सायली परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या नोबेल पारितोषिकाच्या २०२२ सालासाठी जाहीर झालेल्या यादीतील एक नाव आहे कॅरोलिन बेर्टोझी. रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी यंदा कॅरोलिन यांना मोर्टेन मेल्डाल आणि के. बॅरी शार्पलेस यांच्यासह विभागून नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्री या संकल्पनांचा विकास केल्याबद्दल या तिघांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले जाणार आहे.

यापैकी क्लिक केमिस्ट्री म्हणजेच रेणूंना एकत्र ‘क्लिक’ करणाऱ्या प्रतिक्रियेचा विकास मॉर्टेन मेल्डाल आणि बॅरी शार्पलेस यांनी केला आहे, तर कॅरोलिन यांनी ‘बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्री’ या संकल्पनेचा विकास केला आहे. बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्री हे नावही कॅरोलिन यांनीच या संकल्पनेला दिले आहे. याचा अर्थ सजिवांच्या प्रणालींशी अनुकूल अशा रासायनिक प्रतिक्रिया होय. सजिवांच्या जटील प्रणालींमधील घटक किंवा क्रियांना धक्का न पोहोचवता या प्रतिक्रिया घडतात. क्लिक केमिस्ट्री व बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्री या संकल्पनांचा विकास झाल्यामुळे औषधे अधिक प्रभावी पद्धतीने दिली जाऊ शकतील. शरीरात योग्य ठिकाणी औषधाचे घटकपदार्थ पोहोचतील आणि ते तिथे टिकून राहतील याची निश्चिती या संकल्पनांच्या मदतीने केली जाऊ शकत आहे.

बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्रीचा विकास करणाऱ्या प्राध्यापक कॅरोलिन रुथ बेर्टोझी अमेरिकेतील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आहेत. नोबेल पारितोषेक जाहीर झाल्यामुळे त्यांचे नाव अवघ्या जगाला माहीत झाले असले, तरी रसायनशास्त्र व जीवशास्त्राच्या क्षेत्रांत त्यांचे नाव आधीपासूनच सुपरिचित आहे. पेशींच्या पृष्ठभागावरील ग्लायकन या शर्करायुक्त घटकाचा सखोल अभ्यास कॅरोलिन यांनी केला आहे. कॅन्सरसारख्या आघात करणाऱ्या, संधिवातासारख्या दाहजन्य (इन्फ्लेमेटरी) आणि ट्युबरक्युलॉसिस किंवा अगदी कोविड-१९सारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये ग्लायकन्स नेमका काय परिणाम करतात याचा अभ्यास कॅरोलिन करत आहेत. रसायनशास्त्रीय व जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून पेशींच्या पृष्ठभागावरील ग्लायकोसिलेशनच्या आजारांवर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासासाठी त्यांचा २०१८ मध्ये रॉयल सोसायटीत फॉरेन मेंबर म्हणून समावेशही करण्यात आला आहे.

हार्वर्डमधून १९८८ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानतंर कॅरोलिन यांनी बेल लॅब्जमध्ये कामाला सुरुवात केली. कॉलेजमध्ये शिकत असताना कॅरोलिन बॅण्ड्समधून वाद्यही वाजवायच्या.

१९९३ मध्ये वयाच्या २७व्या वर्षीच कॅरोलिन यांनी बर्कलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून रसायनशास्त्रात पीएचडी पूर्ण केली. विषाणू शरीरातील शर्करायुक्त घटकांशी बांधले जातात हा शोध त्यांना बर्कलीमध्ये संशोधन करत असतानाच लागला. त्यातूनच त्यांच्या सध्याच्या संशोधनक्षेत्राची म्हणजेच ग्लायकोबायोलॉजीची वाट मोकळी झाली. मार्क बेड्नार्स्की यांच्या मार्गदर्शनाखाली कॅरोलिन पीएचडीचे संशोधन करत होत्या. मात्र, बेड्नार्स्की यांना आतड्याच्या कॅन्सरचे निदान झाल्याने त्यांनी या विषयातील काम सोडून दिले. त्यामुळे कॅरोलिन यांना कोणत्याही प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय पीएचडीचे काम पूर्ण करावे लागले. पीएचडीनंतर त्या सॅनफ्रान्सिस्को येथे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या पोस्टडॉक्टरल फेलो म्हणून काम करू लागल्या. १९९६ सालापासून त्या बर्कलीमध्ये अध्यापनाचे कामही करू लागल्या. बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्री ही संज्ञा त्यांनी २००३ मध्ये शोधून काढली. पुढे २०१५ मध्ये त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील केम-एच इन्स्टिट्यूटमध्ये काम करू लागल्या.

बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्रीच्या तंत्रांचे उपयोजन कॅरोलिन यांनी पेशींवरील त्वचेभवती आढळणाऱ्या ग्लाकोकॅलिक्स या शर्करेच्या अभ्यासासाठी केले. त्यांच्या संशोधनामुळे जीवशास्त्रीय उपचारांमधील प्रगतीत हातभार लागला आहे. कॅरोलिन यांची लॅब केवळ नवीन संशोधन जगापुढे मांडून थांबलेली नाही, तर संशोधनाची साधनेही तयार केली आहेत. कॅन्सरच्या पेशींवरील शर्करायुक्त घटक आणि ते घटक रोगप्रतिकारयंत्रणेच्या बचावाचा भेद कसा करतात याबद्दल त्यांच्या लॅबने सखोल संशोधन केले आहे. रुग्णाच्या पेशींवरील साखरेचे आवरण नेमके कशाचे लक्षण आहे, यावर कॅरोलिन यांनी टेड टॉकही दिले आहे.

कॅरोलिन यांचे योगदान केवळ शैक्षणिक संशोधनांपुरते मर्यादित नाही, तर या संशोधनांच्या प्रत्यक्ष उपयोजनासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. त्यासाठी त्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट-अप्ससोबत सक्रियपणे काम करत आहेत. अगदी २०००च्या दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्टीव रोझेन यांच्यासह थिऑस फार्मास्युटिकल्स या कंपनीची स्थापना केली. सल्फेशन पाथवेजवर काम करणारी ही पहिलीच औषध कंपनी होती. २००८ मध्ये कॅरोलिन यांनी रेडवूड बायोसायन्सेस ही स्वत:ची कंपनी सुरू केली. स्मार्टटॅग या प्रथिनांमध्ये बदल करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर ही कंपनी करते आणि कॅन्सरवरील उपचारांमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित औषधे खूपच उपयुक्त ठरत आहेत. २०१४ मध्ये कॅटालेण्ट फार्मा सोल्युशन्स या कंपनीने कॅरोलिन यांची कंपनी संपादित केली. अर्थात कॅरोलिन आजही कंपनीच्या सल्लागार मंडळावर आहेत. याशिवाय अनेक स्टार्टअप्सच्या स्थापनेत कॅरोलिन यांनी मदत केली आहे.

कॅरोलिन यांनी अनेक विज्ञानविषयक नियतकालिकांमधून विपुल लेखन केले आहे, अनेक परिषदांमध्ये निबंध सादर केले आहेत. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांची यादीही बरीच मोठी आहे. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी त्यांना मॅकअर्थर ‘जीनियस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेमल्सन-एमआयटी पारितोषिक प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

कॅरोलिन यांचे बालपण मॅसॅच्युसेट्समधील लेक्झिंग्टन येथे गेले. त्यांचे वडील विल्यम बेर्टोझी एमआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. कॅरोलिन यांना दोन बहिणी असून, त्यातील अँड्रिया बेर्टोझी यूसीएलएमध्ये गणिताचे अध्यापन करतात.

लवकरच (१० ऑक्टोबरला) वयाची ५६ वर्षे पूर्ण करणाऱ्या कॅरोलिन लेस्बियन (समलैंगिक) आहेत आणि त्यांनी आपला लैंगिक कल वयाच्या विशीतच उघड केला आहे. जीएलबीटी समुदायाला त्यांनी कायमच पाठिंबा दिला आहे आणि या समुदायानेही कॅरोलिन यांच्या संशोधनात्मक तसेच उपयोजन क्षेत्रातील योगदानाचा सन्मान केला आहे. आपले विद्यार्थी व सहकारी सर्वांसाठीच कॅरोलिन ‘रोल मॉडेल’ आहेत. नोबेल पारितोषिकामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is carolyn bertozzi asj
First published on: 06-10-2022 at 14:16 IST