Madhabi Puri Buch Latest News : भांडवली बाजाराची नियामक संस्था ‘सेबी’चे नेतृत्व सध्या माधबी पुरी बुच यांच्याकडे असून त्या हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. माधबी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा असून यापूर्वी सेबीच्या पूर्णवेळ सदस्या म्हणून बुच यांची कारकीर्द राहिली आहे. मार्च २०२२ मध्ये त्यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
माधबी पुरी बुच यांचं मुंबई- दिल्लीत प्राथमिक शिक्षण
माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांनी मुंबईतील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी मिळवली. त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (IIM) त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात पदली मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८९ मध्ये त्या ICICI बँकेत रुजू झाल्या.
वित्तीय बाजारपेठेत त्यांना (Madhabi Puri Buch) तीन दशकांहून अधिक अनुभव असून बुच ५ एप्रिल २०१७ आणि ४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत सेबीच्या पूर्णवेळ सदस्या होत्या. या काळात त्यांनी सामूहिक गुंतवणूक योजना आणि गुंतवणूक व्यवस्थापन यासारखे पोर्टफोलिओ हाताळले. एका बिझनेस न्युजच्या प्रसिद्ध टेलिव्हिजन अँकरचा गैरव्यवहारही त्यांनी उघडकीस आणला होता. २०१७ मध्ये सरकारने केलेल्या काळ्या पैशाविरुद्धच्या मोहिमेत बुच यांनी संशयित शेल कंपन्यांमध्ये व्यापारावर बंदी घालण्याचे अनेक आदेश पारित केले.
सात सदस्यांच्या तज्ज्ञ गटाच्या प्रमुख बनल्या
SEBI च्या पूर्ण-वेळ सदस्या असताना बुच (Madhabi Puri Buch) सात सदस्यांच्या तज्ज्ञ गटाच्या प्रमुख बनल्या. या समितीची स्थापना नियामकांना इन-हाउस टेक्नॉलॉजिकल सिस्टम तयार करण्यात मदत करण्यासाठी करण्यात आली होती. NSE को- लोकेशन घोटाळा आणि NSE माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्णा यांच्याशी संबंधित प्रकरणांचा सामना करत असताना माधबी पुरी बुच यांनी मार्केट रेग्युलेटरचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला .
सेबीमध्ये अध्यक्षा होण्याआधी त्या नव्याने स्थापित आणि चीनमध्ये शांघाय येथे मुख्यालय असलेल्या नवीन विकास बँकेच्या बुच (Madhabi Puri Buch) या सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल या खासगी गुंतवणूकदार संस्थेच्या सिंगापूरस्थित कार्यालयाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्याआधी बुच यांचा आयसीआयसीआय समूहात प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.
सेबीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ कसा असतो?
२०२२ मध्ये माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) या सेबीच्या अध्यक्षा होण्याआधी अजय त्यागी अध्यक्ष होते. अजय त्यागी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. सेबीच्या कायद्यानुसार, अध्यक्षाची नियुक्ती कमाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्यानुसार केली जाते. तथापि, त्यागी यांनी ज्यांच्याकडून पदभार घेतला ते यू. के. सिन्हा हे दोनदा मुदतवाढ मिळाल्याने सहा वर्षे सेबीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. तर त्याआधी सर्वात जास्त काळ म्हणजे सात वर्षांसाठी सेबीचे अध्यक्षपद हे डी. आर. मेहता यांनी भूषविले आहे.
हिंडेनबर्ग अहवालात माधबी पुरी बुच यांच्यावर नेमके कोणते आरोप?
हिंडेनबर्ग अहवालात असे नमूद आहे की, ‘‘आपण आपले कामकाज सुरू ठेवल्यास, त्यामध्ये कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही याचा अदाणींना वाटणारा संपूर्ण आत्मविश्वास आमच्या आधी लक्षात आला होता. त्यामुळे अदाणींचे माधवी बुच यांच्याशी असलेल्या संबंधांमधून त्याचा खुलासा मिळेल असे सूचित होत होते. तेव्हा आम्हाला माहित नव्हते की, माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे त्याच बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती, ज्यांचा वापर विनोद अदाणींनी (आर्थिक गैरव्यवहारांसाठी) केला होता. आम्ही अदाणींच्या भांडवली बाजारातील घोटाळ्याबद्दल १८ महिन्यांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याचा तपास करण्यात ‘सेबी’ने आश्चर्यकारकरित्या उत्साहाचा अभाव दाखवला होता’’ असे हिंडनबर्गने (Hindenburg Report) म्हटले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd