भारतीय महिलांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही आता महिला अधिकारपदावर तीही विज्ञान क्षेत्रात आता अधिकारपदावर महिलांची नियुक्ती होत आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) संस्थेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या संस्थेच्या १७६ वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच एका महिलेची संस्थेची महासंचालक म्हणून रुजू होणार आहेत. त्यांचे नाव – वर्षा आगलावे. वर्षा आगलावे या जीएसआयच्या ५४ व्या महासंचालक असतील. असित साहा यांच्याकडून वर्षा आगलावे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला.
वर्षा आगलावे यांची बुद्धीमत्ता, प्रचंड मेहनत, वेगळ्या क्षेत्रात टिकून राहण्याची जिद्द या सगळ्याचं फळ म्हणजे त्यांची झालेली ही नियुक्ती. त्या जीवाश्म विज्ञान ( पॅलियंटॉलॉजी) मधील तज्ज्ञ आहेत. भूविज्ञान क्षेत्रात गेल्या तीस वर्षांपेक्षाही जास्त काळ कार्यरत आहेत. भारतीय खाण कार्यालयात (IBM) कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्या १९९२ मध्ये जीएसआयमध्ये रुजू झाल्या. याआधी त्या जीएसआयच्या कोलकत्यामधील कार्यालयात पूर्व विभागाच्या अतिरिक्त महासंचालक आणि विभागाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. आपल्या कारकिर्दीत महत्त्वाच्या खनिजांचा शोध, त्याबाबतचे संशोधन, खनिज संरक्षण आणि सागरी परिसरातील खनिजांचा शोध घेण्यावर आपण भर देणार असल्याचं आगलावे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात तर भरीव कामगिरी केलीच, त्याचबरोबर जीएसआयच्या संस्थात्मक विकासामध्येही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी संस्थेच्या उत्तर विभागाच्या लखनऊच्या कार्यालयात पायलेनॉलॉजीची अद्ययावत प्रयोगशाळा उभारली आणि देशभरात विविध शाखांमधील भूवैज्ञानिक उपक्रम तसेच कार्यक्रम घेण्यात पुढाकार घेतला. आतापर्यंत आगलावे यांना जीएसआयच्या मध्य, उत्तर आणि पूर्व विभागांच्या कार्यालयांमध्ये विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.
वर्षा आगलावे या जीवाश्म शास्त्र (palaeontology) आणि परागणाशास्त्र ( Palynology) या विषयांतील तज्ज्ञ आहेत. त्या उत्तर क्रिटेशियस- पॅलिओसिन काळातील गाळसंचय, के-टी सीमारेषा आणि सातपुडा- गोंडवाना खोऱ्यांवरील संशोधनासाठी ओळखल्या जातात. मध्य भारतातील सालबर्डी- घोरपेंड परिसरातील डायनासोरांच्या नेस्टींग म्हणजेच अंडी घालण्याची ठिकाणे शोधून काढण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्थांमधील संशोधनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
आगलावे यांची या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील नियुक्ती हा भारतातील संपूर्ण विज्ञान क्षेत्रातीलच एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. जीएसआय ही संस्था खाणकाम मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. भूगर्भीय मापन करणे, नकाशे तयार करणे, खनिजांचा शोध घेणे आणि भू-वैज्ञानिक संशोधन या क्षेत्रात कार्यरत असणारी ही देशातील प्रमुख्य संस्था आहे. आता यापुढील काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सेमी कंडक्टर्स आणि अक्षय्य उर्जेच्या पायाभूत सुविधांसाठी खनिजांची मागणीही भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे देशात खनिजांचा योग्य रितीने पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा टप्प्यावर आगलावे यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. खनिज शोध आणि खनिज सुरक्षा यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यानी नियुक्तीनंतर स्पष्ट केले आहे.
विज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या वाढत असली तरी संशोधन कार्यात अजूनही म्हणावी तितक्या संख्येनं महिला पूर्णवेळ कार्यरत नाहीत असे म्हटले जाते. त्यातही वैज्ञानिक क्षेत्रात काही ठरावीक विभागांमध्ये महिला शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आहेत. पण जीवाश्म शास्त्र किंवा भूविज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या तुलनेने कमीच आहे. वर्षा आगलावे यांची या क्षेत्रातील अधिकारपदावरील नियुक्ती ही प्रेरणादायी तर आहेच, पण या क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्यांसाठी एक संधीचं दार उघडणारी आहे. अत्यंत प्रतिष्ठित संस्थेतील हे पद जितकं मानाचे तितकंच आव्हानात्मकही आहे. नैसर्गिक संकटांचा अभ्यास, त्याबद्दलचे संशोधन, हिमनदीशी संबंधित संशोधन ( glaciology) आणि तरुण व उदयोन्मुख भू वैज्ञानिकांसाठी संधी उपलब्ध करून देणे ही आगलावे यांच्यापुढील प्रमुख आव्हाने असतील.
