मैत्रेयी केळकर
माणूस आणि निसर्ग यांचा साहचर्य जन्मोजन्मीच आहे ते या खुळचट कल्पनांनी का बरं तुटावं?
या उलट इमारतीची रचना करताना जर home grown food साठी सोय करता आली तर उपलब्ध जागेत आलं, लिंबू कढिपत्ता, मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि हळद आपण लावू शकू. रोजच्या स्वयंपाकातली मसाल्यांची सोय सहज होईल.
नवीन घरी राहायला आलो आणि घरात भरून राहिलेला स्वच्छ सूर्यप्रकाश पाहून हरखून जायला झालं. उंची फर्निचर, महागड्या वस्तू, सुरेख कलात्मक दिवे या सगळ्याने घराची शोभा वाढते हे खरेच, पण जी श्रीमंती स्वच्छ सूर्यप्रकाशात आहे ती कशातच नाही, नाही का?
भल्यामोठ्या खिडक्या, समोर लांब रूंद पसरलेलं मैदान, सकाळचा कोवळा प्रकाश आणि संध्याकाळी मावळणारा तो केशरी गोळा, दुसऱ्या खिडकीत डोकावताना जेव्हा दिसला तेव्हा वाटलं स्क्वेअर फीटचा हिशेब मांडूच नये कोणी !
घरात हवा, पाणी आणि प्रकाश या तीन गोष्टी असणं महत्त्वाचं. किती खोल्या? कीती लांबी, रूंदी या सगळ्या गोष्टी दुय्यम ठराव्यात त्यापुढे. जे पिंडी ते ब्रम्हांडी हेच खरं. आपण बनलोयचमुळी पंचमहाभुतांपासून. त्यामुळे या कृत्रिम साधनांनी आपलं मन आनंदी होण्यापेक्षा सहज स्वाभाविक दिसणारी निसर्गरूपं आपल्याला आकर्षून घेतात.
आमचं मोकळं घर हळूहळू भरलं, आवश्यक सामानांनी त्यांच्या, त्यांच्या जागा मिळवल्या. घरात भरून राहिलेला तो उजेड मात्र तसाच होता. प्रत्येक क्षणी नवीन ऊर्जा देणारा. वाळवणं घालावीत एवढं ऊन एका खोलीत येत होतं, तर दुसरी खोली अगदी शांत निवांत थंडाव्याचा अनुभव देणारी.
या सगळ्यात कमतरता होती ती वानस मित्रांची. त्यांना इथे आणण्यासाठी काहीच सोय झाली नव्हती.
मुळात सोसायटीचा म्हणे अजून निर्णयच झाला नव्हता, खिडकी समोरच्या जागेत झाडं ठेवायची की नाही याचा. आताशा नियम, कायदे, ठराव यात आपण किती अडकलेले आहोत.
ज्या गोष्टी सहज करणं शक्य आहे त्याच नेमक्या आपण लांबणीवर टाकतो. सोसायटीत पोडियम गार्डनच्या आग्रह धरणारे आपण, आपल्या पुरती आपल्याच घरी एखादी किचन गार्डन का करत नाही? त्यासाठी मग हे नियमांचे अडथळे. घरात झाडं लावायची नाहीत, पाण्याचे ओघळ येतात, इमारतीचा डौल बिघडतो. मान्य, हे मुद्देसुद्धा महत्त्वाचे आहेतच, पण यावर उत्तरंही शोधता येतीलच की. आराखडा बनवताना जरा अधिक जाणीवपूर्वक आग्रह धरला तर थोडी झाडं लावता येतील इतकी जागा प्रत्येकाला पुरवता येऊच शकेल. सभोवती पसरलेला इतका मुबलक सूर्य प्रकाश, पाणी असताना त्याचा उपयोग करत रोपं वाढवली, सृजनाचा आनंद मिळवला तर !
पण सोसायटीच्या एस्थिटीक (सौंदर्याचा )प्रश्न आणि फ्लावर बेडच्या जागा गिळंकृत केलेले इमारतींचे आराखडे, हे होऊ देत नाहीत एवढं मात्र खरं.
माणूस आणि निसर्ग यांचा साहचर्य जन्मोजन्मीच आहे ते या खुळचट कल्पनांनी का बरं तुटावं?
या उलट इमारतीची रचना करताना जर home grown food साठी सोय करता आली तर उपलब्ध जागेत आलं, लिंबू कढिपत्ता, मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि हळद आपण लावू शकू. रोजच्या स्वयंपाकातली मसाल्यांची सोय सहज होईल. खिडकीच्या कोपऱ्यात एखादा शेंग भाजीचा वेल रेंगाळेल. एखाद्या साध्याशा टोपलीत मेथी, पालक लावता येतील. अळूचे, मायाळू चे कंद छोट्या टोपलीत जोमाने फोफावतील.
फारशी जागा आणि कष्ट दोन्हीचीही गरज लागणार नाही. उलट सकस आणि अगदी ऑरगॅनिक घटक मात्र मिळतील. एरवी मजल्या मजल्यावरच्या जागेत हायड्रोपोनिक्समध्ये केलेल्या शहरी शेतीच्या प्रयोगांची रील्स् आपण इंस्टाग्रामवर पाहतो, लाईकही करतो. पण स्वतःच्या भोवतालचा सूर्यप्रकाश वाया जातोय, वाळलेला पाला, घरात तयार होणारा ओला कचरा हे न लखलखणारे, सोन्यासारखे असलेले घटक आपल्याला दिसत नाहीत. निसर्गाचा भरभरून आशीर्वाद लाभलेल्या आपल्या देशात, जिथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे, तिथे आपण आपल्या मुळांपासून दूर नाही तर अती दूर गेलो आहोत जणू.
संपूर्ण ज्ञानेश्वरी नाही वाचता आली तरी ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतात, तसंच एक तरी झाड वाढवावचं. ते वाढवतानाचा आनंद अनुभवावा. आध्यात्मातून स्वानंद प्राप्ती होते. निसर्ग नेमकं तेच साधत असतो. आपल्याही नकळत तो आपलं मन शांत करत असतो. दरी-डोंगरात जाऊन साधना करणं शक्य नाहीये आपल्याला, पण दरी-कदरांतले हे सवंगडी आपण सोबतीला घेतले, रोज सकाळी त्यावर उमललेली फुलं, लगडलेल्या शेंगा, हिरवी कोवळी पानं पाहत सकाळची साधना केली तर या धकाधकीच्या जीवनातही एक निर्मळ आनंद सहज मिळवता येईल.
माशांच्या भोवती जसं पाणी तसं आपल्याभोवती आनंद पसरलेला आहे, त्याची जाणीव तेवढी व्हायला हवी!
mythreye.kjkelkar@gmail.com
