UPSC Success Story: स्पर्धा परीक्षांमधून मोठाल्या पोस्ट मिळाव्या, आयपीएस, आयएएससारख्या पदांवर पोहोचता यावे, यासाठी तरुणाई रात्रंदिवस मेहनत करत असते. अशाच ध्येयवेड्या तरुणांना आदर्श आणि प्रेरणा देणारी तरुणीची यशोगाथा आहे. नशिबात जे काही लिहिलं असेल तेच घडतं असं म्हणत आपल्याकडे समोर येईल त्या परिस्थितीशी तडजोड करून आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला जातो. पण काही जण असेही असतात की, कितीही खडतर परिस्थिती आली, तरी न डगमगता त्याला तोंड देत नशिबाला झुकवून हवं ते मिळवतात. मनीषा धारवे ही तरुणी अशाच लढणाऱ्यांपैकी एक. मनीषाने UPSC 2023 मध्ये तिच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळविले होते आणि त्या वर्षी तिचा क्रमांक २५७ वा होता. तिच्या जागी दुसरे कोणी असते तर तिने खूप आधी हार मानली असती, पण मनीषाने ना हार मानली ना खचली, तिचा तिच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच ती आज अधिकारी आहे. खरगोनच्या झिरनिया ब्लॉकमधील बोंडारण्य गावातील मनीषाने तिचे प्राथमिक शिक्षण अंगणवाडीतून घेतले आहे. तिचे वडील गंगाराम धारवे हे अभियंता होते, पण त्यांनी मोठ्या शहरात जाऊन नोकरी केली नाही, तर खेड्यातील मुलांना शिक्षण देण्याची त्यांची इच्छा होती आणि यामुळे ते आपल्या गावी परत आले आणि सरकारी शाळेत शिकवू लागले, ज्यामध्ये त्यांची पत्नी जमना धारवे यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी आपली मुलगी मनीषा हिलाही सरकारी शाळेत शिकवले आहे. खरगोनच्या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण मनीषा सुरुवातीपासूनच खूप हुशार होती. तिने आठवीपर्यंत सरकारी शाळेतून शिक्षण घेतले आणि खरगोन येथील शाळेतून दहावी आणि बारावी उत्तीर्ण केली. तिने बारावीत गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय घेतले होते, पण तिला अधिकारी होण्याची इच्छा होती. १० वीत ७५ टक्के आणि १२ वीत ७८ टक्के गुण मिळवलेल्या मनीषाने इंदूरच्या होळकर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स केले आणि त्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली, त्यासाठी तिला तिच्या पालकांकडून दिल्लीला जाण्याची परवानगी मिळाली. तीन प्रयत्न करूनही मनीषाला अपयश रात्रंदिवस मेहनत करूनही मनीषा तिच्या पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरली, त्यानंतर तिला दिल्लीहून आपल्या गावी परतावे लागले. तिने कठोर परिश्रम सुरूच ठेवले, पण तीन प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. तिला लोकांच्या टीकेलादेखील सामोरे जावे लागले, पण मनीषाने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि तिचे प्रयत्न चालू ठेवले आणि शेवटी तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तिने २०२३ मध्ये UPSC उत्तीर्ण केले. जिद्द असेल तर काहीही अवघड नाही : मनीषा धारवे आज ती लाखो लोकांसाठी एक उदाहरण आहे. जे कालपर्यंत तिची चेष्टा करायचे, ते आज आपल्या मुलांना तिचे उदाहरण देतात. मनीषाने आपल्या मेहनतीने 'एखादी गोष्ट करायची जिद्द आणि प्रयत्न करत राहिल्यास प्रत्येक परिस्थितीत यश अपरिहार्य आहे', हे सिद्ध केले आहे.