कुस्ती हा शेकडो वर्षांपासून गावाकडे खेळाला जाणारा प्रसिद्ध खेळ; आता सातासमुद्रापार त्याची ख्याती झाली आहे. या खेळामध्ये दांडगी शरीरयष्टी, चपळता आणि तल्लख बुद्धिमत्ता या गुणांची गरज असते. या खेळाकडे पुरुषी खेळ म्हणूनच पाहिलं जातं, परंतु आता अनेक महिला कुस्तीपटू आखाड्यामध्ये उतरून खेळात केवळ सहभागीच होत नाहीत तर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला एक नवीन ओळख निर्माण करून देत आहेत. यामध्ये घेतले जाणारं महत्त्वाचे नाव म्हणजे कुस्तीपटू साक्षी मलिक!

साक्षीचा जन्म ३ सप्टेंबर १९९२ रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मोखरा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. आई- वडील आणि भाऊ असं हे चौकोनी कुटुंब. वडिलांचं नाव सुखबीर तर आईचं सुदेश. साक्षीचं लहानपण तिच्या आजोळी गेलं, तिचे आजोबा ख्यातनाम कुस्तीपटू होते. लहानपणापासून त्यांना मिळणारा सन्मान साक्षीनं पाहिला होता. आपणही असाच सन्मान प्राप्त करायचा, हे बालपणीच तिच्या मनावर खोल रुजलं. त्यासाठी तिनं वयाच्या १२ व्या वर्षी कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

सामान्य मुलगी ते आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हा प्रवास साक्षीसाठी कदापि सोपा नव्हता. बाहेरील समाज आणि घरात आईचा विरोध पत्करून तिनं प्रशिक्षक ईश्वर दहिया यांच्या सोबत रोहतकच्या अखाडा येथे असलेल्या छोटूराम स्टेडियममधून सराव करण्यास सुरुवात केली. तिनं दाखवून दिले की, मुलींनी ठरवलं तर कोणतीही अशक्य गोष्ट अथक परिश्रम घेऊन त्या शक्य करू शकतात.

कुस्तीसारखा पुरुषी खेळ गावामध्ये मुली खेळत नसल्यानं तिच्यासोबत कुस्तीचा सराव करायला एकही मुलगी नव्हती. त्यामुळे तिला मुलांसोबत कुस्ती खेळावी लागली. होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करत आपल्या ध्येयाकडे ती कायम आगेकूच करत राहिली. कालांतराने कर्तृत्वाच्या जोरावर लोकांच्या नकारात्मक दृष्टिकोनाला सकारात्मकतेमध्ये परिवर्तन करण्यात साक्षीला यश आलं.

२०१० साली झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत साक्षीने योग्य डावपेच टाकत पाहिलं पदक संपादन करून यशाची पहिली पायरी गाठली. २०१४ साली साक्षीने ६० किलो वजनी गटात डेव्ह आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं तेव्हा साक्षीचं नाव देशभरात कुस्तीपटू म्हणून सन्मानाने घेतलं जाऊ लागलं. तिनं अनेक पदके मिळवली. परंतु एक खेळाडू म्हणून ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं हेच तिचं प्रमुख स्वप्न होतं आणि त्यासाठी तिनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुलगी म्हणून समाजाकडून मिळालेली हीन वागणूक, अपुऱ्या सोयीसुविधा, मुलांसोबत सराव करताना महिला म्हणून येणाऱ्या समस्या यांसारख्या असंख्य अडचणींनाच धोबीपछाड करत साक्षीने नियमितपणे ६-७ तास व्यायाम तसेच वजन स्थिर राहावं यासाठी विशेष डायट याकडे कटाक्षानं लक्ष दिलं. त्यामुळे २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला प्रवेश मिळाला, संधीचा सदुपयोग करत साक्षीने आपल्या रोमहर्षक खेळीने कांस्यपदक मिळवून भारताला महिला कुस्ती प्रकारात आतापर्यंतचे पहिलेवहिले पदक मिळवून दिले.

साक्षीने २०१७ साली रिओ मोहिमेतील सहकारी कुस्तीपटू सत्यवर्त कादियान याच्याशी लग्न केले. साक्षी ही सर्वच क्रीडा क्षेत्रामधील मुलींसाठी एक आदर्श ठरली आहे. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीची दाखल घेत भारत सरकारने तिला पद्मश्री या नागरी पुरस्काराने गौरविले. तसेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारही प्रदान केला. साक्षीचा हा सुवर्ण प्रवास असाच चालू ठेवत तिने २०२२ च्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करत आपल्या प्रतिस्पर्ध्याला चकवा देत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले!