scorecardresearch

Premium

रुक्मिणीच्या स्त्रीसुलभ भावना विठ्ठलापासून वेगळे राहण्यास कारण ठरल्या का ? काय आहेत रुक्मिणीच्या दंतकथा

रुक्मिणीचा राग एवढ्यापुरताच मर्यादित होता का? रुक्मिणीच्या रागाचा इतिहास काय आहे, रुक्मिणी पंढरपूरला कशी आली आणि विठ्ठल-रुक्मिणी एकत्र का नसतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल

Rakhumai_Rukmini_Story_Loksatta
काय आहेत रुक्मिणीच्या दंतकथा (ग्राफिक्स – लोकसत्ता.कॉम टीम)

महाराष्ट्रात विठ्ठल-रखुमाई अशी युगल मंदिरे दिसतात. परंतु, मुख्यतः विठ्ठल आणि रखुमाई म्हणजेच रुक्मिणी एकत्र नसतात. पंढरपूरलादेखील रुक्मिणी मंदिर वेगळे आहे. रुक्मिणी रुसलेली असते म्हणून तिचे मंदिर वेगळे अशा कथा आपल्याला दिसतात. परंतु, रुक्मिणीचा राग एवढ्यापुरताच मर्यादित होता का? रुक्मिणीच्या रागाचा इतिहास काय आहे, रुक्मिणी पंढरपूरला कशी आली आणि विठ्ठल-रुक्मिणी एकत्र का नसतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल

विठ्ठल-रुक्मिणी एकत्र का नसतात?

श्रीविठ्ठल ही वैष्णव संप्रदायातील महत्त्वाची देवता असून भागवत संप्रदायाची उपास्य देवता आहे. विठ्ठल देवतेला विष्णूंचा नववा अवतार मानला जातो. विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाची राधेसह असणारी मैत्री रुक्मिणीला मान्य नव्हती. त्यामुळे रुक्मिणी रुसलेली. श्रीविठ्ठल पंढरपूरला का आले, याच्या कथांमध्येही रुक्मिणीचा राग घालवण्यासाठी ते दिंडीरवनात आलेले अशीही कथा आहे. तरीही रुक्मिणीचा रुसवा गेला नाही. त्यामुळे विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे आहे.

devendra Fadnavis
“तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण आणि देवेंद्र फडणवीस यांना संपवतो”, म्हणणाऱ्या किंचक नवलेला अटक
world map
भूगोलाचा इतिहास: गोल नसणारी गोल पृथ्वी!
history_of_viththal_Pandharapur_Loksatta
विश्लेषण : विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास
hailstorm, Maharashtra, summer
भर उन्हाळ्यात गारपीट का होते?

द्वारकेत कृष्ण-रुक्मिणी मंदिर वेगळे का आहे ?

द्वारकेलाही कृष्णाचे मंदिर वेगळे असून रुक्मिणीचे मंदिर वेगळे आहे. भागवत पुराणानुसार कृष्ण आणि रुक्मिणी १२ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहिले होते. त्याची कथा अशी सांगितली जाते की, यदुवंशी ऋषी दुर्वास यांना कुलगुरू मानत असत. त्यामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यानंतर कुलगुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी ते दुर्वास ऋषींच्या आश्रमात येतात. द्वारका नगरीत आदरातीथ्य करण्याची आणि सेवा करण्याचा मानस असल्याचे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वास ऋषींना सांगतात. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी दिलेले निमंत्रण दुर्वासा ऋषी आनंदाने स्वीकारतात. मात्र, श्रीकृष्णासमोर एक अट ठेवतात. आपण दोघे ज्या रथातून या आश्रमात आला आहात, त्या रथातून मी येणार नाही. माझ्यासाठी दुसऱ्या रथाची व्यवस्था करावी. कोणतेही आढेवेढे न घेता श्रीकृष्ण दुर्वास ऋषींची अट मान्य करतात. दुर्वास ऋषींचा आश्रमात येण्यासाठी श्रीकृष्णाने एकच रथ आणला होता. त्यामुळे त्या रथाला असलेले अश्व श्रीकृष्णाने बाजूला केले. त्याऐवजी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वतः रथ ओढण्यासाठी सज्ज झाले. दुर्वास ऋषींना विनंती केल्यानंतर ते रथारुढ झाले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वास ऋषींना घेऊन द्वारकेकडे निघाले. द्वारकेच्या मार्गावर असताना रथ ओढून थकल्याने रुक्मिणीला तहान लागली. श्रीकृष्णाला ही बाब समजताच त्याने पायाच्या अंगठ्याने जमिनीवर जोरदार प्रहार केला. तेथेच पाणी प्रकट झाले. ते पाणी पिऊन रुक्मिणीची तृष्णा शमली. या गडबडीत दुर्वास ऋषींना पाणी विचारायचे राहून गेले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी आपल्याला पाणी विचारले नाही, याचा दुर्वासा ऋषींना राग आला. आपला अपमान झाल्याच्या भावनेतून त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला शाप दिला. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना १२ वर्षांपर्यंत एकमेकांचा विरह सहन करावा लागेल. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी एकत्र नांदू शकणार नाही. जिथे गंगा नदीमुळे पाण्याचा तुषार निर्माण झाला आहे. तेथील संपूर्ण जमिनीचे वाळवंट होईल, असा शाप दुर्वास ऋषींनी दिला. दुर्वास ऋषींच्या शापामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी १२ वर्षे दूर राहिले.

हेही वाचा : विश्लेषण : विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास

पुराणांमध्ये आलेले उल्लेख

विठ्ठल-रखुमाई आणि कृष्ण-रुक्मिणी यांच्या विरहाच्या काही कथा स्कंद आणि पद्म पुराणात येतात. या कथांनुसार कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि रुक्मिणी त्याची पट्टराणी झाली. एकदा राधा कृष्णाला भेटायला द्वारकेत आली आणि कृष्णाच्या बाजूला जाऊन बसली. तिथे रुक्मिणी आल्यावरही राधा उठून उभी राहिली नाही. यामुळे रुक्मिणीला राग आला. हा राग अर्थातच स्त्रीसुलभ आहे. ती रागावून दिंडीरवनात जाऊन बसली. कृष्ण तिथे तिचा राग शांत करायला आला. परंतु, रुक्मिणीचा राग शांत झाला नाही. त्यामुळे रुक्मिणीचे मंदिर वेगळे आहे. दिंडीरवन हे पंढरपूर जवळच आहे.

स्त्रीसुलभ भावना दाखवणाऱ्या विठ्ठल-रखुमाई विरहाच्या लोककथा

पतीवर रुसणं ही स्त्रीसुलभ भावना आहे. रोजच्या जीवनात दिसणारी ही घटना असल्यामुळे विठ्ठल-रखुमाई विरहाच्या लोककथा रचण्यात आल्या. त्यातील एक म्हणजे, विठ्ठल हा कायम त्याच्या भक्तांच्या मेळ्यात रंगलेला असायचा. त्यामुळे रुक्मिणीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नसे. आपला पती आपल्याला वेळ देत नाही, या भावनेने रुक्मिणी विठ्ठलावर रुसली. ‘रुसली रुक्मिणी गेली दिंडीरवनाला । अबीर बुक्क्याची गर्दी तिला सोसवेना’ अशा जात्यावरच्या ओव्यांमध्ये रुक्मिणीचा रुसवा व्यक्त होऊ लागला. तसेच दुसऱ्या काही ओव्यांमध्ये अजून एक कथा दिसते, रुक्मिणी आषाढी एकादशीला छान दाग-दागिने घालून तयार झालेली. परंत, विठ्ठलाला तिचे सुंदर रूप पाहण्यास वेळ नव्हता. त्यामुळे रुक्मिणी त्याच्यावर रागावली आणि दिंडीरवनात निघून गेली. पतीने त्याच्या मैत्रिणीला अधिक मान देणे, पत्नीने साजशृंगार केला असताना कौतुक न करणे या स्त्रीसुलभ भावना आहेत. त्यामुळे रखुमाई ओव्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसते.

हेही वाचा : स्त्रियांची भाषा म्हणजे काय ? ‘स्त्री’चे भाषिक योगदान

लखुबाई-रखुमाई आणि तिचा रुसवा

दिंडीरवनात लखुबाई देवीचे मंदिर आहे. लखुबाई हीच रखुमाई असावी असे सांगितले जाते. त्यासंदर्भातील कथा म्हणजे, कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून दिंडीरवनात येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे, तिथे गोपाकृष्णाचे मंदिर आहे. या दिंडीरवनात लखुबाई नावाच्या देवतेचे मंदिर असून तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तीरूप आहे. कृष्णावर रूसून दिंडीरवनात आलेली रूक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. दुसरी कथा म्हणजे, पद्मा नावाच्या एका सुंदर तरूण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू केली, तेव्हा विष्णूने तिच्यापेक्षा मनोहर रूप धारण करून तो तिच्या समोर प्रकट झाला. त्या रूपाचा तिला मोह पडला. तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने ‘मुक्तकेशी’ नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे (कोरडे) आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला ‘नग्ना’ आणि ‘मुक्तकेशी’ अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावती ह्या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडेच आहे. या पद्मा चा आणि श्री व्यंकटेशाचा संबंध आहे. व्यंकटेशाचीही पत्नी त्याच्यावर रागावून करवीरपीठात येऊन राहिली अशी कथा सांगितली जाते.

‘वामांगी रखुमाई’ असे विठ्ठलाच्या आरतीत म्हटले जात असले, तरी ती त्याच्या वामांगी नसते. विठ्ठल-रखुमाई हे जनमानसात रुजलेले देव असल्यामुळे यांच्या संदर्भात लोककथा निर्माण झाल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Was rukminis feminine feelings the reason for her separation from vitthal what are the legends of rukmini vvk

First published on: 29-06-2023 at 16:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×