सायली परांजपे

लिपस्टिकसारख्या सौंदर्यप्रसाधनाच्या खरेदीमध्ये अचानक वाढ होऊ लागणे हे कशाचे लक्षण असू शकते? म्हणजे आर्थिक स्थितीच्या सुधारणेचे की ती बिघडण्याचे? लिपस्टिकची वाढती खरेदी हे बहुतेकांना आर्थिक स्थितीतील सुधारणेचे निदर्शक वाटेल, कारण, लिपस्टिक ही काही मूलभूत गरज नाही आणि आर्थिक स्थिती सुधारल्यावरच लोक मूलभूत गरजांपलीकडे जाऊन लिपस्टिकसारख्या सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करतात, असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात मात्र लिपस्टिकच्या विक्रीत जशी वाढ होऊ लागते, तशी अर्थव्यवस्थेची स्थिती खालावू लागलेली असते, असे यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. लिपस्टिक विक्रीच्या आकड्यांवरून आर्थिक स्थितीचा अंदाज बांधण्याची ही संकल्पना ‘लिपस्टिक इंडेक्स’ म्हणून ओळखली जाते. गेल्या काही दिवसांत लिपस्टिक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत वाढीची नोंद झाल्यामुळे ही संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
solar waste in india
चिंताजनक अहवाल, २०३० पर्यंत भारतातील सौर कचऱ्यात होणार तब्बल २० पटींनी वाढ
food products marathi news, price continuously increasing marathi news
खाद्यवस्तूंच्या चढ्या किंमती रिझर्व्ह बँकेचीही डोकेदुखी

लिपस्टिक इंडेक्स या संज्ञेचा वापर सर्वप्रथम, अमेरिकेतील एस्टी लॉडर कंपन्यांचे अब्जाधीश वारस लिओनार्ड लॉडर यांनी २०००च्या दशकात केला. त्यांच्या उद्योगाच्या लिपस्टिक ब्रॅण्ड्सची विक्री २००० सालाच्या सुरुवातीला वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे असा अंदाज लॉडर यांनी बांधला होता. प्रत्यक्षात मात्र लिपस्टिकची विक्री वाढत असताना, अन्य आर्थिक निदर्शकांमध्ये घसरण होऊ लागली आणि मंदीला सुरुवात झाली. आर्थिक मंदीच्या काळात कपडे, पादत्राणे किंवा दागिन्यांसारख्या महागड्या फॅशनेबल वस्तूंची खरेदी करणे शक्य नसल्यामुळे लिपस्टिकसारख्या छोट्या सौंदर्यप्रसाधनाच्या खरेदीवर स्त्रिया समाधान मानतात आणि परिणामी लिपस्टिकची विक्री वाढते, असे निरीक्षण लॉडर यांनी मांडले. त्याला ‘लिपस्टिक इंडेक्स’ असे नाव दिले.

आणखी वाचा : मैत्रीला एक्स्पायरी असते का?

अर्थात लिपस्टिक इंडेक्स हा ‘फूलप्रूफ’ आर्थिक सिद्धांत ठरू शकला नाही, कारण, अर्थव्यवस्थेची स्थिती खालावत असताना, लिपस्टिकची विक्री वाढते हे निरीक्षण जरी अचूक असले, तरी त्याचा व्यत्यास मात्र प्रत्यक्षात आला नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असता, लिपस्टिकच्या विक्रीत घट दिसून आली नाही. त्याही परिस्थितीत लिपस्टिकची विक्री वाढत होती. हे कारण देऊन काही अर्थतज्ज्ञांनी ‘लिपस्टिक इंडेक्स’ ही संकल्पना फोल असल्याची टीका केली.

मात्र, एकीकडे लिपस्टिक किंवा तुलनेने स्वस्त सौंदर्यप्रसाधनांची विक्री वाढल्यानंतर लगेचच आर्थिक मंदीला सुरुवात झाल्याचे २००८च्या सुमारास पुन्हा एकदा आढळले. यावेळी लिपस्टिकहून अधिक नेलपेण्ट्सच्या विक्रीत वाढ दिसून आली होती. नेलपेण्ट्स हेही लिपस्टिकसारखे अन्य सौंदर्यप्रसाधनांच्या तुलनेत स्वस्त उत्पादन आहे.

सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीतील वाढ व आर्थिक मंदी यांच्यातील भूतकाळातील संबंध तपासून पाहिला असता, १९२९ ते १९३३ या काळात संपूर्ण जग महामंदीच्या खाईत लोटले जात असतानाही, सौंदर्यप्रसाधनांची विक्री अनपेक्षितरित्या वाढल्याचे दिसून आले होते. आर्थिक मंदीमुळे एकंदर निराशेचे वातावरण असते, हे नैराश्य कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून सौंदर्यप्रसाधनांची खरेदी केली जात असावी. विशेषत: कपडे, दागिने, पादत्राणे या वस्तूंच्या तुलनेत लिपस्टिक, नेलपेण्ट, फाउंडेशन आदी सौंदर्यप्रसाधने स्वस्त असल्यामुळे त्यांची खरेदी मध्यमवर्गीय ग्राहक मोठ्या प्रमाणात करू लागतात.

आणखी वाचा : …आणि रविवार असाच गेला!

सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीमध्ये वेगवेगळे प्रवाह दिसून येतात. २००८ साली आलेल्या आर्थिक मंदीदरम्यान स्त्रिया ब्यूटीपार्लर्स किंवा सलोन्समध्ये जाऊन मॅनिक्युअरसारखे महागडे उपचार टाळत होत्या. त्याला पर्याय म्हणून त्या वेगवेगळ्या नेलपेण्ट्स वापरून नखे रंगवत होत्या. नेल आर्ट हा प्रकारही याच काळात बराच लोकप्रिय झाला होता. त्यामुळे या काळात सर्व आर्थिक निर्देशांक गडगडत असताना, नेलपेण्ट्सची विक्री मात्र वाढत होती. एकंदर नैराश्यातून बाहेर येण्यासाठी हे छोटे उपाय लोक करत होते.

अर्थात हे ठोकताळे नेहमीच खरे ठरतात असे नाही. कोविड साथीच्या काळात अर्थव्यवस्था थंडावलेली होती पण त्या काळात सौंदर्यप्रसाधनांची विक्रीही थंड होती. याचे कारण म्हणजे लॉकडाउनमुळे बाहेर जाणेच बंद झाल्याने सौंदर्यप्रसाधनांवर खर्च करण्याची गरजच लोकांना भासत नव्हती. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली नव्हती. या काळातही लिपस्टिकची विक्री फारशी वाढली नाही. मात्र, मस्कारा, काजळ यांसारख्या डोळ्यांच्या सौंदर्यप्रसाधनांची विक्री तसेच नेलपेंट्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. कारण, तोंडावर मास्क लावणे अनिवार्य असल्यामुळे स्त्रिया बाहेर जाताना लिपस्टिकचा वापर फारसा करत नव्हत्या. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावणे व लिपस्टिकची विक्री यांच्यातील व्यस्त संबंध या काळात दिसला नाही, तरी आय मेकअप व नेलपेण्ट्सच्या विक्रीतील वाढीच्या स्वरूपात तो अस्तित्वात होता. तरीही सौंदर्यप्रसाधनांची विक्री व अर्थव्यवस्थेचे आरोग्य यांच्यातील संबंध नेहमीच व्यस्तच असतो असे म्हणता येणार नाही.

आणखी वाचा : घर आणि करिअर : कधी दोन पावलं पुढे कधी दोन पावलं मागे

२०२२ सालात पुन्हा एकदा लिपस्टिकच्या विक्रीत तीव्र वाढ झाली आहे आणि अमेरिकेतील अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. जानेवारी ते जून २०२२ या काळात लिपस्टिक व लिपग्लॉस यांच्या विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. कॅलेंडर वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या काळात लिपस्टिक व लिपग्लॉसची विक्री तब्बल २८ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, हा पुन्हा एकदा आर्थिक मंदीचा निदर्शक ठरणार की मास्कचा निर्बंध हटल्यामुळे स्त्रियांनी लिपस्टिक व लिपग्लॉसचा वापर पुन्हा जोरात सुरू केला आहे हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल…