विजया जांगळे
‘मुसोलिनी चांगला नेता होता, त्याने जे काही केलं ते इटलीच्या भल्यासाठीच केलं…’ जगातल्या हुकूमशहांच्या यादीत ज्याचं नाव हिटलरपाठोपाठ घेतलं जातं, एकाधिकारशाहीचा पुरस्कार करणाऱ्या फॅसिझमचा उद्गाता म्हणून ज्याला ओळखलं जातं, अशी ही व्यक्ती. अशा व्यक्तीचं कौतुक कोणाला वाटू शकेल का? पण ज्या इटलीवर मुसोलिनीने हुकुमत गाजवली त्याच देशाच्या नवनियुक्त पंतप्रधानांनी- जॉर्जिया मेलोनी यांनी एकेकाळी हे वक्तव्य केलं होतं. मेलोनींच्या निवडीमुळे इटलीतील उदारमतवादी, पुरोगामी आणि लोकशाहीवाद्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे.

बेनिटो मुसोलिनीने १९२५ ते १९४५ या काळात इटलीवर हुकूमत गाजवली. त्याने इटलीची सत्ता काबीज केली त्याला शंभर वर्षं पूर्ण होत आली असताना, त्या देशात पुन्हा त्याच विचारसरणीचा वारसा सांगणारी व्यक्ती सर्वोच्च स्थानी विराजमान होईल, असं तेव्हा कोणालाही वाटलं नसेल. पण तसं झालं आहे. जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. वर नमूद वक्तव्य केलं तेव्हा त्या अवघ्या १९ वर्षांच्या होत्या. त्या एका वक्तव्यावरून त्यांना फॅसिस्ट किंवा मुसोलिनीच्या समर्थक ठरवणं अन्यायकारक ठरेल. पण त्यानंतर जे घडत गेलं ते या समजाला बळकटी देणारं होतं.

First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
maryam nawaz pakistan s first woman chief minister maryam nawaz sharif in pakistani
विश्लेषण : मरियम नवाझ शरीफ.. बेनझीर भुत्तोंनंतर पाकिस्तानी राजकारणाची दिशा बदलणारी दुसरी महिला!
pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका
Hockey India CEO Elena Norman resigns after nearly 13-year stint
Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय

२०१२ मध्ये मेलोनी यांनी फ्रटेली नटालिया म्हणजेच ‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा पक्ष स्थापन केला. मुसोलिनीच्या फॅसिझमशी नाते सांगणाऱ्या निओ-फॅसिस्ट इटालियन सोशल मुव्हमेंटमधून या पक्षाचा उदय झाला होता. पक्षाला २०१८च्या निवडणुकीत अवघी ४.३ टक्के मतं मिळाली होती. आणि आज अवघ्या चार वर्षांत हे प्रमाण तब्बल २६ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. आता त्यांनी ज्या अन्य दोन पक्षांबरोबर आघाडी करत सरकार स्थापन केलं आहे ते नॉर्दन लीग आणि फोर्झा इटालिया (गो इटली) हे देखील उजव्या विचारसरणीचे पक्ष आहेत.

लोकप्रिय आश्वासनं पूर्ण करता येतील?

मेलोनींना मिळालेल्या यशाची मीमांसा करताना इटलीच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीबद्दल आणि सद्यस्थितीबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. युरोपीयन युनियनमधल्या मोठ्या, प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध देशांमध्ये इटलीचा समावेश होतो. पण इथलं राजकीय प्रतल मात्र कायमच अस्थिर राहिलं आहे. गेल्या ७६ वर्षांत इथे तब्बल ६७ वेळा सत्तांतरं झाली. यावरून अस्थिरता किती टोकाची आहे याचा अंदाज येऊ शकतो. एरव्ही युरोपीय देशांतील निवडणुकांत सांस्कृतिक मुद्द्यांना मोठं महत्त्व असे. पण कोविडच्या महासाथीचा फटका आणि त्यापाठोपाठ सुरू झालेलं रशिया-युक्रेन युद्ध याचा मोठा फटका इटलीच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. २०२२मध्ये तिथला विकासदर २.५ टक्के एवढा कमी राहण्याची आणि २०२३मध्ये तर तो १.२ टक्क्यांपर्यंत गडगडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कर्जाचा अजस्र बोजाही डोक्यावर असून तो आणखी वाढत जाणार आहे. अशा स्थितीत मेलोनी यांनी प्रचारादरम्यान करकपात, उद्योगस्नेही वातावरण, निवृत्तीचे वय कमी करणे अशी लोकप्रिय आश्वासने दिली. अनिश्चिततेच्या वातावरणात त्यांची ही ठाम भूमिका आश्वासक वाटून त्यांच्या पारड्यात मते पडलेली असण्याची शक्यता आहे. मात्र आता या लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी त्या कशा करणार, याविषयी उत्सुकता आहे.

फॅसिझमशी खरंच फारकत घेतली आहे का?

‘इटलीतल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांनीही फॅसिझमशी पूर्णपणे आणि कायमस्वरूपी फारकत घेतली आहे,’ असा दावा मेलोनी वारंवार करतात. मात्र विविध मुद्द्यांवरच्या त्यांच्या भूमिका आणि वक्तव्यं, या दाव्यात फारसं तथ्य नसल्याचंच दर्शवतात. ‘मुसोलिनीच्या हातून काही चुका झाल्या. विशेषतः वांशिक कायदे, एकाधिकारशाही आणि दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या बाजूने सहभागी होण्याचा निर्णय या त्यातील महत्त्वाच्या चुका होत्या,’ असंही त्या म्हणतात. पण त्याच वेळी त्यांच्या स्वतःच्या पक्षातच मुसोलिनीचे दोन थेट वंशज आहेत.

‘भांडवलशाहीसाठी आपण केवळ ग्राहक आहोत. त्यामुळे आपली वैशिष्ट्यपूर्ण कौटुंबिक, राष्ट्रीय, धार्मिक, लैंगिक ओळख पुसून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपण ते हाणून पाडले पाहिजेत. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण हा एक वैशिष्टपूर्ण पवित्र जेनेटिक कोड आहे. आणि ही खासियत आपण वाट्टेल ती किंमत मोजून जपली पाहिजे. त्यासाठी हिंसेचा आधार घ्यावा लागला तरीही चालेल,’ असा मथितार्थ असणारं आवाहन त्या करतात. हे आवाहन फॅसिस्ट विचारांशी नातं सांगणारं आहे. त्यांच्या पक्षाचा तिरंगी ज्योत असलेला, फॅसिझमशी नातं सांगणारा लोगो बदलण्याची मागणी आजवर अनेकदा करण्यात आली आहे. मात्र याचा त्या विचारसरणीशी काहीही संबंध नाही, असा दावा करत मेलोनी यांनी ती दरवेळी फेटाळली.

महिलांना खरंच बळ मिळेल?

मेलोनींच्या रूपाने इटलीला पहिली महिला पंतप्रधान लाभली असली, तरीही त्यामुळे महिलांच्या जीवनावर काही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता धूसरच आहे. ‘देव, पितृभूमी आणि कुटुंब’ हे त्यांचं घोषवाक्य पितृसत्ताक व्यवस्था पुनर्स्थापित करण्याचं उद्दीष्ट अधोरेखित करतं. त्यांच्या पक्षाचा गर्भपातालाही विरोध आहे. सध्याच्या या उजव्या आघाडीमुळे इटलीतील महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि अधिकारांवर अधिकाधिक निर्बंध येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

एलजीबीटीक्यूंविषयीची भूमिका…

उजव्या विचारसरणीचा त्यांचा पक्ष पारंपरिक कौटुंबिक मूल्यांचा खंदा पुरस्कर्ता मानला जातो. साहजिकच त्यांचा एलजीबीटीक्यू समुहाला विरोध आहे आणि त्यांनी तो वेळोवेळी स्पष्टपणे व्यक्त केला आहे. या समुहातील व्यक्तींविरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या प्रकरणांचा समावेश द्वेषमूलक गुन्ह्यांत करण्यात यावा, अशा आशयाच्या विधेयकाला त्यांच्या पक्षाने विरोध केला होता.

स्थलांतरितांना दारे बंद?

युरोपात सध्या स्थलांतरितांविरोधात असंतोष आहे. इटलीतही तो मोठ्या प्रमाणात दिसतो. तिथे आफ्रिकेतून आणि बाल्कन देशांतून मोठ्या संख्येने रेफ्युजी येत असतात. मेलोनी इटालियन वंशाचे पावित्र्य राखण्याविषयी आग्रही आहेत. स्थलांतरितांच्या लोंढ्यांमुळे हे पावित्र्य धोक्यात आलं आहे, त्यामुळे स्थलांतरितांसाठी इटलीच्या सीमा बंद करण्यात याव्यात, असं त्यांचं मत आहे. स्थलांतरितांना विरोध हे त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.

पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी केलेल्या भाषणात मेलोनी म्हणतात, ‘ही रात्र सरली की एक नवी सुरुवात होईल. आपल्याला आपल्या मूल्यांचं महत्त्व जगाला पटवून द्यावं लागेल. देशाने नेतृत्त्वाची धुरा आमच्या खांद्यांवर ठेवली आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक इटालियन नागरिकाला एकत्र घेऊन पुढे जाऊ. इटालियन लोकांना पुन्हा आपल्या देशाविषयी अभिमान वाटावा, आपला ध्वज उंच लहरावा, हेच आमचं लक्ष्य आहे.’

या सत्तांतराविषयी इटलीत दोन टोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते ही एक नवी सुरुवात आहे आणि त्यामुळे देशात सकारात्मक बदल घडतील. मात्र काहींसाठी हा राजकीय भूकंप आहे. मेलोनी यांनी कितीही नाकारलं, तरीही त्यांचा फॅसिझमकडे असलेला कल लपून राहिलेला नाही. त्यांनी आपले उजवे विचार एका मर्यादेपलीकडे रेटण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा आधीच जागतिक आर्थिक मंदीच्या सावटाखाली असलेल्या इटलीच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. शिवाय अशा कडव्या उजव्या विचारसरणीमुळे युरोपातल्या अन्य देशांशी असलेले संबंध बिघडण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते. मेलोनी इटलीला स्थिर सरकार देणार की पुन्हा अस्थिरतेकडे घेऊन जाणार, हा प्रश्न तर आहेच, मात्र त्यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की त्यांच्या काळात इटलीचा चेहरा मोहरा आजच्याएवढा लोकशाहीवादी आणि पुरोगामी राहील का?