First Woman IAS Officer of India Anna Rajam Malhotra : केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा ही जागतिक स्तरावरील सर्वांत आव्हानात्मक आणि कठीण परीक्षा मानली जाते. परंतु,तरीही या आव्हानात्मक परीक्षेसाठी देशभरातून वर्षभर लाखो विद्यार्थी आपलं नशीब आजमावत असतात. परंतु, यात फार मोजके उमेदवार पास होतात. हे पास झालेले उमेदवार पुढे जाऊन मोठे अधिकारी बनतात, त्यांच्या संघर्षातून इतरांना प्रेरणा मिळते. तसंच, यामध्ये आता महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत महिला अधिकाऱ्यांचंही प्रमाण वाढलं आहे. पण या क्षेत्रात येणारी पहिली महिला अधिकारी तुम्हाला माहितेय का? आज त्यांच्याच विषयी जाणून घेऊयात.

कोण आहेत ॲना राजम मल्होत्रा? (First Woman IAS Officer of India )

आयएएस ॲना राजम मल्होत्रा या भारताच्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी होत्या. १९५१ च्या युपीएससी बॅचमधील ॲना राजम मल्होत्रा यांना भारतातील पहिली महिला आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणारी त्या दुसऱ्या भारतीय महिला होत्या. १९२७ मध्ये केरळमधील निरनाम येथे जन्मलेल्या त्या प्रसिद्ध मल्याळम लेखक पायलो पॉल यांच्या नात होत. त्या केरळ येथेच वाढल्या. प्रोव्हिडन्स महिला महाविद्यालयात त्यांनी त्यांचं मध्यवर्ती शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मलबार ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर डिग्री मिळवली आणि १९४९ मध्ये मद्रास विद्यापीठातन त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली.

हेही वाचा >> Vinesh Phogat : जंतर-मंतर ते पॅरिस ऑलिम्पिक! प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी अपात्र ठरली, पण…!

मुख्यमंत्र्यांनी केलं होतं कौतुक

डॉक्टर वा प्राध्यापक होणे शक्य असतानाही त्यांनी नागरी सेवेची परीक्षा दिली. त्या वेळी आयोगाच्या अनेक सदस्यांनी महिलांसाठी परराष्ट्र सेवा योग्य राहील असा सल्ला दिला, पण त्यांनी तो जुमानला नाही. मग भारतीय प्रशासकीय सेवेत १९५१ साली त्या दाखल झाल्या. सेवेसाठी त्यांना मद्रास केडरच देण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री राजाजी, कायदा व सुव्यवस्थेसारखे विषय महिला सक्षमपणे हाताळू शकणार नाहीत, असे म्हणाले. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या या विचारांना खोटं ठरवून ॲना राजन मल्होत्रा यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे राजाजी यांनी जाहीर सभेत अ‍ॅना राजम यांच्या कामाचे व सचोटीचे कौतुक केले होते.

हेही वाचा >> रतन टाटांची पुतणी सांभाळतेय डबघाईला आलेला व्यवसाय; नव्या जनरेशनला प्रेरणादायी ठरलेल्या माया टाटा कोण?

महाराष्ट्रातही बजावली होती सेवा

मद्रासमधील सात मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना १९८२ मध्ये दिल्ली एशियाडच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्याच बॅचचे अधिकारी रा. ना. मल्होत्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्होत्रा हे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर बनल्याने अ‍ॅना यांनाही महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. सरकारने न्हावाशेवा येथे अद्ययावत बंदर उभारणीचे महत्त्वाचे काम त्यांच्यावर सोपवले. भूसंपादन ते केंद्राकडून पर्यावरणविषयक मंजुऱ्या मिळवणे हे मोठे जिकिरीचे काम होते. कोणत्याही प्रकारची कटुता येऊ न देता सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे काम त्यांनी पूर्ण केले. जेएनपीटीच्या आजच्या स्वरूपाचे श्रेय बरेचसे त्यांचेच. सरकारी सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. ९२ वर्षांचे प्रदीर्घ, कृतार्थ आयुष्य त्या जगल्या. २०१८ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.