कामाच्या ठिकाणी पुरूषानं प्रत्यक्ष लैंगिक अत्याचार केला तरच तो कायद्यात धरला जातो असं मुळीच नाही, स्त्रीशी अप्रत्यक्ष ‘सहेतुक’ वागणंही लैंगिक अत्याचारच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या भंवरी देवी एरवी केवळ एक अबला पीडिता किंवा ‘केस स्टडी’चा विषय बनून राहिल्या असत्या. पण त्यांच्या संघर्षामुळे आणि विशाखा याचिकेमुळे त्या अनेक पीडित स्त्रियांसाठी प्रेरणास्थान बनल्या. नेमकं काय आहे ‘विशाखा गाईडलाइन्स’ आणि POSH (‘प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट’ कायदा) कायद्यामध्ये? कशी होते महिलांच्या सुरक्षेची व्यवस्था?… या कायद्याची सर्वांत मोठी बाजू म्हणजे लैंगिक अत्याचार म्हणजे काय? कोणत्या कृतीला अत्याचार म्हणायचं याबाबत स्पष्ट आणि सविस्तर तरतुदी.

हेही वाचा >>> घर आणि करिअर : कधी दोन पावलं पुढे कधी दोन पावलं मागे

कोणतीही व्यक्ती जेव्हा शारीरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल किंवा लगट करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा शारीरीक संबंधांची मागणी किंवा विनंती केली असेल किंवा अश्लील टिप्पणी करत असेल किंवा अश्लील साहित्य दाखवत असेल किंवा इतर कोणत्याही प्रकरचं लैंगिक/ अश्लील असं शारीरीक/ भाषिक किंवा अभाषिक वर्तन करत असेल, तर अशी कृती लैंगिक अत्याचार समजण्यात येईल असं POSH कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील कोणतीही कृती किंवा वागणूक ही प्रत्यक्षपणेच घडायला हवी अशी अट नाही. अशा प्रकारची कोणतीही कृती अप्रत्यक्षपणे केली असेल तरीही तिला अत्याचार समजलं जाईल. म्हणजे एखाद्याची खटकणारी नजर प्रत्यक्षात सिद्ध करता आली नाही, तरी त्याच्या त्या सहेतूक पाहाण्याला लैंगिक अत्याचार मानलं जाईल. प्रत्यक्षपणे न बोलता हातवारे/ खाणाखुणा करून काही अश्लील किंवा सूचक कमेंट केली असेल तर तीही लैंगिक अत्याचार मानली जाईल.

हेही वाचा >>> शॅम्पू की शॅम्पू बार काय योग्य? महिलांनो जाणून घ्या

त्याचप्रमाणे गर्भित अर्थानं किंवा स्पष्टपणे एखाद्या स्त्रीला तिच्या नोकरीत प्राधान्याची/ सवलतीची वागणूक देण्याचं आश्वासन देणं किंवा तिच्या नोकरीवर हानिकारक परीणाम घडू शकेल अशी गर्भित अथवा स्पष्ट धमकी देणं किंवा तिच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं, तिला धाकदपटशा दाखवून वा इतर मार्गांनी कामाच्या ठिकाणचं वातावरण तिच्यासाठी असह्य करणं किंवा तिच्या सुरक्षिततेवर किंवा आरोग्यावर विपरीत परीणाम होईल अशी अपमानास्पद वागणूक देणं या बाबीसुद्धा लैंगिक अत्याचार समजल्या जातील, असं कायद्यामध्ये नमूद केलं आहे.

खरंतर कोणतीही स्त्री नेहमीच सावधपणे वावरत असते. काही ‘सिग्नल’ तिला आधी अप्रत्यक्षपणे मिळतात. कितीही ‘अनकम्फर्टेबल’ वाटलं, तरी त्यांच्याकडे सुरूवातीला दुर्लक्ष केलं जातं. पण त्याचा सोयीचा अर्थ काढून समोरच्याची मजल वाढते. मग प्रत्यक्ष प्रयत्न सुरू होतात आणि त्यांना प्रतिसाद नाही मिळाला तर कामामध्ये अडथळे निर्माण करणं, ऑफिसमधलं राजकारण, दुय्यम वागणूक देणं, करिअरचं नुकसान करणं, नोकरी/ करिअरमधल्या ‘ग्रोथ’मध्ये अडथळे निर्माण करणं असे अनेक परिणाम दिसायला लागतात.

अधिकारांचा दुरुपयोग लैंगिक हेतूनं कशा प्रकारे केला जाऊ शकतो आणि त्यावर संबंधित स्त्रीची प्रतिक्रीया सर्वसाधारणपणे कशा प्रकारची असू शकते याचा सांगोपांग विचार करुन अत्याचाराची केवळ कृतीच नाही, तर त्यामागचा हेतू आणि परिणाम समजून घेऊन आणि ही व्याख्या करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is sexual assault clear and detailed provisions on what acts constitute torture amy
First published on: 17-09-2022 at 22:00 IST