सामाजिक बंधनं झुगारून समाजातल्या अनिष्ट प्रथा-परंपरांच्या विरोधात उभं राहण्याची वेळ केव्हाच आलीय. पण आजही पैशांच्या हव्यासापोटी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेपोटी या प्रथा-परंपरा लहान मुलांप्रमाणे गोंजारल्या जातात अन् मग एखादी वैष्णवी या परंपरांच्या ओझ्याखाली अडकून आपला जीव देते. वैष्णवीच्या सामाजिक प्रतिष्ठेवरून तिच्या आत्महत्येला गंभीर स्वरुप प्राप्त झालं. वैष्णवीची कौटुंबिक पार्श्वभूमी आर्थिक सुबत्तेची आणि तिचे आरोपी राजकीय कुटुंबाशी जवळीक साधणारे होते, म्हणून हे प्रकरण उजेडात आलं अन् महाराष्ट्रभर चर्चेत राहिलं. पण तुमच्या-आमच्या आजूबाजूला अशा असंख्य मुली तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात आणि अशाच हकनाक बळी जातात तरीही त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त केली जात नाही.
मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं, तिच्या तोडीस तोड तिला नवरा शोधायचा, तिच्या शिक्षणासाठी खर्च केला नसेल त्यापेक्षा पाचपट खर्च तिच्या लग्नासाठी करायचा अन् आपली पोरगी योग्य पदरात पडली हे मानून काशी यात्रेला जायचं सुख प्रत्येक आई-बापाच्या नशिबी येत नाही. एकाच कुटुंबातील दोन संसारी मुलींची कहाणी एकमेकींपेक्षा कितीतरी पटीने वेगळी असते. मग अशावेळी मुलींना वाढवताना नेमकं कसं वाढवायचं, त्यांच्या भविष्याची चिंता कमी करण्याकरता काय तजवीज करावी हा प्रश्न असतो. याकरता फक्त चांगलं सासर शोधणं हा पर्याय नसून मुलींना त्यांच्या अस्तित्वाविषयी जाणीव करून देणं गरजेचं असतं.
वैष्णवीचं प्रकरण उजेडात आल्यापासून मुलींना स्वतःच्या पायावर उभं करा, त्यांना शिक्षित करा, कमावती करा असं म्हणणाऱ्यांचं पेव फुटलं. पण असं केल्याने १०० टक्के प्रश्न सुटणार असतो का? कारण हुंडाबळीची प्रकरणं ग्रामीण भागात सर्वाधिक होत असली तरीही उच्चशिक्षित तरुणींनीही हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्रकरणे आपल्या समाजात कमी नाहीत. अशावेळी शिक्षण असून उपयोग नाही, तर त्या शिक्षणाच्या जोरावर स्वतःची भूमिका ठामपणे मांडता येणं गरजेचं आहे. आपल्याविरोधात अन्याय होतोय, याची जाणीव होणं गरजेचं आहे. ही जाणीव पेरण्याकरता मुलींची जडणघडण तशापद्धतीने करून देण्याची पालकांची जबाबदारी आहे.
मुलगी परक्या घरची लेक म्हणून तिला लहानपणापासून वाढवलं जातं. तिने शांत राहावं, गप्प बसावं, ऐकून घ्यावं इतकंच शिकवलं जातं. बाईच्या जातीने मोठ्या आवाजात बोलू नये, निर्णय घेऊ नये, मत मांडू नये असा छुपा शिरस्ता आजही अनेक घरांमध्ये दिसून येतो. यामुळे अशा मुलींमध्ये ठाम भूमिका घेण्याचं बीज रोवलंच जात नाही. परिणामी, जेव्हा बोलायची वेळ येते, स्वतःसाठी उभं राहायची वेळ येते तेव्हा कुटुंबाच्या सो कॉल्ड संस्काराच्या दडपणाखाली येऊन मुली गप्प राहतात अन् मरणाला कवटाळतात. मुळात याविरोधात बोलायचं असतं एवढीही प्रगल्भता त्यांच्यात आलेली नसते.
लग्न हा कौटुंबिक सोहळा असला तरीही त्याला सामाजिक वलय असतं. त्यामुळे या समाजात प्रतिष्ठा जपून ठेवण्याकरता कुटुंबावर दडपण येतं. अशावेळी हुंडा देणारच नाही, अशी ठाम भूमिका घेता आली पाहिजे. निदान प्रेमविवाह करणाऱ्या मुलींनी याविरोधात पाऊल उचललं पाहिजे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही हुंडा सर्रास दिला जातो. आमच्याकडे तशी प्रथाच आहे, असं म्हणत दोन्हीकडच्या लोकांकडून राजीखुशी पैशांचा धुरळा उडवला जातो. यातून हाव वाढते अन् मुलीकडच्यांनी अजून काहीतरी द्यावं, अशी अपेक्षा वाढते. त्यामुळे हुंडा मागणारे जितके लाचार अन् दोषी तितकेच हुंडा देणारेही दोषी ठरतात.
पुण्यात राहणाऱ्या निकिताने स्वतःच्या लग्नात हुंड्याला प्रचंड विरोध केला. तिचा प्रेमविवाह. तरीही सासरकडचे लोक मानपानावर अडून बसले होते. तिने कठोर शब्दांत सांगितलं, जो खर्च होईल तो समसमान अन् जो मानपान होईल तो आपआपल्या पद्धतीने करायचा. माझ्या घरातून त्या घरात झाडूची एक काडीही दिली जाणार नाही, मान्य असेल तर लग्नाची तारीख आत्ताच काढू. तिचा हा कणखर निर्णय ऐकून सगळेच अवाक् झाले. गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या तिच्या प्रियकरालाही तिची ही बाजू एकदम नवी वाटली. पण त्याला तिला गमवायचं नव्हतं. पण कौटुंबिक आणि सामाजिक बंधनामुळे त्यालाही ठाम भूमिका घेता येईना. अखेर त्याने भूमिका घेतली आणि आईवडिलांना हुंड्याशिवाय लग्न करण्यास राजी केलं. अन् दोघांनीही थाटामाटात पण समसमान खर्च करून लग्न केलं. तिने सुरुवातीलाच घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे तिच्या भीतीपोटी तिच्या सासरच्यांनी कधीच माहेरच्यांकडून इतर गोष्टींची अपेक्षा धरली नाही. तिने घातलेला हा पायंडा तिच्या लहान बहिणीनेही पुढे सुरू ठेवला अन् एक रुपयाचाही हुंडा न देता लग्न करणारं त्यांच्या गावातलं ते एकमेव घर ठरलं.
प्रेमविवाहात असा निर्णय घेता येतो, पण ठरवून केलेल्या लग्नातही असाच निर्णय घेता येईल का? असा प्रश्न विचारला जातो. मला वाटतं, अरेंज मॅरेजमध्येही असा बोल्ड निर्णय घेता येईल. कारण, गेल्या काही वर्षांत लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याची ओरड पालकांकडून केली जातेय. मुलांच्या तुलनेत उपवर वधूंची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्या उपवर आहेत त्या मुलींनी हुंड्याला कठोर विरोध केला अन् हुंड्याशिवाय लग्न करणार असशील तर विचार करेन अशी भूमिका घेतली तरच हुंड्यशिवायची लग्न पार पाडली जातील. नाहीतर ही प्रथा अनंत काळापर्यंत सुरू राहिल आणि दरवर्षी हजारो वैष्णवीचा जीव घेतला जाईल.
सती प्रता, केशवपन प्रथा, शिक्षणबंदी सारख्या अनेक प्रथा या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. पण त्या त्या वेळच्या सुधारकांनी याविरोधात आवाज उठवला, खस्ता खालल्या, चळवळ उभी केली अन् महिलांना अशा जोखडातून बाहेर काढलं. इतक्या बोजड प्रथा महाराष्ट्रातून १९- २० व्या शतकात हद्दपार होऊ शकतात तर हुंड्यासारखी प्रथा २१ व्या शतकातही जिवंत कशी आणि इतक्या सुधारकांच्या राज्यात या प्रथेला विरोध करणाऱ्याकरता मुली पुढे का येत नाहीत हा प्रश्न आहे. आपल्या शतकातलं आपल्याला सुधारक व्हायचं असेल तर सर्वात आधी हुंड्याला विरोध केला पाहिजे! त्याकरता सर्वात आधी मुलींनी बोलायला हवं!