रूबल नागी या मूळच्या जम्मू-काश्मीरच्या आहेत. राज्यशास्त्रात पदवी घेतलेल्या नागी जातीच्या कलावंत आहेत. त्यांचा मुंबईत आर्ट स्टुडिओ आहे. सध्या त्या देशभरातील १६३ पेक्षाही जास्त झोपडपट्ट्या आणि खेडेगावांमध्ये काम करत आहेत. मूळच्या कलाकार असलेल्या रुबल नागी अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळेच त्यांच्या रुबल नागी आर्ट फाऊंडेशन या संस्थेमार्फत त्यांनी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना मदतीचा हात देण्याचे ठरवले. सगळ्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणच त्यांना जबाबदार आणि उत्तम नागरिक बनवण्यास मदत करेल, त्यामुळे या मुलांना शिक्षण मिळायला हवं या हेतूने त्यांनी काम करायला सुरुवात केली.
रुबल नागी… शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्यामुळे देशभरातील लाखो मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकली. असंख्य वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे वळवून त्यांनी या मुलांचे आयुष्यच बदलून टाकलं. त्यांच्या याच कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. रुबल नागी यांना २०२६ चा ग्लोबल टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दुबईत झालेल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटच्या भव्य सोहळ्यात रुबल यांना हा पुरस्कार देण्यात आला. १० लाख डॉलर्स रकमेचा हा पुरस्कार म्हणजे शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजला जातो. गेल्या २० वर्षांपासून रूबल नागी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. कलेच्या माध्यमातून शिक्षण देत त्यांनी जवळपास १० लाखांपेक्षाही जास्त मुलांचं शाळांशी, शिक्षणाशी नातं जोडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १३९ देशांमधून आलेल्या ५ हजारांपेक्षा जास्त नामांकनांमधून रुबल नागी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, हीच त्यांच्या कार्याची पावती आहे.
रूबल नागी आर्ट फाऊंडेशन हे नाव शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अजिबात नवीन नाही. या फाऊंडेशनची संपूर्ण देशभरात ८०० पेक्षा जास्त केंद्रे उघडण्यात आली आहेत. जी मुलं शिक्षणापासून, शाळेपासून वंचित आहेत, त्यांना या केंद्रांच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी, अभ्यासासाठी मदत केली जाते. या मुलांना गरज भासल्यास मानसिक आधार म्हणजेच सल्ला-मार्गदर्शनही केले जाते.
रूबल नागी या मूळच्या जम्मू-काश्मीरच्या आहेत. राज्यशास्त्रात पदवी घेतलेल्या नागी जातीच्या कलावंत आहेत. त्यांचा मुंबईत आर्ट स्टुडिओ आहे. त्यांनी आतापर्यंत ८०० पेक्षाही जास्त म्युरल्स तयार केले आहेत आणि जगभरात त्यांची १५० पेक्षा जास्त प्रदर्शने झाली आहेत. इंडिया डिझाईन काऊन्सिलच्या (IDC) च्या त्या सदस्य आहेत. संपूर्ण मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणातही त्यांच्या कलाविष्काराचा सहभाग आहे. त्यांनी साक्षरता, विज्ञान, गणित आणि इतिहास अशा विषयांवरही म्युरल्स तयार केली आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. स्लेड स्कूल ऑफ फाईन आर्टमधून फाईन आर्टचे शिक्षण घेतले आहे तसेच सॉथबेज लंडनमधून युरोपीयन आर्टचे शिक्षण घेतले आहे.
भारत आणि विदेशातील तरूण, उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या ओळखल्या जातात. ‘मिसाल मुंबई’ अंतर्गत त्यांनी १,५०,००० पेक्षाही जास्त घरे दुरुस्त आणि रंगवून दिली आहेत. २०१६ मध्ये हा उपक्रम त्यांनी सुरू केला. सध्या त्या देशभरातील १६३ पेक्षाही जास्त झोपडपट्ट्या आणि खेडेगावांमध्ये काम करत आहेत. मूळच्या कलाकार असलेल्या रुबल नागी अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळेच त्यांच्या रुबल नागी आर्ट फाऊंडेशन या संस्थेमार्फत त्यांनी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना मदतीचा हात देण्याचे ठरवले. सगळ्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणच त्यांना जबाबदार आणि उत्तम नागरिक बनवण्यास मदत करेल, त्यामुळे या मुलांना शिक्षण मिळायला हवं या हेतूने त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यासाठी विविध प्रकारची अनोखी मॉडेल्स तयार करण्यात आली. वंचित मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी कमी खर्चातील टिकाऊ मॉडेल्स तयार करण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून मुलांना शिक्षणचा आनंद पुन्हा मिळवून देण्यास सुरुवात झाली.
‘जिवंत भिंती’ हे रूबल नागी शिक्षण पध्दतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या जिवंत भिंती म्हणजे काय? तर काही वापरात नसलेल्या भिंतींचा खुल्या वर्गखोल्यांमध्ये रुपांतर करून मुलांसाठी शिकण्यायोग्य वातावरण तयार केलं जातं. या भिंतींवर विविध प्रकारची चित्रे चितारण्यात आली आहेत. या भिंती रुबल नागी यांच्या शिक्षण पध्दतीचे मुख्य आधार आहेत. त्या संपूर्ण देशभरात सतत फिरत असतात. विविध शाळांना भेटी देतात, शिक्षकांना मार्गदर्शन करतात आणि मुख्य म्हणजे लहान मुलांबरोबर थेट संवाद साधतात, त्यांच्याबरोबर राहतात. आतापर्यंत त्यांनी ६०० पेक्षाही जास्त स्वयंसेवकांना त्यांच्या या चळवळीत प्रशिक्षित करून सहभागी करून घेतले आहे. ग्रामीण भागात मुलांच्या शाळा सोडण्याचे प्रमाण बरेच आहे. पण नागी यांच्या प्रयत्नांमुळे ते प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, अशी माहिती आहे. तसेच मुलांच्या शिक्षणातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्यांनी आवश्यक त्या सुधारणाही केल्या आहेत.
नागी यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून व्यावसायिक प्रशिक्षण देणारी एक संस्था सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेतून येणाऱ्या काळानुरुप कौशल्य विकास आणि डिजिटल साक्षरता या विषयांमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाईल. लाखो वंचित तरुणांना रोजगाराची आणि पर्यायाने नवीन आयुष्याची संधी मिळवून देणे हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
