उर्फी जावेद...बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल! | urfi javed watch skirt and mobile bra is not fashion | Loksatta

उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

उर्फी जावेद, झेपत नाही अशी फॅशन करायचीच कशाला?

उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उर्फी जावेद…तुझी काही वेगळी ओळख सांगायला नको. अतरंगी कपडे घालून फॅशन करणारी तू सगळ्यांच्याच परिचयाची आहेस. सोशल मीडिया सेन्सेशन म्हणतात नाही का तुला. इन्स्टाग्रामवर म्हणे तुझे ४० लाख फॉलोअर्स आहेत. कधी वायर गुंडाळून तर कधी पाने लावून तू कपडे तयार करतेस. तुझ्या क्रिएटीव्हिटीला व कमाल फॅशनसेन्सला सलाम!

उर्फी, बघ बाई जरा स्पष्टच बोलते. इथे प्रत्येकालाच कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला हवे तसे कपडे घालते. कपड्यांची फॅशन आपण आपल्याला हवी तशी करतो. पण आपण जी फॅशन करतो, ती आपल्याला शोभायलाही हवी ना? उगाच फॅशनच्या नावाखाली स्वत:च्याच फोटोंचा किंवा दगडांचा ड्रेस बनवून घालण्यात काय अर्थ आहे. कित्येकदा तुझ्या फॅशनमुळे तूच अडचणीत येतेस. कधी ड्रेसमुळे तुला बसता येत नाही, तर कधी पायऱ्या चढायला जमत नाही. आऊटफिटमुळे फजिती होत असेल, तर असली फॅशन काय कामाची? मी म्हणते झेपत नाही अशी फॅशन करायचीच कशाला?

हेही वाचा>> सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

बरं, रोज चित्रविचित्र कपडे घालण्याला तू फॅशन म्हणतेस. ठीक आहे, मान्य करू. प्रत्येकाच्या फॅशनची व्याख्या, फॅशन सेन्स हा वेगळा असतो. पण जुन्या घडाळांचा स्कर्ट, मोबाईलपासून ब्रा बनवणे ही कोणती फॅशन आहे? गॅजेटचा वापर कपडे म्हणून…जरा जास्तच विचित्र नाही वाटत का? फॅशन करणं यात काहीच चुकीचं नाही. पण फक्त अंगप्रदर्शन करुन लोकांचं लक्ष वेधून घेणं हा हेतू असेल तर मात्र तुझ्या फॅशनच्या व्याख्येत नक्कीच गडबड आहे.

फॅशन म्हणजे काय गं…चारचौघात आपल्या पेहरावामुळे नीटनेटकं, उठून दिसावं. आपल्याला शोभतील असे कपडे घालावे. मग ती साडी असो, वनपीस अथवा बिकिनी. या सगळ्या पेहरावात महिलांचं सौंदर्य खुलूनच दिसतं. तुझ्या कपड्यांमुळे तू ओळखली जातेस, असं तू म्हणतेस. हे खरंही आहे. तुझ्या चित्रविचित्र कपड्यांना तू फॅशन म्हणतेस. ठीक आहे, मान्य करू. पण मग असे अतरंगी कपडे घालून रोज कॅमेरासमोर का येतेस? प्रसिद्धी मिळवण्यासाठीच ना? मागे एक पोत्यापासून ड्रेस तयार केल्याचा व्हिडीओ तू पोस्ट केला होतास. मला खरंच सांग पोत्यापासून बनवलेला ड्रेस तू स्वत: कधीतरी घालशील का? अगं दिवसभर अंगाला खाज येऊन टोमॅटोसारखी लालबुंद होशील तू! ते व्हिडीओ करण्यापुरतंच ठीक आहे. मग उठसूठ काहीही करुन त्याला फॅशनचा नाव द्यायचं का?

आणखी वाचा>> लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!

उर्फी बाई, उगाच अंगप्रदर्शन करायचं म्हणून अतरंगी कपड्यांना फॅशन म्हणायचं, याला काहीच अर्थ नाही. जाता जाता इतकंच म्हणेन, अंगभर नाही पण निदान शोभतील असे तरी कपडे घाल!

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 16:55 IST
Next Story
प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…