक तयार होऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढलंय म्हणजे हृदय विकाराचा झटका निर्माण होईल असे नाही, तर कोलेस्टेरॉल वाढलंय म्हणजे ते आपल्या शरीराला हृदय विकाराचा झटका होण्यापासून वाचवत असतं. काम झाले की हाय-डेन्सिटी लायपोप्रोटीन (एचडीएल) हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी यकृताकडे परत घेऊन जातं.

सर्व प्रथम कोलेस्टेरॉलमुळे हृदयाला हानी झाली आहे का बघणे महत्त्वाचे आहे. थोडे कोलेस्टेरॉल वाढले म्हणून झोप उडवून घ्यायची गरज नाही. हृदयाच्या सीटी स्कॅनमध्ये ब्लॉकेज नसेल तर घाबरायचे कारण नाही. आपल्या हृदयात कोरोनरी आर्टरी असते. या धमनीला कोलेस्टेरॉलमुळे काही नुकसान, धोका नाही ना हे तपासून पाहावे.

महिलांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे :

कोलेस्टेरॉल वाढण्याचं कारण रक्त वाहिनीची इजा असते. इजा होण्याचे कारण मानसिक तणाव असतो. अति विचार, अति टेन्शन घेण्यामुळे, इजा पोहोचवल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते. जीवनशैलीतील बदलामुळे, बैठी जीवनशैलीमुळे वाढते, किती वाजता जेवतो, झोपतो. तंबाखू, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असेल तर कोलेस्टेरॉल वाढते. तंबाखूमध्ये निकोटीन असते ते रक्तवाहिनीच्या आतील पदर (एंडोथिलीयम) फाडत जाते त्यामुळे धमनी फाटू शकते म्हणून कोलेस्टेरॉल तिथे पॅच अप करायला येतं. म्हणून वाढलेलं दिसतं. खाण्यातील कार्बोदकांमुळे वाढते.

हे लक्षात ठेवा :

रक्तातील कोलेस्टेरॉल वेगळे आणि शरीरावर दिसणारी चरबी वेगळी. या दोन चरबीमध्ये काही समांतर नाही. वजनाचा आणि कोलेस्टेरॉलचा थेट संबंध नाही. कोलेस्टेरॉल जेवणातील चुकांमुळे वाढत नाही, कारण ८०% कोलेस्टेरॉल आपले शरीर स्वतः तयार करतं आणि उरलेले १५-२०% कोलेस्टेरॉल फक्त खाण्यातून वाढतं.

मांसाहाराने हृदय विकाराचा झटका आणि कोलेस्टेरॉल वाढत नाही. वाढले असते तर सर्व मांसाहारी प्राण्यांना हृदय विकाराचा झटका आला असता.
खाद्यतेलामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. कोणतेही खाद्यतेल वाईट नाही. फक्त त्या तेलात पदार्थ Smoking pointला तळला तर ते ट्रान्स फॅटी ॲसिड बनवतात. परत परत त्याच तेलात तळलेले पदार्थ खाऊन निर्माण झाले कि ट्रान्स फॅटी ॲसिड धमन्यांना भेगा पाडतात म्हणून ती रक्त वाहिन्यांसाठी घातक आहेत. मात्र खाद्यतेल तैल बियांपासून बनलेली शेंगदाणे, अक्रोड, बदामतेल, घरचं साजूक तूप आहारात घेतलं तर हाय-डेन्सिटी लायपोप्रोटीन (एचडीएल) वाढवतात त्यामुळे पेशींच्या भिंती नीट ठेवण्याचे काम होते. लाकडी घाण्याची तेलं कमी प्रमाणात चांगली मात्र तळून खाऊ नये.

ट्रायग्लिसराइड वाढतात ते पिष्टमय पदार्थ खाल्ल्याने वाढू शकतात. कार्बोदके किंवा पिष्टमय पदार्थ कमी केले जसे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ तरी ट्रायग्लिसराइड कमी होऊ शकतात.

प्रमाण :

ट्रायग्लिसराइड १५० mg/dl पेक्षा कमी, लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन (एलडीएल)- १०० mg/dl पेक्षा कमी, हाय-डेन्सिटी लायपोप्रोटीन (एचडीएल) ६० mg/dl पेक्षा जास्त हवे.

कोलेस्टेरॉल फक्त गोळ्या घेऊन कमी केले तर त्याचे धोके आहेत. एलडीएल कमी होण्याबरोबर एचडीएलसुद्धा कमी होऊ शकते. एलडीएल बऱ्याच प्रमाणात कमी झाले तर लैंगिक आजार, जसे की नापुसंकता येणं असे आजार होतात. कोलेस्टेरॉलच्या गोळ्यांनी जलद कमी केले तर विसरभोळेपणा, हात-पायांना गोळे येणे, थकवा येणे, संभ्रम, लैंगिक ताकद कमी होते. शरीराची झीज वाढत गेली आणि दुरुस्त करायला कोलेस्टेरॉल नसेल तर स्तनाचे कर्करोग, पित्त, असिडीटी, पोट फुलल्यासारखे वाटणे, गॅसेस, पोट साफ न होणे.

हे करा :

वयाच्या विशीपासून दरवर्षी ईसीजी, २डी एको, हृदयाचे सीटी स्कॅन (नॉर्मल असेल तर दर पांच वर्षांनी, पोटाचे, छातीचे सीटी, पोटाची सोनोग्राफी, कोरोनरी सीटी अँन्जियोग्राम, कोरोनरी आर्टरी कॅल्शियम स्कोअर (संख्यामक मूल्य) तुमच्या धमन्यांमधील कॅल्शियमयुक्त प्लाकचे प्रमाण मोजते. कोरोनरी आर्टरीचा आजार, हृदय विकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका तपासण्याचे साधन म्हणून काम करते. तसेच लिव्हर फंक्शन चाचणीदेखील करून घ्यावी.

भारतात ३३% अकाली मृत्यू हृदयरोगामुळे होतात. १७% अकाली मृत्य कर्करोगामुळे होतात. एकूण ५०% अकाली मृत्यू योग्य तपशीलवार तपासणी केली तर आज टाळता येऊ शकतात. केवळ रक्त तपासणी म्हणजे संपूर्ण आरोग्य तपासणी नाही. या सर्व तपासण्या ६० मिनिटात करता येतात. त्यांचे सामाजिक, आर्थिक, आरोग्यदायी परिणाम होतील. आपण भारतीय काही व्हायला लागले की चाचणी करतो आणि शेवटच्या क्षणी धावाधाव करतो.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय करावे :

नियमित व्यायाम करावे. अति जास्त व्यायाम करू नये. साखर ज्यात असते त्या सर्व गोष्टी बंद कराव्यात. साखर, गुळ, मध, ऊसाचा रस, शुगरफ्री ची गोळी हे बंद करावे. डेअरी आणि बेकरी पदार्थ टाळावे. फक्त तीन वेळचं जेवण घ्यावे. मध्ये वेफर, तळलेले पदार्थ. लोणची, चटणी, पापड, मुरंबा, आंबवलेल्या गोष्टी टाळाच. स्मार्ट घड्याळ घालून रोज १०००० पावले चालल्याने सर्वच रोगापासून दूर राहू शकतो. दर तासाला ५ मिनिटे तरी चालावे. सतत खुर्चीवर बसणे म्हणजे एखाद्या सिगारेटसारखे घातक आहे. घरातील सर्व भाज्यांचे ज्यूस, सूप, रोज दोन टोमॅटो दोन्ही जेवणाआधी, आवळा खावा याने शुगर कमी व्हायला मदत होते.

औषधे कशी कार्य करतात :

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी औषधे रक्तातील हानीकारक एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका टाळण्याचे काम करतात.

  • स्टॅटीन्स- यकृतामध्ये कोलेस्टेरॉल तयार करणारे एन्झाइम ब्लॉक करतात. एटोरवास्टॅटीनए (Atorvastatin, Rosuvastatin)
  • कोलेस्टेरॉल शोषण वर्धक- हे अन्न पदार्थामधून शरीरात होणारे शोषण कमी करतात. Ezetimibe
  • PCSK9 इनहिबिटर- ही नवीन औषधे आहेत, यकृताला रक्तातील LDL कमी करण्यास मदत करतात. Evolocumab, Alirocumab
  • फाइब्रेट्स- प्रामुख्याने ट्रायग्लिसराइड कमी करण्यासाठी आणि HDL कोलेस्टेरॉल किंचित वाढवण्यासाठी वापरले जातात.

मेंदूवर ताबा आणि जिभेवर ताबा ठेवला आणि शांत राहून थोडा वेळ जाऊ दिला तर समस्या दूर होऊ शकते. आरोग्य ही लक्झरी नाही, ती गरज आहे- आणि स्त्री म्हणून ती जपणं अधिकच महत्त्वाचं आहे. कोलेस्टेरॉलचे आकडे फक्त रिपोर्टपुरते मर्यादित नसतात, ते तुमच्या आयुष्याच्या गुणवत्तेचं प्रतिबिंब असतात. धोका वेळेवर ओळखून, छोट्या सवयी बदलून तुम्ही मोठा फरक घडवू शकता. स्वतःसाठी घेतलेला हा निर्णय-तुमच्यासाठीचं नाही, तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकासाठी महत्वाचा आहे.

(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक आहेत)
phadkebhagyashri@gmail.com