लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेलेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक एकदिवसीय सामना ज्या पद्धतीने संपला त्यामुळे भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा हिची चर्चा संपूर्ण जगभर होत आहे. इंग्लंडचा संघ लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, दीप्तीने ४४ व्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यास सुरुवात केली… दीप्तीने प्रत्यक्ष चेंडू टाकण्याआधीच चार्ली डीन गोलंदाजाच्या बाजूकडील क्रीझसोडून खूप पुढे गेली त्याच क्षणी दीप्तीने तिला धावबाद केले या प्रकाराला ‘मांकडिंग’असे म्हणतात. आयसीसीच्या नियमांनुसार हे बरोबर असल्यामुळे या विकेटसह दीप्तीने हा सामना संपवत भारताला विजय मिळवून दिला. भारताला हा रोमांचक विजय मिळवून देणारी दीप्ती याआधी तिच्या खेळामुळे प्रसिद्ध होतीच परंतु मांकडिंग या प्रकारामुळे सर्वच खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींच्या नजरा आता तिच्यावर पडल्या आहेत. अशा या अष्टपैलू दिप्तीने वयाच्या नवव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिला कधी वाटलं देखील नव्हते की ती क्रिकेट खेळेल परंतु आज तिने भारतीय महिला संघामध्ये आपले स्थान मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Deepti Sharma Memes: लगान का बदला लिया! दिप्ती शर्मा वादात नेटकरी खुश, मीम्स पाहून व्हाल लोटपोट

दीप्तीचा जन्म उत्तर प्रदेश मधील सहारनपूर या गावी झाला. एकूण सात भाऊ-बहिणींमध्ये ती सर्वात धाकटी. दीप्तीचा मोठा भाऊ सुमित शर्मा हा सुरुवातीपासूनच क्रिकेट खेळे त्यावेळी हट्ट करून ती रोज आपल्या भावासोबत त्याचा नेट सराव पाहायला जात असे. एकदा आग्र्यामधील एकलव्य स्पोर्ट्स स्टेडीयममध्ये नेट सराव पाहात असताना एक चेंडू दीप्ती जवळ आला तो चेंडू परत गोलंदाजाकडे देत असताना तिने तो गोल फिरवून टाकला आणि तो चेंडू सरळ जाऊन यष्ट्यानां लागला. त्यावेळी सर्वच मुलांनी तिचे कौतुक केले. मुलांसारखा पेहराव आणि बॉयकट असलेल्या दीप्तीची ती गोलंदाजी करण्याची कला मैदानामध्ये उपस्थित असलेल्या महिला वरिष्ठ प्रशिक्षक हेमलता काला पाहात होत्या. तो क्षण दीप्ती शर्माच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. ‘या मुलीला क्रिकेट खेळू द्या एक दिवस ही मुलगी नक्कीच भारताचे प्रतिनिधित्व करेल’ असे हेमलता यांनी दीप्तीकडे बघून उच्चरलेले शब्द आज तंतोतंत खरे ठरले आहे.

आणखी वाचा: Deepti Sharma Run Out: इंग्लिश लोक इतके रडके… दिप्ती शर्माची पाठराखण करत विरेंद्र सेहवागचं खास ट्वीट

कधीही क्रिकेटच्या मैदानामध्ये पाय न ठेवलेल्या दीप्तीने या सल्ल्याचा विचार करून क्रिकेटमध्ये करिअर करत मजल दरमजल करत आज मेहनतीने आणि स्वतःला झोकून देऊन क्रिकेटच्या जगात स्वतःचे वेगळे स्थान प्राप्त केले आहे. दीप्ती फिरकी गोलंदाज असली तरी तिने प्रथम सुरुवात ही मध्यमगती गोलंदाज म्हणून केली. आपल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात तिने २०१४ साली बंगळुरु येथे पार पडलेल्या भारत – दक्षिण आफ्रिका या सामन्यात केली. दीप्तीचा आवडता खेळाडू सुरेश रैना आहे तिला त्याचे अनुकरण करायला आवडते. दीप्तीने केलेल्या उत्तुंग कामगिरीमुळे तिला जून २०१८ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जगमोहन दालमिया करंडक या पुरस्काराने सन्मानित केले.

आणखी वाचा: Deepti Sharma Reaction Video: आम्ही चार्ली डीनला आधीच सांगून.. दिप्ती शर्माने केलं मोठं विधान

काय आहे मांकडिंग ?

गोलंदाजाने चेंडू टाकताना नॉन-स्ट्रायकर फलंदाजाने क्रीझ सोडलेले असताना गोलंदाजाने धावचीत करणे, याला ‘मांकडिंग’ असे म्हटले जायचे. आधी खेळभावनेविरोधातील कलम क्रमांक ४१.१६ अशा स्वरूपातील या नियमाचे कलम क्रमांक ३८मध्ये धावचीत असे नियमन केले गेले आहे. क्रिकेटमधील इतिहासात १९४८ मध्ये ‘मांकडिंग’नुसार प्रथम धावचीत केल्याची नोंद आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज बिल ब्राऊन यांना, त्यांनी नॉन-स्ट्रायकरला क्रीझ सोडलेले असताना या पद्धतीने धावचीत केले होते. मंकड यांनी ब्राऊन याला आधी अनेकदा ताकीदसुद्धा दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी या प्रकाराला ‘मांकडिंग’ असेच नाव दिले.

आणखी वाचा: विश्लेषण: ‘मांकडिंग’ची चर्चा नव्याने का सुरू झाली? इंग्लिश क्रिकेटप्रेमींना त्याचे वावडे का?

या पद्धतीने बाद करणे हे खेळभावनेच्या विरोधातील असे मानले गेल्याने सुनील गावस्कर यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार, तर ट्वेन्टी-२० आणि महिला क्रिकेटमध्ये एकेक ‘मांकडिंग’च्या घटना घडल्या होत्या. २०१९च्या ‘आयपीएल’मध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ‘मांकडिंग’ पद्धतीने बाद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या नियमाची बाजू घेणारे आणि विरोधक अस्तित्वात आहेतच. परंतु ‘एमसीसी’ने ‘मांकडिंग’ला धावचीत ठरवल्याने आता अशा रीतीने बाद करणे हे येथून पुढे तरी खेळभावनेविरोधी नसेल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is deepti sharma mankading women cricket charlie dean vp
First published on: 27-09-2022 at 20:19 IST