निर्मला कुलकर्णी
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. वटपौर्णिमेची सगळी तयारी झाली होती.‌ आमची लहानशी का होईना खोली लख्खं केली होती. अनावश्यक सामान‌ दुसरीकडे ठेवून सतरंजी टाकली‌ होती. कोपऱ्यातल्या टेबलावर कुंकवाची कोयरी, आंबे, इ.‌ सामान ठेवलं होतं. ही सगळी पूर्वतयारी माझ्या सासूबाईंसाठी होती. त्या त्यांच्या सुरेल आवाजात वटसावित्रीची त्यांच्या माहेरी परंपरागत चालत आलेली एका राधा नावाच्या स्त्रीने लिहिलेली पोथी वाचत असत. त्या कुणा राधाबाईंनी ‘महाभारता’त ‘वनपर्वात’ आलेली सावित्रीची आणि तिच्या पातिव्रत्याची कथा अगदी सरळ, प्रासादिक मराठीमध्ये सांगितली आहे. ती कथा माझ्या सासूबाईही मनोभावे वाचत. मी मात्र या सर्व विधींकडे तटस्थपणे पाहत असे.

वस्तुतः महाभारतातले सावित्री हे पात्र माझे फार आवडते. ती स्वतः निर्णय घेत असे हे मला लहानपणापासून फार आवडायचं. तिच्या या गुणांवर लक्ष केंद्रित न करता परंपरेनं तिच्या पातिव्रत्याचाच फार गवगवा केला हेदेखील जाणवत असे. परंतु सासूबाईंची पोथी आणि आरती ऐकल्यानंतर मात्र मनात वेगळे विचार सुरू झाले. त्या न पाहिलेल्या राधाबाई सारख्या दिसू लागल्या. त्यांच्या निमित्तानं दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या सामान्य घरातल्या ब्राह्मण बायका मनात पिंगा घालू लागल्या.

कशा असतील या राधाबाई? कदाचित कीर्तनकाराच्या किंवा वेदशास्त्रसंपन्न घराण्यात त्यांचा जन्म झाला असेल, तत्कालीन रूढींच्या विरुद्ध न जाण्याची या घराण्याची वृत्ती असावी. म्हणून बालपणीच या मुलीचा विवाह अशाच कीर्तनकाराच्या किंवा वेदशास्त्रसंपन्न घराण्यात करून दिला असावा. पण ही मुलगी बुद्धीनं तल्लख असावी. घरात किंवा देवळात कानावर पडलेली सावित्रीची कथा आपण आपल्या शब्दात मांडावी असं तिला वाटलं असेल. माझ्या आईची आज्जी निरक्षर होती. परंतु घरात पुरुष वाचत असलेलं ‘संपूर्ण महाभारत’ (बहुधा मोरोपंतांचं) तिला तोंडपाठ होतं म्हणे. कानावर पडलेलं ऐकून कितीतरी स्त्रियांचे पारंपरिक ग्रंथ पाठ असत. अगदी वेद म्हणायला शास्त्रानं‍ स्त्रियांना परवानगी दिली नसली तरी घरात कानावर पडलेले वैदिक मंत्रही पाठ होत असत.

राधेच्याही कानावर ही मूळ कथा पडली असावी आणि म्हणून ती आपल्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न तिनं केला असावा. कुठेही छंदोभंग नाही, कसेबसे यमक जुळवले असे कुठेही जाणवत नाही. शब्दांची कमतरता कुठेही जाणवत नाही. मनातला भक्तिभाव यथोचित शब्दांमध्ये मांडण्याचं कसब या राधाबाईंकडे असावं. शिवाय शिस्तबद्ध लिखाण.‌ सुरुवातीला गणपतीला वंदन. हे वंदन इतकं छान लिहिलंय की विसरावं म्हटलं तरी विसरू शकत नाही.
‘श्रीगजवदना गौरिनंदना सकळ कवींचा तू राजा।
जोडुनि पाणि शरण तुला मी मग स्वस्थानी देवा जा।
त्यानंतर कथेला सुरुवात.‌..

“त्रैलोक्यामध्ये होउन गेली सावित्री एक पतिव्रता।
लक्ष जन्मिचे पातक जळते त्या साध्वीचे गुण गाता।” हे‌ साधारण दीडशे‌ वर्षांपूर्वीच्या राधेच्या मनातला उद्देश सांगणारे‌ पालुपद. शेवटी सावित्रीची अत्यंत गेय आरती. ही मूळ कथा महाभारतातल्या वनपर्वात येते हे त्या राधेला माहीत आहे. कथेचा वनपर्वातला ढाचा तसाच ठेवून‌ ती कथा तिनं स्वतःच्या शब्दांत ओवीबद्ध केली आहे. सावित्रीच्या पित्याचे, अश्वपतीचे राधा वर्णन करते- ‘मद्र देशी एक नरेन्द्र नांदे नाव तयाचे अश्वपती। शत्रु जनाला क्रूर असे पण असे साधुला नम्र अती।’ काही वर्षांनी सासुबाई आजारी पडल्या आणि ती पोथीही कुठंतरी गळबटली आणि आठवेनाशी झाली.
पण हे काव्य ऐकल्यावर‌ माझ्या मनात‌ त्यावेळी अनेक प्रश्न उठले होते खरे! या राधेला लिहायला वाचायला येत होतं का? १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू झाली. मग या राधाबाई शाळेत जाऊन शिकल्या असतील का? कदाचित शाळेत गेल्या असतील. १९०२ मध्ये जन्मलेल्या माझ्या दोन्ही आज्या कोकणातल्या लहान गावांमध्ये शाळेत जात होत्या, चौथीपर्यंत शिकल्या होत्या. ही राधाबाई कदाचित त्यांच्यापेक्षा वयानं थोडीशीच मोठी असावी, शाळेत जाऊन शिकलेली असावी. त्या जुजबी शिक्षणाचा उपयोग आपण करावा असं तिच्या मनात आलं असावं आणि तिनं तिला भावलेलं सावित्रीचं कथानक रचलं असावं. ते लिहूनही काढलं असेल. घरात फार सुधारकी वातावरण नसलं तरी खूप जाचक बंधनंही नसावीत. म्हणून तिला ही कथा लिहू दिली असावी. शिवाय, ही पातिव्रत्याचा गौरव करणारी कथा होती. त्यामुळे तिचं कौतुकही केलं असेल.

पण लगेचच दुसरं चित्र मनासमोर येत असे. तिच्या नवऱ्याला हे कदाचित आवडत असेल, आपली बायको काहीतरी वेगळं करतेय यांची त्याला जाणीव असेल. परंतु सासऱ्यांना आवडत नसेल. ते तिला खोचक बोलत असतील. तिच्या सासूबाई कशा असतील? तिला समजून घेणाऱ्या की तिला आडकाठी करणाऱ्या?

ती ही कथा लिहायला कधी बसत असेल? तिला कधी वेळ मिळत असेल? लिहायला बसल्यानंतर तिला घरची मंडळी सारखी उठवत असतील का? अशा साध्या दिसणाऱ्या विरोधाला तिनं कसं तोंड दिलं असेल?

ही राधा सांगलीच्या ब्राह्मण घरातली, त्यातही कोकणस्थ‌ असावी.‌ कारण ही पोथी सांगलीशी संबंध आलेल्या कैक कोकणस्थ‌ कुटुंबांमध्ये‌ वाचली जात असे.‌ माझ्या सासुबाईंचं आजोळ सांगलीला. त्यांच्या आज्जीकडून आईकडे आणि आईकडून मग सासुबाईंकडे ही पोथी वाचण्याची प्रथा आली. माझ्या सावंतवाडीच्या एका कोकणस्थ मैत्रिणीची आईदेखील ही पोथी वाचत असे म्हणे.‌

कदाचित या राधाबाई स्वतः वटसावित्रीच्या व्रताच्या‌ निमित्ताने हे पोथी वाचन करत असाव्यात.‌ ही पोथी अतिशय गेय असल्यामुळे अल्पावधीतच लोकांना आवडली असेल आणि त्याचा प्रसार झाला असेल. त्या काळात‌ जाती जातींचे गट असल्याकारणाने‌ कोकणस्थ बायकांमध्ये‌ ही पोथी अधिक प्रचलित झाली असावी.

माझ्या सासूबाई ही कथा वाचताना हळव्या होत, पण दिमाखातही असायच्या. आपण हे सुरेल स्वरात गातो याची त्यांना जाणीव असायची. कधी कधी मनात येई, राधाबाईही अशीच असेल का? तिला तिच्या थोड्याशा वेगळेपणाची जाणीव असेल का? असेलही कदाचित. पण एक मात्र खरं, परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन तिनं तिचं पोथी लिहिण्याचं उद्दिष्ट सफल केलं.

प्रत्येक पिढीत अशा कितीतरी बायका आहेत- ज्यांना परिस्थितीच्या विरुद्ध जाणं शक्य नसतं, कधीकधी आवडतही नाही. पण आपलं लहानसं का होईना असलेलं ध्येय त्या पूर्ण करतात. आहे त्या परिस्थितीत काहीतरी चांगलं करतात. ‘बंदिनी’ सिनेमात जेलरची पत्नी क्रांतिकारकांना पळून जायला मदत करत असे असं दाखवल़य. आपल्या ताटातला घास गरीबांना खाऊ घालणाऱ्या कितीतरी मध्यमवर्गीय बायका आहेत. या सगळ्या बायका प्राप्त परिस्थितीत स्वतःचं अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. राधाबाईंच्या निमित्तानं त्या आठवल्या इतकंच. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने या राधाबाईंसकट अशा सर्व स्त्रियांना नमस्कार.

nirmalarkulkarni@gmail.com